शहर जिल्हा भाजपाच्यावतीने मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीगेट येथे निदर्शने



     नगर -  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ईडीने अटक केलेल्या राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी शहर जिल्हा भाजपाच्यावतीने दिल्लीगेट येथे निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी ज्येष्ठ नेते अभय आगरकर, सुनिल रामदासी, सरचिटणीस तुषार पोटे, विधानसभा प्रमुख शशांक कुलकर्णी, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, सचिन पारखी, शिवाजी दहिंडे, जगन्नाथ निंबाळकर, नगरसेवक भैय्या परदेशी, बाबासाहेब गायकवाड, पंकज जहागिरदार, चंद्रकांत पाटोळे, राजु मंगलाराम्, अमोल निस्ताने, सुमित बटुळे, सुजित खरमाळे, आदेश गायकवाड, ज्ञानेश्वर धिरडे, ऋग्वेद गंधे, हुजेफा शेख, ज्योती दांडगे आदिंसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
     याप्रसंगी अ‍ॅड.अभय आगरकर म्हणाले, राज्य सरकारमधील मंत्री सत्तेचा दुरोपयोग करुन स्वत:ची तिजोरी भरत आहे. त्यामुळेच एक-एक मंत्री अनेक घोटाळ्यात अडकत आहे, या भ्रष्टमंत्र्यांची जेलवारी सुरु झाली असून, या पुढील काळातही आणखी काही भ्रष्टमंत्री जेलमध्ये गेलेले दिसतील. मंत्री नवाब मलिक यांचे देशद्रोही अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे उघड झाले आहे, त्यांच्यात झालेल्या व्यवहाराचा पर्दाफास ईडीने केला आहे. अशा भ्रष्ट व देशद्रोह्यांशी संबंध असणार्‍या मंत्र्याला पदावर राहण्याचा काहीएक अधिकार नाही, तेव्हा या मंत्र्यांचा सरकारने राजीनामा घ्यावा. अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल असे सांगितले.

     याप्रसंगी सुनिल रामदासी म्हणाले, नवाब मलिक यांना पुर्ण पुराव्यानिशी अटक केली आहे, तरीही महाविकास आघाडी सरकार नवाब मलिक यांना पाठिशी घालत आहे. नैतिकदृष्ट्या मंत्री म्हणून पदावर राहण्याचा त्यांना कोणताच अधिकार नाही, तेव्हा त्यांनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना काढून टाकावे, अशी मागणी केली.

     यावेळी कार्यकर्त्यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणा बाजी केली, महाविकास आघाडी म्हणजे गुंडांची टोळी, आघाडी सरकारचा निषेध असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

--------

     

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post