भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांची माहिती
अहमदनगर (प्रतिनिधी) कोरोना काळात कोणताही गरीब उपाशी झोपू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या गरीब कल्याण अन्न योजनेद्वारे मार्च २२ पर्यंत राज्य सरकार व केंद्रशासित प्रदेशांना ७५९ लाख मेट्रिक टन अन्नधान्य वितरित करण्यात आल्याचे तर राज्य सरकारांमार्फत ८० कोटी लाभार्थ्यांना ६९० लाख मेट्रिक टन अन्न-धान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रामजी शिंदे साहेब यांनी दिली. भारतीय जनता पार्टीच्या ४२व्या स्थापना दिनानिमित्त मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या योजनेवर मोदी सरकारने आतापर्यंत ३ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केल्याचेही राम शिंदे यांनी सांगितले.
ते म्हणाले की, २६ मार्च २०२० रोजी कोरोना प्रसाराला अटकाव करण्यासाठी देशव्यापी टाळेबंदी जाहीर करण्यात आली होती. या काळात गोर-गरिब, श्रमिक, कामगार यांची उपासमार होऊ नये यासाठी मोदी सरकारने गरीब कल्याण अन्न योजना सुरु केली. या योजनेतून ८० कोटी लाभार्थ्यांना ५ किलो गहू, तांदूळ आणि एक किलो डाळ दिली जाते.या योजनेची मुदत सप्टेंबर २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
एप्रिल २०२० ते मार्च २०२२ या काळात गरीब कल्याण अन्न योजनेतून राज्य सरकारांद्वारे ६९० लाख मेट्रिक टन अन्न-धान्य वाटप करण्यात आले आहे. या योजनेच्या सहाव्या टप्प्यात म्हणजे एप्रिल ते सप्टेंबर २०२२ पर्यंत राज्य सरकारांना २४४ लाख टन अन्न-धान्य दिले जाणार आहे. त्यासाठी ८० हजार कोटी रुपयाचा अतिरिक्त खर्च मोदी सरकारकडून केला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
मोदी सरकारच्या गरीब कल्याण अन्न योजनेमुळे गोर-गरीबांचा मोठा फायदा झाल्याचे मत नोंदवत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) मोदी सरकारचे कौतुक केले असल्याचेही भारतिय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रामजी शिंदे साहेब यांनी नमूद केले.
Post a Comment