श्रीरामपूर( प्रतिनिधी-)एकीकडे चित्रकार रवि भागवत यांचा फळ्यावरील कागदावर चालणारा कुंचला ... आणि दुसरीकडे समोर बसलेल्या शंभर पेक्षा जास्त मुलांनी आपल्या कागदावर साकारलेले तेच पूर्व राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे चित्र.अवघ्या काही मिनिटांमध्ये या मुलांनी अब्दुल कलाम यांचे चित्र रेखाटून आपल्यातील कलेला नवा आयाम दिला.
या सोबतच शहरातील नामवंत चित्रकार आणि पत्रकार रवि भागवत यांच्या कुंचल्यातून साकार झालेल्या बालपणापासून ते म्हातारपणापर्यंतच्या विविध आकृती पाहून मुले बेधुंद झाली आणि डिंग डिंग डिगा चा जय घोष करीत त्यांनी भागवत यांच्या कलेला दाद दिली .विविध प्रकारच्या आकृत्या साकार करतांना, त्यातून मानवी जीवनाचे वेगवेगळे अविष्कार सुद्धा त्यांनी काढले आणि चित्रकलेतून जीवनाचा आनंद मिळविण्याचा एक मार्ग विद्यार्थ्यांना सापडला.
निमित्त होते येथील परमवीर शहीद अब्दुल हमीद डिजिटल नगर पालिका उर्दू शाळा क्रमांक पाच मध्ये सुरू असलेल्या समर कॅम्पचे.
संगणक प्रशिक्षण, चित्रकला, खेळ, योगा, गीत गायन इत्यादी विविध प्रकारचे उपक्रम या समर कॅम्प मध्ये सुरू आहेत. शाळेचे मुख्याध्यापक सलीमखान पठाण यांच्या कल्पकतेतून हा समर कॅम्प साकारला असून यामध्ये दररोज विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळी या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन करीत आहेत.चित्रकला हा अनेक मुलांचा आवडीचा विषय. त्यासाठी शहरातील नामवंत चित्रकार रवि भागवत यांनी समर कॅम्प मध्ये आमच्या मुलांसाठी आपला तास घ्यावा अशी गळ पठाण यांनी त्यांना घातली आणि मैत्रीला होकार देत रवी भागवत यांनी दिलखुलासपणे ते मान्य करून शनिवारी या समर कॅम्प मध्ये हजेरी लावली.
आपल्या दीड तासाच्या या सादरीकरणामध्ये भागवत यांनी मुलांना चित्रकलेच्या माध्यमातून वेगवेगळी चित्रे कशी काढावीत, त्याच्या रंगसंगती कशा असाव्यात, चेहऱ्याचे विविध हावभाव कशाप्रकारे कागदावर प्रकट करावेत याचे प्रात्यक्षिक करून दाखवत मुलांकडून ते करवून ही घेतले. उपस्थित विद्यार्थ्यांनी अतिशय तल्लीनतेने या उपक्रमात सहभाग घेत आपल्याकडे असलेल्या कागदावर देखील भागवत यांच्या बरोबरीने ही चित्रे रेखाटली. त्यासाठी शाळेतर्फे मुलांना ड्राईंग कागद पुरविण्यात आले. सर्वात शेवटी भूतपूर्व राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे अप्रतिम असे रेखाचित्र भागवत यांनी तयार केले आणि त्याला तेवढाच प्रतिसाद देत मुलांनी देखील उत्तम प्रकारे ते आपल्या कागदावर साकारले. समर कॅम्प मध्ये अशाप्रकारे चित्रकलेचा तास घेऊन मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वेळ दिल्याबद्दल रवि भागवत यांचा शाळेतर्फे नगरसेवक कलीमभाई कुरेशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नगरपालिकेची ही शाळा असून सर्व मुले ही अतिशय गरिबीतून शिक्षण घेत आहेत. भविष्यात ही या शाळेला माझी शाळा समजून अशाप्रकारचे कला शिबिर घेण्यास भागवत यांनी होकार दर्शविला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक सलीम खान पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक मोहमंद आसिफ,एजाज चौधरी,जमील काकर,बशीरा पठाण,यास्मिन पठाण,जुनेद काकर यांनी विशेष परिश्रम घेतले.या उपक्रमानंतर मुलांच्या चेहऱ्यावर चित्रकलेचा आनंद ओसंडून वाहत होता. पालकांनी शाळेच्या या उपक्रमाचे स्वागत करीत शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांना धन्यवाद दिले.
Post a Comment