नगर - सध्या स्पर्धेचे युग आहे, तंत्रज्ञानाच्या युगात आपण वावरताना, स्वत:शी स्पर्धा करायला शिका. तरच यशस्वी व्हाल. मॅकेनिकल इंजिनिअरींग क्षेत्रात फॅकल्टी डेव्हलपमेंटसाठी या कार्यशाळांच्या माध्यमातून प्राध्यापकांच्या ज्ञानात तर भर पडतेच पण विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास होण्यास देखील मदत होते. त्यामुळे कार्यशाळेतून मिळणारे प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या फायद्याचे असते, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बोर्ड ऑफ स्टडीजचे चेअरमन डॉ.सुजित परदेशी यांनी केले.
विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पा. अभियांत्रिकी महाविद्यालयात यंत्र अभियांत्रिकी विभागात ‘लिनिअर अॅण्ड नॉन लिनिअर अॅनालिसिस युजींग अॅन्सीस’ या विषयावर फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी डॉ.परदेशी, आय कॅड नाशिक प्रा.सुशिल पोटे, फौंडेशनचे उपसंचालक सुनिल कल्हापुरे, प्राचार्य डॉ.उदय नाईक, विभागप्रमुख डॉ.किशोर काळे आदि उपस्थित होते.
डॉ.परदेशी म्हणाले, विद्यार्थ्यांनी करिअर करतांना जे क्षेत्र निवडले त्यामध्ये मनापासून कार्यरत राहिले तर यश मिळते. मात्र हे करु का? ते केले तर, मला जमेल का? अशा चलबिचल प्रश्नांनी मात्र करिअरला धक्का बसू शकतो. तेव्हा आवडीच्या क्षेत्रातच करिअर करा, असे ते म्हणाले.
विभाग प्रमुख डॉ. काळे यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रत्येक चार वर्षांनंतर नवीन तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम अद्यावत करीत असतो. तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘कॉम्प्युटर अॅडेड इंजिनिअरींग’ हा नवीन विषय समाविष्ठ करण्यात आला; त्या विषयाचा परिचय शिक्षकांसह विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी प्रात्यक्षिकांसह फॅकल्टी डेव्हलमेंट कार्यशाळा घेण्यात आली, असे ते म्हणाले.
या कार्यशाळेत प्रशिक्षण देण्यासाठी बेंगलोर येथील ट्रेनी इंजिनिअर अॅन्सीस सॉफ्टवेअरचे अधिकृत ट्रेनर मिस संगिता एम. उपस्थित होत्या. तर नाशिकचे प्रा.सुशिल पोटे यांनी आयोजक तर प्रा.अमृत आहेर समन्वयक म्हणून काम पाहिले. यावेळी प्रा.सुनिल कल्हापुरे, डॉ. उदय नाईक यांनी कार्यशाळा आयोजकांचे अभिनंदन करुन कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे अध्यक्ष आ.राधाकृष्ण विखे पा., मुख्य कार्यकारी अधिकारी खा.डॉ.सुजय विखे आदिंनी समाधान व्यक्त केले.
--
Post a Comment