नगर - शहरात विविध भागामध्ये शिवसेनेच्या अनेक शाखा आहेत. शहराच्या मध्यवर्ती परिसरासह सावेडी, बोल्हेगाव, नागापूर, केडगाव व कल्याण रोड अशा उपनगर परिसरामध्ये शिवसेनेला व हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा वर्ग मोठा आहे. शहरातील शिवसेनेचे सर्वेसर्वा स्व. अनिलभैय्या राठोड यांनी अनेक वर्षे सामान्य नागरिक व प्रत्येक घटकातील नागरिकांचे प्रश्न सोडविले. शहराच्या प्रत्येक कानाकोपर्यात त्यांनी शिवसेना रुजवली. या माध्यमातून शहरात शिवसेनेचे मोठे जाळे निर्माण केले. स्व.अनिलभैय्या राठोड यांनी सर्वसामान्यांसाठी, सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी ज्या पद्धतीने काम केले, त्याच पद्धतीने कार्यकर्त्यांना ताकद देऊन शहराच्या प्रत्येक भागात शिवसेना रुजविण्याचे, नव्याने शाखा तसेच जुन्या शाखांचे बळकटीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी दिली.
शिवसेना अध्यक्ष तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार नगर शहरात शिवसेनेचे कार्यकर्ते संभाजी कदम यांच्यावर पुन्हा एकदा नगर शहरातील शिवसेनेची धुरा सोपविण्यात आली आहे. शहरप्रमुख पदाचा कार्यभार त्यांच्यावर सोपविण्यात आला आहे. पक्षाच्या आदेशानुसार संभाजी कदम यांनी नगर शहरातील शिवसेनेचे बळकटीकरण, पक्षाची संघटनात्मक बांधणी, नवीन शाखांसह जुन्या शाखांचे नूतनीकरण आदींवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यादृष्टीने पदाधिकारी, कार्यकर्तेव विभाग प्रमुखांच्या भेटीगाठी त्यांनी सुरू केल्या आहेत.
संभाजी कदम यांनी यापूर्वीही स्वर्गीय अनिलभैय्या राठोड यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली शहर प्रमुख म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. त्या काळात संपूर्ण शहरात शिवसेना कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण झाले होते. त्यादृष्टीनेच संभाजी कदम यांनी नव्याने संघटना बळकटीकरणासाठी पावले टाकली आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना संभाजी कदम यांनी सांगितले की, नगर शहरामध्ये शिवसेनेला, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना मानणारा वर्ग मोठा आहे. शिवसेनेने पक्षाच्या स्थापनेपासून समाजकारण व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे याच मुद्द्यावर सर्वाधिक भर दिला आहे. नगर शहरामध्येही स्व. अनिल भैय्या राठोड यांनी मागील 30 ते 40 वर्षे शिवसेनेच्या माध्यमातून काम करताना सर्व सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून काम केले. पंचवीस वर्षे आमदार असतानाही त्यांनी सामान्य कार्यकर्ता याच भूमिकेतून कायम सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्याचे व उपेक्षितांना न्याय देण्याचे काम नगर शहरामध्ये केले. सामान्यांसाठी स्व.अनिलभैय्या राठोड यांनी शिवसेनेच्या माध्यमातून केलेल्या कामामुळे नगरकरांमध्ये शिवसेनेबाबत मोठा विश्वास आहे. यापुढील काळातही त्याच पद्धतीने शिवसेना व शिवसेनेचे कार्यकर्ते काम करत राहणार आहेत.
आज राज्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार आहे. स्वतः उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रसह नगरवासीयांच्याही शिवसेनेकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यातच नगर शहरामध्येही महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे या महापौर आहेत. त्यामुळे सामान्यांचे प्रश्न सोडवणे व शहरातील प्रत्येक भागातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी या पुढील काळात शिवसेनेचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी शहराच्या प्रत्येक भागात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले जाणार आहे. नगर शहर व उपनगर परिसरामध्ये शिवसेनेच्या शाखा आहेतच, यातील काही शाखांचे नूतनीकरण व बळकटीकरण केले जाणार आहे. काही भागात नव्याने शाखा सुरू केल्या जाणार आहेत. उपनगर विभाग प्रमुखांच्या निवडी केल्या जाणार आहेत. शहराच्या अनेक भागातून नवीन कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील नागरिक पक्षाच्या कार्यात सक्रिय होण्यास तयार आहेत. त्यांनाही सामावून घेतले जाणार आहे. त्यादृष्टीनेच शहराच्या सर्व भागातील कार्यकर्तेव पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा करत आहे. पक्षातील जुने कार्यकर्ते, नव्याने येणारे कार्यकर्ते, सर्व नगरसेवक, पदाधिकारी, महिला आघाडी यासह सर्वांना बरोबर घेऊन पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे कदम यांनी सांगितले.
स्व. अनिलभैय्या राठोड यांच्या निधनानंतर नगर शहरात शिवसेना संपणार, अशा चर्चा काहीजण घडवून आणत आहेत. मात्र, स्व. राठोड यांनी शहरामध्ये हजारो कार्यकर्त्यांची फौज उभी केली आहे. कोणी कितीही चर्चा घडवून आणल्या तरी सामान्यांच्या मदतीसाठी, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी नगर शहरात शिवसेना खंबीर आहे व यापुढील काळातही राहील. स्वर्गीय अनिल भैया राठोड यांचे आशीर्वाद कायम शिवसैनिकांच्या पाठिशी आहेत. त्यांच्या विचारानुसार व त्यांना अभिप्रेत असलेले कार्य सर्व शिवसैनिक एकदिलाने यापुढील काळातही करत राहतील, असा विश्वासही संभाजी कदम यांनी व्यक्त केला.
Post a Comment