गोरक्षनाथ गडावरील झेंडा टेकडावरून.
२८ जानेवारी रविवारीची भली प्रसन्न पहाट!. पाईपलाईन रस्त्यावर निरव शांतता. पथदिव्यांच्या प्रखर प्रकाशानं अख्खा रस्ता न्हाऊन निघालेला. रस्त्यावर अजूनही हवेत चांगलाच गारठा अंगाला झोंबत होता.रस्त्यावर तुरळक चारचाकी गाड्या वेगाने ये- जा करत होत्या. इतक्यात देशमुखांची लाल परी भिस्तबाग चौकात येऊन थांबली. खरं तर गुलमोहर रस्ता आणि पाईपलाईन रस्ता यांचा संबंध देशमुख या नावाशी जरा जास्तच आहे.इतिहास असं सांगतो; ऐतिहासिक अहमदनगर शहर तटाच्या भिंती बाजूला सारून केव्हांच बाहेर विस्तारलेलं. ते आता आपले हातपाय पसरून सावेडी पर्यंत पोहचलेलं. चाळीस बेचाळीस वर्षापुर्वी इंजिनिअर श्री प्रभाकर देशमुख यांनी तत्कालीन सावेडी भागात दोन मोठ्या रस्त्याचं नियोजन केलं.या भागात दोन रस्ते टाकले…त्यासंबंधीत वरीष्ठांशी चर्चा करून ले आऊट तयार केलं. हे रस्ते तयार केले.ज्यामुळे या परिसरात मोठं चैतन्य संचारलं. आज गुलमोहर रोड निवासी क्षेत्रामुळं अद्यापही शांत, निवांत आहे. मात्र पाईपलाईन हा टोटल प्रोफेशनल झाला.जादाच वाहतूक असणारा रस्ता.म्हटलं तर चौवीस तास जिवंत असलेला रस्ता.या रस्त्यावर कधीही येऊन थांबा.निरव शांतता दिसणारच नाही.आजच्या भल्या पहाटे ती नव्हतीच… फोनाफोनी मुळं याच रस्त्यावर येऊन थांबलो.इंजिनिअर गुंड साहेब, इंजिनिअर देशमुख साहेब आणि मी गोरक्षनाथ गड सर करण्यासाठी एकत्र जमलो ते येथेच. अहमदनगर - मनमाड या रस्त्याने आमची लाल परी धावत होती. लालपरीचं सारथ्य स्वतः देशमुख साहेब करत होते. ते एक निष्णात चक्रधर आहेत. देहेरे गावाजवळील बस्टाॅपवरून उजव्या बाजूने गोरक्षनाथगडाकडे आम्ही वळालो. पायथ्याला लाल परी पार्क केली.तेथील गाडी रस्त्याच्या डाव्याबाजूने जाणाऱ्या पाय वाटेने चढाईला सुरुवात केली.श्री गुंड साहेब यांच्या नेतृत्वाखाली चढाईला सुरुवात… आजूबाजूला अंधार दाटलेला पण चंद्रप्रकाशात पाऊल वाटेचा अंदाज घेत ही चांदण्या पहाटेची ही आमची सहल सुरू झाली होती.दगड धोंडे तुडवत…तर कधी कधी दगडांच्या राशीतून एक एक पाऊल पुढे टाकले जात होतो. सोबतीला काटेरी झाडेझुडपे. त्यांचा अंदाज घेत डोंगर वाटांनी मार्गक्रमण करत पुढे चाललो. मध्येच कधीतरी मागे वळून आजूबाजूच्या वस्तीवरील दुरून दिसणारे मिणमिणारे विजेचे दिवे न्हयाळत होतो. डोंगर वाटांचा अंदाज घेत आम्ही पुढे पुढे चालत होतो.पहिला सोपा चढ पार केला.पुढं पठार लागलं.तो मैदानी प्रदेश मागे टाकत ,...वाळलेले गवत तुडवत त्या मार्गावरील झेंडा लावलेलं उंच टेकाड हे आमचं टार्गेट होतं.त्यावेळी तिथं अंधुकशी दिसणारी पायवाट. त्यावरून चालत झाडाझुडपांच्या मधून तीव्र चढ चढत ही मोहीम पुढे पुढे सरकत होती. यापूर्वी देशमुख साहेब आणि गुंड साहेब यांनी या मार्गाने कित्येकदा हा ट्रेक पूर्ण केलेला.त्यमुळं या परिसराशी त्यांचा चांगला परिचय असल्याची जाणवले. यापूर्वी या गोरक्षनाथ गडाच्या अवतीभोवती असणाऱ्या डोंगर वाटा, घाटवाटा, पायवाटा चांगल्या परिचित होत्या. त्यामुळे झेंडा टेकाड सर करण्यास मोठी मदत झाली. अध्याप चांगलाच अंधार दाटलेला होता. अवतीभोवतीची झाड झुडप रानवेली स्तब्ध दिसत होती. वातावरणात अजिबात वारं नसल्याने ते सर्व एखाद्या तपाला बसलेल्या ऋषी सारखी स्थिर शांत आणि गंभीर वाटत होती. मध्यम चढ, तीव्रचड खडकावरील वाटातून मार्ग काढत. कधी झाडाझुडपांचा आधार घेत तर कधी छातीवर येणारा तीव्र चढ.चढताना खडकातील खोबणीत हात पक्कं धरून चढत असू.निसरड्या रस्त्यावर पाय घट रोवून, एक एक पाऊल सावधगिरी टाकत डोंगर वाटांच्या खडकांचा आधार घेत आम्ही झेंडा टेकडावर पोहोचलो.सर्वात पुढं गुंड साहेब असल्याने ते झेंड्याखाली जाऊन पोहचले…आम्ही धापा टाकत ,घाम पुसत तिथं पोहचलो.त्या आधारित लांबून गुंड साहेब एखाद्या तपस्वी सारखे भासत. चढतानांच वीस फुट ऊंच पोलवर वेगाने फडफडणारा दिमाखदार भगवा ध्वज पाहताच ऊर भरून आलं.पुर्वी तिथं लाकडी काठीवर तो भगवा ध्वज लावलेला. या भगव्या ध्वजाची साथ या डोंगरदऱ्यांनी, गड- किल्ल्यांनी कधीकाळी कायमचीच केलेली इतिहासात दिसून येते.त्या टेकाडाची एकंदर ऊंची पाहता लोखंडी पाईप कायमस्वरूपी पक्का बसवलेला. आता टेकडा पासून पुर्वेस गोरक्षनाथ गडाकडे जाणारी सुमारे 300 ते ४०० मीटर लांबीची दोन तीन फुट रुंदची वाट आहे. दोन्ही बाजूने खोल खोल दरी. ती दरी पाहत चालणं अशक्यच. गरगरायला होतं. वाट मोठी कठीण व जिकरीची होती. स्थानिक लोक त्यास सुळकची वाट म्हणतात. गोरक्षनाथ गडावरून एक सुळका वरून खाली झेपावत झेंडा टेकडावर येऊन थांबतो. जणू काही ही वाट म्हणजे एक मोठा गजराज गडाकडे निघालय. हत्तीच्या पाठी सारखी ती वाट. झेंडा टेकडा पासून उजवीकडे एक सोपी वाट पुर्वेस गोरक्षनाथ गडाकडे जाते. तिला स्थानिक लोक म्हतारी वाट म्हणतात. कधी काळी म्हतारे माणसं त्या वाटेने गोरक्षनाथ गडाकडे जात असावेत. आम्ही मात्र सुळकीच्या वाटेने जाण्याचा निर्णय घेतला. त्या अरुंदवाटेने गोरक्षनाथ गडाकडे जात होतो. दोन्ही बाजूने खोल दरी भयानक वाटत होती. स्वतःला सांभाळत खडकावरून वाट काढत पुढे पुढे जात होतो. आजूबाजूची खोल दरी त्यातली झाडेझुडपं आता स्पष्टपणे दिसू लागली. त्या वाटेवरून आजूबाजूच्या परिसराचं अक्राळविक्राळ रूप भयानक वाटत होतं. तरी सुद्धा आम्ही तिघेही तोल सांभाळत सांभाळत पुढे जात होतो. या गड परिसरात इसवी सनाच्या आठव्या ते अकराव्या शतकामध्ये नाथांचा संचार होता.त्यांच्या उपासनेने , भटकंतीने हा सर्व परिसर परम पवित्र झालेला. कधीकाळी गोरक्षनाथ आणि त्यांचे अनुयायी या सर्व डोंगर रांगांमध्ये तपस्या, साधना करण्यासाठी फिरलेले असतील. त्याच जागेवरती आपण भल्या पहाटे फिरत आहोत ही जाणीव मनामध्ये सतत घर करून राहत होती. ज्या भूमीला दगडा धोंड्यांना परम पवित्र या मातीला त्या नाथ संप्रदायाची पाऊले लागली. त्या भूमीमध्ये फिरताना वेगळच चैतन्य संचारले होतं. आपल्या नाथ सिद्ध, अनुयायी नाथपरंपरेचा पदस्पर्श झालेला ही भावना मनामध्ये येत होती. या बाजूला असणाऱ्या उंच उंच टेकड्या पाहून प्रसन्न वाटत होते. परतीचा प्रवास करताना रानफुल दिसली ती लालभडक फुल पाहून मोठा आनंद झाला. मोकळ्या पठारावरील वाटेने नुकताच हरणांचा कळप गेला असावा. वाटेत हरणांची विष्टा दिसली. डोंगर वाट उतरताना खाली दूरवर शेतकरी आपल्या जोंधळ्याच्या पिकाचं रक्षण करताना गोफणीचे आवाज ऐकू येत होते…. *प्रा. डॉ नवनाथ काशिनाथ वाव्हळ, ९८८१८२७८३४*
Post a Comment