दो हंसो’ का जोडा

 




 संसारात जसं दोघांचं सूत जुळलं, तर संसार व्यवस्थित होतो. राजकारणातही ‘दो हंसो’ का जोडा असतो. राजकारणातील मैत्री पक्षाच्या भिंतींना कधीच जुमानत नाही. विलासराव देशमुख-गोपीनाथ मुंडे यांची मैत्री राज्यात अशीच होती. राजकारणात काही अजातशत्रू असतात. एकाच पक्षात असले, तरी परस्पर कुरघोडीचं राजकारण सुरू असतं; मात्र काही मिळण्यासाठी असलेली मैत्री वेगळी आणि काहीही अपेक्षा न ठेवता विश्वासाला, मैत्रीला जागणं वेगळं. राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रा. राम शिंदे यांच्या मैत्रीचवर्णन ‘दो हंसो का जोडा’ असं केलं तर वावगं ठरू नये.
राज्यात शिवसेना-भाजपचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात प्रा. राम शिंदे यांचा समावेश होता. फडणवीस यांचा प्रा. शिंदे यांच्यावर विश्वास होता. त्यामुळंच फडणवीस यांनी प्रा. शिंदे यांच्याकडं आपल्याकडील खात्याचा राज्यमंत्रिपदं सोपवलं. नंतर जेव्हा प्रा. शिंदे यांच्याकडं स्वतंत्र पदभार देण्यात आला, तेव्हा फडणवीस यांच्या स्वप्नातील प्रकल्प असलेल्या जलशिवार योजनेची जबाबदारी त्यांच्याकडं होती. प्रा. शिंदे यांनी कधीही विश्वासाला तडा जाऊ दिला नाही, म्हणून तर पंकजा मुंडे यांच्याकडील खातं प्रा. शिंदे यांच्याकडं देण्यात आलं. सलग पाच वर्षे नगरचं पालकमंत्रिपद सांभाळणाऱ्या प्रा. शिंदे यांना त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात पराभव पत्करावा लागल्यानंतर भाजपनं त्यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देऊन एकप्रकारे त्यांचं पुनर्वसन केलं आहे. त्यातून आगामी काळात धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर भाजपनं आणखी एका चेहऱ्याला झळाळी दिली आहे. विधान परिषदेमुळं प्रा. शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात पर्यायानं पवार कुटुंबीयांच्या विरोधात लढण्यासाठी भाजपनं बळ दिलं आहे. हे सर्व फडणवीस यांच्यामुळं झालं आहे. अर्थात आतापर्यंत आमदारकी असो की मंत्रिपद; संधीचं सोनं शिंदे करतील, हा विश्वास पक्षश्रेष्ठींना आहे. खरंतर प्रा. शिंदे यांची आजवरची कारकीर्द, जीवन कायमच चढ-उताराचं राहिलं आहे. २०१४ मध्ये भाजपच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून त्यांचा समावेश झाला. सुरुवातीच्या काळात ते भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या जवळचे म्हणून ओळखले जात. पुढं काळाची पावलं ओळखत त्यांनी फडणवीस यांचा विश्वास संपादन केला. त्यातूनच पंकजा मुंडे यांच्याकडील ‘जलसंधारण’ हे खातं व कॅबिनेट मंत्रिपदाची बढती अशी सोनेरी संधी प्रा. शिंदे यांना मिळाली. भाजप सरकारची ‘जलयुक्त शिवार’ ही महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी राबवली. पराभवानंतर पक्ष व फडणवीस यांच्याशी असलेली एकनिष्ठता पाहून भाजप प्रदेश समितीत त्यांचा समावेश करण्यात आला. शांत, संयमी असलेले प्रा. शिंदे आपण नेहमी रुबाबदार कसे दिसू याबद्दल दक्ष असतात. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या असभ्य भाषेमुळं आणि वादग्रस्त पार्श्वभूमीमुळं पक्षाची प्रतिमा डागाळत असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या पारंपरिक मतदारांमध्ये उमटत आहे. त्यामुळं प्रा. शिंदे यांच्या रूपात धनगर समाजातील एक सुसंस्कृत व पक्षनिष्ठ चेहरा देण्याचा भाजपचा प्रयत्नही त्यांच्या उमदेवारीतून दिसतो.

प्रा. शिंदे हे फडणवीस यांचे कट्टर समर्थक मानले जातात. फडणवीस यांचं ‘मी पुन्हा येईल’ हे वाक्य प्रसिद्ध झालं होतं. तेच वाक्य कर्जत-जामखेडमधील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रा. शिंदे यांनी वापरलं. कुकडी कालव्याच्या जलपूजन समारंभात प्रा. शिंदे म्हणाले, की लोकांना वाटलं आत्ता मी काही पुन्हा येणार नाही; मात्र मी अडीच वर्षातच पुन्हा आलो..! मी नसल्यानं गेली अडीच वर्षे कर्जत तालुक्याला कुकडीचं पाणी मिळाले नाही, आत्ता मी आलो आणि पाणीही आलं. अडीच वर्षाचा पाण्याचा अनुशेष भरून काढणार आहे. जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांपैकी १२ बाजार समित्यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रा. शिंदे यांनी भाजप कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शिंदे बोलत असतानाच अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याबाबत फडणवीस यांना विनंती केली. त्यामुळं फडणवीस यांनीही फोनवरूनच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. निष्ठा कशी असावी आणि आपल्या नेत्याचं महत्व आणखी कसं वाढवावं, हे त्यांच्याकडूनच शिकावं. बाजार समिती निवडणुकीच्या दृष्टीनं प्रा. शिंदे यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिंदे उभे राहिले. त्वेषात भाषण सुरू असतानाच अचानक फडणवीसांचा फोन आला. त्यांनी फोन उचलला आणि सध्या बाजार समिती निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असल्याचं सांगितलं. तसंच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याबाबत फडणवीस यांना विनंती केली. ही विनंती फडणवीस यांनी मान्य केली. त्यांनी तो मोबाईल कार्यकर्त्यांसमोर धरत स्पिकरवर लावला. फडणवीस यांनी सांगितलं की, प्रा. शिंदे यांनी विषय सांगितला आहे. बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सर्वांना अधिक मेहनत करायची आहे. सर्वांनी एकत्रित राहायचं आहे. आणि बाजार समितीची निवडणूक जिंकायची आहे, असा संदेश त्यांनी दिला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. नगर जिल्ह्यातून राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपदाची संधी मिळाली. असं असलं, तरी मंत्रिमंडळाच्या पुढच्या विस्तारात प्रा. शिंदे यांना संधी मिळणार आहे, तीही फडणवीस यांच्यांशी असलेल्या मैत्रीमुळं आणि पक्षावरील त्यांच्या अचल निष्ठेमुळं. नगर जिल्ह्यावर वर्चस्व ठेवण्यासाठी सर्वच प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यात वर्चस्वावरून बाळासाहेब थोरात आणि भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील हे नेहमीच आमने-सामने असतात, तर आ. रोहित पवार यांना शह देण्यासाठी प्रा. शिंदे यांना मंत्रिपद मिळू शकतं. राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानं अनेक जिल्ह्यांचं समीकरणे आता बदलणार आहेत. याचा परिणाम अहमदनगर  जिल्ह्यावरसुद्धा होणार असून शह-काटशहाचं राजकारण आता जिल्हा पातळीवर होणार असल्याचं चिन्ह दिसत आहेत.

जिल्ह्यामध्ये नेहमीच चर्चेला असलेले दोन विरोधक काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि लोकसभेत कोंडी झाल्याने काँग्रेसमधून भाजपत आलेले राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजकीय संघर्ष नेहमीच उफाळून येत असतो. हे दोन्हीही राजकीय विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी कधी सोडत नाही. सहकाराच्या माध्यमातून मंत्रिपद मिळवणं आणि आपलं सहकार आणि त्यातील प्राबल्य ठेवण्यासाठी मंत्रिपद किंवा आपला राजकीय धबधबा वापरणं हे नेहमीचंच आहे. मधल्या काळात भाजपतून महाविकास आघाडीमध्ये येण्याचं प्रमाण वाढलं होतं. त्यालाही सध्या खीळ बसेल कारण जिल्हा परिषदा पंचायत समित्या यांच्या निवडणुका भाजप मोठ्या ताकदीनं लढून त्यामुळं भाजप सर्व स्तरावर लक्ष ठेवून आहेत. विशेष म्हणजे राज्याच्या भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षाची जबाबदारी असलेल्या आणि फडणवीस यांच्या ‘गूडबुक’मध्ये असलेल्या प्रा. शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये सध्या भाजपाचे चार आमदार आहेत. यापूर्वी अहमदनगर जिल्ह्यामध्ये विखे विरुद्ध थोरात असा संघर्ष होता; मात्र त्यामध्ये मागील निवडणुकीत पवार घराण्याची एन्ट्री अहमदनगर जिल्ह्यामध्ये रोहित पवार यांच्या रूपानं झाली. त्या निवडणुकीत पवार यांनी तत्कालीन मंत्री व पालकमंत्री प्रा. शिंदे यांचा पराभव केला होता. त्यांच्या या दमदार एन्ट्रीमुळे अहमदनगरच्या जिल्ह्यामध्ये त्यांचं वर्चस्व वाढू लागलं आहे, तसा प्रभावही मागच्या अडीच वर्षांमध्ये दिसला. त्यामुळं त्यांना शह देण्यासाठी प्रा. शिंदे यांना मंत्रिपद दिले जाईल, हे निश्चित. पूर्वी जिल्ह्यात पूर्वी तीन मंत्री आणि हसन मुश्रीफ हे पालकमंत्री होते. त्यामुळं जिल्ह्याचा विकास होऊ शकला नाही असा आरोप भाजपनं केला होता. जिल्ह्यामध्ये येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुका आणि पुढील विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता भाजपचं पालकत्व असलेल्या भाजपचे नेते आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात असल्यामुळं त्यांचंही लक्ष सध्या अहमदनगर वर आहे. त्यामुळं प्रा. शिंदे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ कधी पडते हे पाहावं लागेल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post