रुग्णालय दुर्घटना प्रकरणी तपासानंतर कलमामध्ये वाढ होऊ शकते : बी जी शेखर पाटील



नगर दि 8 प्रतिनिधी

नगर जिल्हा रुग्णालयामध्ये घडलेली घटना अतिशय दुर्देवी आहे. या घटनेने संदर्भातला तपास पोलिस स्वतंत्ररीत्या करत आहे. या प्रकरणांमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. पण दुसरीकडे आम्हीसुद्धा एक्सपर्ट टीम बोलून सर्व माहिती एकत्रित करत  आहोत. तपासानंतर कलमांमध्येही वाढ होऊ शकते, अशी स्पष्टोक्ती नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी जी शेखर पाटील यांनी दिली.

बीजी शेखर यांनी आज नगर येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये घडलेल्या घटनेच्या संदर्भामध्ये समक्ष जिल्हा रुग्णालयांमध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, नगर शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासह पोलिस अधिकारी यावेळी उपस्थित होते.

बी जी शेखर म्हणाले की, नगर जिल्हा रुग्णालय मध्ये घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे.  आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज यासंदर्भात मिळालेले आहे. एखादी बाहेरील व्यक्ती आपल्या कुटुंबातील व्यक्तीला वाचवण्यासाठी प्रयत्न करते. मात्र जिल्हा रुग्णालयातील ज्यांचे कर्तव्य होते, त्यातील काहीजण मदत कार्यात दिसत नाहीत, ही सुद्धा बाब निदर्शनास आलेली आहे. त्या संदर्भातील चौकशी सुरू आहे. जर वेळेमध्ये या रुग्णांना बाहेर काढले असते, तर निश्चितपणे काहींचे प्राण सुद्धा वाचले असते. यात निष्काळजीपणा करणारे जे जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई पोलिस करणार असून या सर्व बाबींचा तपास सध्या सुरू आहे. दोन दिवसापासून सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य माहिती सुद्धा पोलिसांनी घेतली आहे. काही जणांचे जबाब सुद्धा घेण्यास सुरुवात झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

महावितरण विभागाचे अधिकारी सुद्धा नगर येथे दाखल झालेले आहे. तेसुद्धा या घटनेची माहिती घेऊन नेमका हा प्रकार कशामुळे घडला याचा तपास करत आहे. आग कशामुळे लागली हे तपासानंतरच आता निष्पन्न होईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ज्या ठिकाणी आग लागली तेथे ट्रिप होऊन वीज खंडित झाली होती, असे दिसून येत आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, समितीचा तपास प्रशासकीय दृष्ट्या सुरू आहे. त्यांची चौकशी स्वतंत्र असून, आम्ही गुन्हा झाला त्यानुसार आमचा स्वतंत्र तपास सुरू आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post