नगर - माणसाला उच्च पदावर जाण्यासाठी शिक्षणाची शिडी आवश्यक असते. शिक्षणाची ओढ व महत्वकांक्षा बाळगणार्या विद्यार्थ्यांना श्रमाची देखील तेवढीच किंमत असते. त्यामुळे दिवसभर कष्ट करुन रात्र शाळेत शिक्षण घेऊन नवीन विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात ज्ञान संपादान करुन भविष्यात यशाचे शिखर गाठणारे हे ज्ञानार्थी विद्यार्थी देशाची संपत्ती आहे, असे प्रतिपादन प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा यांनी केले.
वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे रात्र व महिला महाविद्यालयाच्यावतीने प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत डॉ.खुराणा यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. याप्रसंगी मराठी विभागप्रमुख डॉ.सुचित्रा डावरे, प्रा.वंदना घोडके, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.ऐश्वर्या गोयल, प्रा.राजनंदिनी महामुनी, प्रा.शोभा लोखंडे, प्रा.सुवर्णा येमुल, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य संदिप कांबळे उपस्थित होते.
यावेळी प्रथम वर्षात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या स्वागताबरोबरच तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन निरोप देण्यात आला.
प्राचार्य संदिप कांबळे म्हणाले, आमच्या संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अडचणी पासून शैक्षणिक अडचणीपर्यंत त्यांना समाजावून घेऊन शिक्षणाकरीता सर्वोतोपरि मदत संस्था करते.
संस्थेचे अध्यक्ष विनय पाउलबुधे यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी शिवशरण यांनी केले तर आभार ज्ञानेश्वरी चांदेेकर यांनी मानले.
Post a Comment