नगर - पोलिस हे जनतेचे रक्षक असून नागरिकांबरोबरच त्यांच्या मालमत्ता संरक्षण आणि सुरक्षा प्रदान करण्याचे काम पोलिसांच्यावतीने सुरु आहे. आज गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असलेतरी प्रामाणिक व कर्तव्य दक्ष पोलिसांच्या जागरुकतेने गुन्हेगारांच्या मुसक्य आवळल्या जात आहे. असेच कार्य अल्ताफ मोहियोद्दीन शेख यांनी आपले कर्तव्य बजावत आपल्या कामाने वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची राष्ट्रपती पदक जाहीर झाले, ही नगरकरांच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन सक्षम फौंडेशनचे निलेश भिंगारदिवे यांनी केले.
अहमदनगर पोलिस दलातील उत्कृष्ट कार्याबद्दल मुकुंदनगर येथील अल्ताफ मोहियोद्दीन शेख यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल सक्षम फौंडेशनच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी फौंडेशनचे अध्यक्ष शाहनवाज तांबोली, निलेश भिंगारदिवे, आडत व्यापारी धीरज कटारिया, अशफाक सय्यद, तन्वीर शेख, व्ही.मते, विलास पंडित, मनिष हरदवाणी आदि उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देतांना अल्ताफ शेख म्हणाले, आपण आपले प्रामाणिकपणे काम केल्यास कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाही. पोलिसांबद्दल जनतेने आदर निर्माण व्हावा, त्यांच्या अडचणी काळात मदत व्हावी, यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असतो. या सत्काराने आपणास प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी शाहनवाज तांबोळी यांनी फौंडेशनच्या कार्याची माहिती दिली. शेवटी धीरज कटारिया यांनी आभार मानले.
Post a Comment