पराभवामुळं नाऊमेद व्हायचं काहीच कारण नसतं आणि विजयाचा उन्माद करायचा नसतो, हे प्रा. राम शिंदे यांना चांगलंच ज्ञात आहे. गेल्या दोन दशकाच्या राजकारणात प्रा. शिंदे यांनी त्यानुसारच वाटचाल केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर प्रा. शिंदे यांनी स्वतःला सावरलं असं नाही, तर आता त्यांनी पुन्हा एकदा जामखेड-कर्जत मतदारसंघावर चांगलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. आमदार रोहित पवार यांच्यांशी त्यांचा सत्तासंघर्ष सुरू असून, या संघर्षातही त्यांनी पवार यांच्यावर मात केली आहे.
……….
कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व याच मतदारसंघातील विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांच्यात पुन्हा संघर्ष सुरू झाला आहे. कर्जत जामखेड मतदार संघात विकासकामांना खडी मिळत नसल्यानं कोट्याधी रुपयांची विकासकामं थांबल्याचा आरोप पवार यांनी करून एक प्रकारे सत्ताधारी असलेल्या प्रा. शिंदे व व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना शह दिला आहे; परंतु त्यानंतर विखे व शिंदे यांनी पवार यांना शह दिला आहे. त्यांनी कर्जतचे प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना निलंबित केलं. पवार यांच्या कारखान्यानं मुदतीअगोदरच गळीत केलं. त्याबद्दलच्या तक्रारीत सहकार खात्यातील अधिकाऱ्यानं पवार यांना ‘क्लीन चिट’ दिल्यानं सहकार खात्याच्या अधिकाऱ्याला निलंबित करून पवार यांना शह दिला आहे. शिंदे यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांशी चांगले संबंध आहेत. आता महसूलमंत्री विखे यांच्यांशीही त्यांनी जुळवून घेतलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पवार यांना मदत केली होती; परंतु त्यातील अनेक नेत्यांना आता शिंदे यांनी भाजपत आणलं आहे. राजकीय श्रेयासाठी कर्जत-जामखेडमधील प्रकल्प अन्यत्र हलविले जात असल्याचा आरोप करून पवार यांनी भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांच्यावर टीका केली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय संघर्ष पेटलेला असतानाच पूर्वाश्रमीच्या भाजपच्या मात्र अलीकडंच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी पुन्हा भाजपपध्ये प्रवेश केला. प्रा. शिंदे यांच्या चौंडी येथील निवासस्थानी सुमारे दोनशे कार्यकर्त्यांनी पुन्हा भाजपची वाट धरून शेवटपर्यंत शिंदे यांना साथ देण्याचा शब्द दिला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आमदार पवार विजयी झाल्यानंतर आणि त्याही आधीपासून भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली होती. पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते यांचे प्रवेश होऊन शिंदे यांना धक्क्यावर धक्के दिले जात होते. आता हे चित्र पालटलं आहे. राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता गेली, नवं सरकार सत्तेत आले. एवढंच नव्हे तर प्रा. शिंदे यांना विधान परिषदेवर संधी मिळाली. पुन्हा आमदार म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली. मंत्रिपदाचेही ते दावेदार मानले जाऊ लागले आहेत. आता त्यांच्यापासून दुरावलेले कार्यकर्ते पुन्हा जवळ येऊ लागल्याचं दिसून येत आहे. जामखेड तालुक्यातील राजुरी, डोळेवाडी, एकबुर्जी घुलेवस्ती, बांगर वस्ती आणि खर्डा परीसरातील सुमारे दोनशे कार्यकर्त्यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. एवढंच नव्हे, तर आता पुढील वाटचाल कायमस्वरूपी शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली करण्याच्या आणाभाकाही घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कसं गेलो हे सांगताना अनेक कार्यकर्त्यांनी टीकाही केली. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गुलाम होऊन राहणारालाच सन्मान मिळतो. भाजपमध्ये सर्वांना सन्मानाची वागणूक मिळते. २०१९ मध्ये आम्हाला खोटी आश्वासनं देण्यात आली. त्याला आम्ही बळी पडलो, अशी कबुलीही अनेक कार्यकर्त्यांनी दिली.
जी आश्वासनं दिली, जी स्वप्न दाखविली, ती प्रत्यक्षात आलीच नाहीत, असा आरोपही अनेक कार्यकर्त्यांनी केला. त्यामुळं कंटाळून पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. जी चूक २०१९ मध्ये झाली, ती २०२४ मध्ये दुरूस्त करायची आहे, असंही कार्यकर्ते म्हणाले. प्रा. शिंदे यांची विधान परिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्यापासून ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून ते चांगलेच कामाला लागले आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तब्बल दोनशे कार्यकर्त्यांना फोडत भाजपत सामील करुन घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले यांची भेट घेतली होती. घुले आणि प्रा. शिंदे यांच्यात बंद दाराआड महत्त्वाची चर्चा झाली होती. त्यामुळं घुले भाजपत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या दोन्ही घटना कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांना धक्का देणाऱ्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कर्जत-जामखेडच्या प्रश्नावरुन प्रा. शिंदे यांनी भेट घेतली. काम सांगितल्यानंतर त्यांनी लगेच वेळ उपलब्ध कररून दिली. कर्जत-जामखेडच्या शिष्टमंडळासह मी आताच त्यांची भेट घेतली. त्यांना दोन कामं सांगितली”, अशी माहिती प्रा. शिंदे यांनी दिली. सत्तेचा उपयोग करून जामखेड-कर्जत मतदारसंघातील विकासकामं मार्गी लावण्याचं त्यांनी ठरवलं आहे. जामखेडचा पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण तसंच तुकाई उपसा सिंचन योजनेचं काम अर्धवट आहे. ३० टक्के काम पूर्ण झालं होतं; पण विधानसभेच्या निवडणुकीपासून आजपर्यंत विद्यमान विधानसभा सदस्य रोहित पवार यांनी ही योजना बंद ठेवण्याचं पाप केलं”, असा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी १८० कोटी रुपयांच्या पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण योजनेवर तात्काळ सही केली. या योजनेच्या भूमिपूजनलाही मुख्यमंत्री येणार आहेत. हे मुख्यमंत्री तात्काळ काम करत आहेत. ते जनतेची कामं करत आहेत,’ असं सांगून प्रा. शिंदे यांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे. पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात पालकमंत्री पानंद रस्ते योजना व रोजगार हमी योजनेंतर्गत पानंद रस्ते कामात सुमारे वीस कोटी रुपयांचा अपहार झाल्याची लक्षवेधी सूचना प्रा. शिंदे यांनी मांडली होती. त्याची दखल घेत सरकारनं समिती नियुक्त करून चौकशीचा आदेश दिला आहे. अडीच वर्षांनंतर शिंदे विधान परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आमदार झाले. त्याच दरम्यान राज्यात सत्तातंर झालं. त्यामुळं शिंदे आणि पवार यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा टोकादार होताना दिसत आहे आणि या संघर्षात पवार यांच्यावर प्रा. शिंदे मात करीत आहेत.
प्रा. शिंदे यांच्या तक्रारीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांनी चार सदस्यीय समितीमार्फत सखोल चौकशी करून एक महिन्यात अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. चौकशी करण्यासाठी दक्षता व गुणनियंत्रण मंडळ नाशिक विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी या तीन अन्य सदस्यांचा चौकशी समितीत समावेश आहे. या योजनेतून केलेली कामं अस्तित्वातील रस्त्यांपेक्षाही दर्जाहीन झालेली आहेत. झालेल्या कामाचे मोजमाप अंदाजे करून, ठेकेदारांना पैसे अदा करण्यात आले आहेत. कामं करताना स्थानिक ग्रामपंचायतीला याबाबत काहीही कल्पना देण्यात आलेली नाही. निविदा प्रक्रिया न राबवता कामाचं वाटप राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना खिरापत वाटल्यासारखं देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रामस्थांकडून वारंवार तक्रारी होवूनही केवळ लोकप्रतिनिधीच्या दबावातून स्थानिक प्रशासनानं या तक्रारींकडे दुर्लश केलं होतं, असा प्रा. शिंदे यांनी केला आहे. आता प्रा. शिंदे विकासकामांच्या बाबतीतही पवार यांच्यावर मात करतील, यात कोणतीही शंका नाही
Post a Comment