कापड बाजारातील फेरीवाल्यांना कायमस्वरुपी हटवावे
मनसेचा मनपा आयुक्तांना निवेदनाद्वारे इशारा
व्यापारी बांधवांच्या पाठिशी मनसे खंबीरपणे उभी राहणार- सचिन डफळ
नगर - कापड बाजारातील फेरीवाल्यांना कायमस्वपी हटविण्यात यावे, या मागणी निवेदन मनपा उपायुक्त डॉ.प्रदीप पठारे यांना देऊन त्यांच्याशी मनसे पदाधिकार्यांनी चर्चा केली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सचिव नितीन भुतारे, विद्यार्थी सेनेचे सुमित वर्मा, तुषार हिरवे, दिपक दांगट, संकेत व्यवहारे, संतोष साळवे, संकेत जरे, प्रकाश गायकवाड, शुभम जरे, विशाल जरे, विनोद काकडे आदि उपस्थित होते.
आयुक्तांच्या नावे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कापड बाजारातील एम.जी.रोड, मोचीगल्ली, शहाजीरोड व पसिरात फेरीवाल्यांनी अतिक्रमणे केलेली आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या घटनेमुळे मनपाने या परिसरातील अतिक्रमणे काढून आपली स्वत:ची पाठ थोपटून घेतली. घडलेली घटना पहिल्यांदाच घडली असे नाही, अशा प्रकारच्या घटना वारंवार या भागात घडत असतात. घटना घडली की जुजबी कारवाई करायची आणि पुन्हा जैसे थे चालू असे प्रकार नित्याचे झाले आहेत. मागील काळात सुद्धा या भागातील व्यापारी बांधवांनी वारंवार निवेदने, आंदोलने या माध्यमातून आपले डोळे उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु मनपा प्रशासन झोपल्याचे सोंग घेत आहेत आणि हीच आपली झोप एक दिवस जातीय दंगलीची ठरणार आहे. या परिसरात महिला, मुलींची होणारी छेडछाड ही तर नित्याची बाब झाली आहे.
तरी या भागातील अतिक्रमाणे कायमस्वरुपी हटविण्यात यावी, अन्यथा मनसे आपल्याला सुद्धा कार्यालयात निट काम करु देणार नाही, याची नोंद घ्यावी, असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.
यावेळी सचिन डफळ म्हणाले, व्यापारी बांधवांची अवस्था तर आपलीच मोरी..... चोरी... अशी झाली आहे. फेरीवाल्यांनी व्यापार्यांचे जगने कठिण केलेले आहे. आपल्या प्रशासनामुळे नगरची प्रसिद्ध असलेली ही आपली बाजारपेठ उद्धस्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण सदर बाजारपेठ उध्वस्त होवू न देण्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. व्यापारी बांधवांसाठी यापुढे मनसे खंबीरपणे त्यांच्या पाठिशी उभी राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी नितीन भुतारे म्हणाले, कापड बाजारातील अतिक्रमाणाबाबत मनसेने वारंवार आवाज उठवून देखील प्रशासन फक्त चिरीमिरीसाठी महिला व मुलींबरोबर व्यापार्यांची लाज चव्हाट्यावर आणत आहेत. बाजारपेठेत अतिक्रमण केलेल्या गुंडांची दहशत आहे. व्यापार्यांवर दमदाटी करुन हल्ले करण्याचे प्रकार नित्याचे झालेले आहेत. व्यापारी बांधव कोट्यावधी रुपये खर्च करुन दुकाने थाटतात. या व्यापार्यांच्या माध्यमातून लाखो रुपये कर नियमितपणाने मनपाकडे जमा करीत असतात. परंतु आपण काय करता? जो व्यापारी कर भरुन आपल्या शहराच्या वैभवात भर घालतो, त्याला वाईट वागणूक आणि जो त्यांच्या कोट्यावधी रुपयांच्या दुकानासमोर अतिक्रमण करतो, त्याच्याकडून चिरिमिरी घेऊन सन्मानाची वागणूक देता ही शरमेची बाब आहे.
---------
Post a Comment