दिलीप गांधी एक प्रेरणादायी प्रवास

दिलीप गांधी एक प्रेरणादायी प्रवास
अतिसामान्य कुटुंबात जन्म घेऊन संघ स्वयंसेवक, जनसंघ, नगरसेवक, खासदार ते केंद्रीय मंत्री असा असाधारण जीवनप्रवास करणाऱ्या व सामान्य कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्रोत असणाऱ्या लोकनेत्यास *स्व.खासदार दिलीपजी गांधी* यांना  प्रथम स्मृतिदिनी अंतकरणापासून आदरांजली🌼🌸🌹
आज देशात भाजपाची एकहाती सत्ता आहे. अनेक राज्यात , मोठ्या शहरात भाजपा सत्तेत आहे. जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून भाजपाने ओळख निर्माण केली आहे. भाजपाचा हा प्रवास इतका सोपा निश्चितच नव्हता. पक्षवाढीसाठी स्व.अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांनी देशपातळीवर  स्व.प्रमोदजी महाजन, स्व.गोपीनाथजी मुंडे यांनी राज्यस्तरावर प्रचंड मेहनत घेतली. अहमदनगर जिह्याचा विचार केला तर या जिह्यात भाजप पक्ष वाढवला तो दिलीप गांधींनी...
सहकार क्षेत्रांत अग्रेसर मानला जाणार हा नगर जिल्हा, काँग्रेसी साखर सम्राटांच्या या जिल्ह्यात तब्बल ५ वेळा नगरसेवक त्यात एकदा उपनगराध्यक्ष, तीन वेळा, १५ वर्षे खासदार - त्यात एकदा केंद्रीय राज्यमंत्री होण्याचा बहुमान स्व.गांधींना मिळाला. अर्थात हे मिळविण्यासाठी त्यांनी प्रचंड परिश्रम घेतले आणि खूप संघर्ष देखील केला...
दिलीपजी त्यांच्या कुटुंबातील सर्वात मोठे..संयुक्त कुटुंब असल्याने आई-वडील व सहा लहान भावंडांची जबाबदारी त्याच्यावर लहान वयातच पडली. अवघ्या वयाच्या सोहळाव्या वर्षी उदरनिर्वाहासाठी त्यांनी अननस ज्युसची गाडी सुरू केली. गाडी लावण्यासाठी पोलीस हप्ता मागत.. कष्टाने कमावलेले पैसे देण्यास दिलीपजींनी नकार दिला. त्याचा राग आल्याने पोलीस निरीक्षकाने खोटे आरोप लाऊन दिलीपजीना अटक केली. हातात बेड्या ठोकून नगरच्या व्यापारपेठेतून धिंड काढली. झालेला हा अन्याय आणि अपमान त्यांना सहन झाला नाही. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी तदकालीन पंतप्रधान स्व.इंदिरा गांधींना पत्र लिहिले, घडलेली आपबिती सांगितली. पुण्यातील अँटिकरप्शनच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने त्या पोलीस निरीक्षकास हप्ता घेतांना रंगेहात पकडवून दिले. आणि येथूनच त्यांच्यातील नेतृत्वाचा उदय झाला. त्यानंतर ते कधीही कोणतीच राजकीय निवडणूक हरले नाही. त्यांच्यातील नेतृत्व गुणामुळे त्यांनी प्रत्येकाला आपलस केलं. सामान्य कार्यकर्ता आणि पक्षावर नितांत प्रेम करणारा नेता म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली. भाजपा जिल्हा सरचिटणीस म्हणून त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली. त्याकाळात नगर जिल्ह्यातील प्रत्येक गावात, वाड्या वस्त्यांवर  पक्ष पोहचविण्याचा प्रयत्न केला त्याचा फायदा त्यांना लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी झाला. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत युतीच्या जागा वाटपात नगर व कोपरगाव जागांची आदलाबदल झाली. स्व.बाबासाहेब विखे पाटील हे कोपरगाव मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार झाले. अहमदनगर लोकसभा मतदार संघ भाजपासाठी पहिल्यांदाच सुटला होता. श्रीगोंदयाच्या नेत्याला भाजपाची उमेदवारी दिली. ७-८ दिवस प्रचार केल्यावर त्या नेत्याने निवडणूक लढविण्यास नकार दिला. दिलीपजींनी निवडणूक लढविण्यास सज्जता दाखवली. सहकार आणि साखरसाम्राटांच्या ह्या बालेकिल्ल्यात अल्पसंख्याक जैन समाजाचा उमेदवार चालणार नाही असा पक्ष श्रेष्ठींचा व्होरा होता. आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी दिलीपजी आंदोलनाला बसले. ५ वेळा आमदार असणाऱ्या व जनसामान्यांत लोकप्रिय असणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोर कोणी निवडणूक लढविण्यास धजत नव्हते. ज्याला भाजपाने उमेदवारी दिली त्यानेच पक्षांतर केल्याने परिस्थिती अतिशय प्रतिकूल होती. कोणीच उमेदवार व्हायला तयार नाही अश्यात उमेदवारी साठी आंदोलन करणाऱ्या दिलीपजीना उमेदवारी देण्यात आली. पक्षाच्या दृष्टीने C कटेगिरीची सीट म्हणून अहमदनगर लोकसभेकडे दुर्लक्ष करण्यात आले. मा.स्व.अटल बिहारी वाजपेयींची सभा नगर ऐवजी पुण्यात घेण्यात आली. नगरला मिळणारी कुमक पुण्याला वळवण्यात आली. दिलीपजी सामान्य घरातील असल्याने मतदानाच्या आठ दिवस आधीच त्यांचे पैसे संपले. गाड्यात पेट्रोल/डिझेल भरायला देखील पैसे उरले नाही. प्रचाराच्या गाड्या बंगल्याबाहेर उभ्या झाल्या, प्रचार बंद पडला. विरोधकांनी ह्या गोष्टीचा फायदा घेत नगरमधील विख्यात वृत्तपत्रातून ही बातमी छापून आणली. ह्या बातमीचा नकारात्मक परिणाम होण्याऐवजी सकारात्मक परिणाम झाला. जैन समाजातील व्यापारी एकत्र आले त्यांनी पैसे गोळा करून आर्थिक मदत केली.दिलीपजींवर प्रेम करणारा सामान्य कार्यकर्ता पेटून उठून उठला. शेवटच्या ४-५ दिवसात वातावरण फिरले आणि दिलीप गांधी खासदार झाले.
खासदार झाल्यावर गांधीसाहेबांनी संपूर्ण मतदार संघ अक्षरशः पायाला भिंगरी लागल्यासारखं पिंजून काढला. प्रत्येक गावाला भेट दिली. तिथल्या समस्यां जाणून घेतल्या. शक्य असणारं प्रत्येक काम केलं. खासदारकीच्या माध्यमातून पक्ष वाढवला. खासदार काय काम करू शकतो हे लोकांना कळू लागले. त्याकाळात केंद्रातील ३४ मंत्री त्यांनी मतदार संघात आणले आणि त्यांच्या माध्यमातून कामे केली. लोकप्रिय खासदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. २००२ मध्ये त्यांच्या कामाची दखल घेत दिल्लीतील नेतृत्वाने केंद्राच्या मंत्रिमंडळात स्थान देऊन जहाजराणी मंत्रालयाचा भार दिला. २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत गांधी साहेबांना अल्पसंख्याक असल्याचा फटका बसला आणि त्यांचे तिकीट मंत्री असतांना देखील कापले गेले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व तदकालीन विधानपरिषदेचे अध्यक्ष प्रा.फरांदे सरांना उमेदवारी मिळाली. गांधींनी केलेल्या कामांमुळे पक्षाचे मते वाढली तरीही फरांदे एक लाख मतांनी पराभूत झाले. २००४ ते २००९ या काळात कोणतेही मोठे पद नसतांना देखील गांधी साहेबांनी मतदार संघात संपर्क ठेवला. कामे करत राहिले.  केंद्रातील सत्ता पक्षाच्या हातून गेली होती. २००९ मध्ये अथक परिश्रमातून आणि संघर्ष करून गांधींना पुन्हा एकदा लोकसभेची उमेदवारी मिळाली. निवडणूक प्रचारासाठी तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असणाऱ्या मा. नरेंद्र मोदींची सभा मिळवण्याचा गांधींनी प्रयत्न केला. मोदींच्या सभेला मागणी खूप होती. प्रदेशाने सभा दिली पण ती भरदुपारी १२ वाजता... एप्रिल महिन्यात भर दुपारी १२ च्या तळपत्या उन्हात सभा कशी होणार ? तरी ती सभा घेण्याचे धाडस गांधींनी केले. लाखभर लोकही जमा झाले . सकाळी १० वाजता लोक यायला लागली , १२ वाजले ,१ वाजला तरी मोदीजी आले नाही.  ३ पर्यंत लोक उन्हात थांबून राहिले. तीन वाजता सांगण्यात आले हेलिकॉप्टर उडण्यास उशीर झाल्याने मोदींजींनी सभा रद्द केली. याचा फटका बसेल असे वाटत असतांना गांधी ४५ हजार मतांनी विजयी झाले. देशात काँग्रेस लहर असल्याने पुन्हा ते काँग्रेस सत्तेत आले. विरोधात असतांनाही गांधी साहेबांनी कामे करून दाखवली आणि त्या कामाच्या जोरावर २०१४ मध्ये पुन्हा तिसऱ्यांदा खासदार झाले. २ लाखाहून जास्त मताधिक्याने ते विजयी झाले. जैन समाजाचे लोकसभेत ते एकमेव खासदार होते. केंद्रात भाजपाची सत्ता असल्याने त्यांनी अनेक अशक्यप्राय कामे शक्य करून दाखवली. मुद्रालोन स्कीम मध्ये देशात सर्वाधिक कर्ज वाटप करून छोटे व्यापारी व उद्योजकाना चालना दिली. पासपोर्ट ऑफिस आणले, रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण करून देशात दुसरा नंबर पटकवला. गोल्ड क्लस्टर, टेक्सटाईल क्लस्टरची निर्मिती केली. प्रत्येक वर्षी १०० टक्के खासदार निधी खर्च करणारा खासदार म्हणून त्यांची ओळख होती. गोरगरीब गरजूंची लग्न स्वस्तात व्हावी, त्यांना कार्यक्रमासाठी जागा उपलब्द व्हावी या हेतूने मतदार संघात १०० चे वर गावात सभागृह व समाज मंदिरे बांधली, जलसंधारणाची कामे केली. 
खासदारकीचे काम करत असतांना पक्ष वाढीच्या कामात ते नेहमीच अग्रेसर असत. सर्वासाठी त्यांच्या घराची दारे सतत उघडी असत. प्रत्येक कार्यकर्त्याला नावाने ओळखणारे खरे लोकनेते ते होते. आलेला प्रत्येक फोन ते स्वतः उचलत, काही मीटिंगमुळे मोबाईल उचलू न शकल्यास ते परत फोन करत असत. त्यांच्या कडे येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याची अस्थेने ते विचारपूस करणार, चहा पाणी करणार, घेऊन आलेले काम होणार असेल तर हो म्हणणार त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आणि काम होण्यासारखे नसेल तर स्पस्ट नाही म्हणणारे खासदार ते होते. सामान्य कार्यकर्त्यांची कदर करणारा हा नेता करोनाचा बळी ठरला आणि नगर जिल्ह्यातील सामान्य कार्यकर्ता पोरका झाला. स्वतःच्या पक्षावर, सामान्य कार्यकत्यांवर नितांत प्रेम करणारा निष्ठावान, लढवय्या व जीवनभर संघर्ष करणाऱ्या लोकनेत्यास नगर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ता कधीच विसरू शकणार नाही. जिह्यातील रस्ते , शहरातील उड्डाणपूल आणि विकासकामांच्या माध्यमातून  गांधी साहेब  सतत लक्षात राहतील. त्यांच्या योगदानाबद्दल अहमदनगर जिल्हा नेहमीच ऋणी राहील. 
अश्या ह्या संघर्षमयी माझ्या नेत्यास, माझ्या मित्रास, निष्ठावान व लढवय्या लोकनेत्यास प्रथम स्मृतिदिना निमित्त *विनम्र भावशब्दांजली*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻    सुनील रामदासी

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post