क्रांतिकारक वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्ताने विशेष लेख

क्रांतिकारक वीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्ताने विशेष लेख 1857 च्या रणसंग्रामाचे क्रांतिकारक वीर बाबुराव शेडमाके ब्रटिश सत्तेविरुद्ध प्रथम लढा देणारे आणि येथील सरंजामी व सावकारशाही व्यवस्थेच्या विरोधात एल्गार पुकारणार्या आदिवासी क्रांतिकारकांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात फार मोठे योगदान दिले आहे हे कदापि विसरता येणार नाही . पाचशे वर्षाचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या चंद्रपूर जिल्ह्यावर यापूर्वी गोंड राजांची सत्ता होती. चंद्रपूर जिल्ह्यात गोंड राजाची साक्षी देणारी अनेक ऐतिहासिक स्मृतिस्थळे आहेत. याच गोंड राजसत्तेत महाराज पुल्लेसुर बापू व त्यांच्या पत्नी जूरजाकुवर यांचे पोटी तारीख 12 मार्च 1833 रोजी सध्याच्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील मोलमपल्ली गावी एका राजगोंड आदिवासी जमातीत विर बाबुराव पुलेसूर शेडमाके यांचा जन्म झाला.विर शेडमाके हे लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे होते. गोटुल संस्कार केंद्राचे शिक्षण पूर्ण करून ते शिक्षित झाले . गोटूल मध्येच तलवारबाजी ,भालाफेक इत्यादी शस्त्र चालवण्यात ते तरबेज झाले . अनेक युद्ध कौशल्यात ते निपुण होते. अशाच एका प्रसंगी वीर बाबुराव व त्यांचे मित्र खेळता खेळता जंगलात वेना नदीच्या किनारी फिरावयास गेले असता त्यांना एका झाडावर चित्ता दिसला तो पाहून बाबुराव यांचे सर्व मित्र घाबरले परंतु वीर बाबुराव यांनी त्यांना धीर दिला त्याचवेळी चित्त्याने झाडावरून वीर बाबुराव यांच्यावर उडी घेतली. प्रसंगावधान राखून वीर बाबुराव यांनी चित्याचे दोन्ही पाय पकडून पूर्ण ताकदीने त्यास फिरवून फिरवून जमिनीवर आपटले तेव्हा चित्त्याने तेथून लागलीच धूम ठोकली. या घटनेमुळे वीर बाबुराव यांच्या साहसी वृत्तीची चर्चा सर्वत्र झाली. गोटूल संस्कार केंद्रामध्ये गोंडी, हिंदी, तेलगू इत्यादी भाषा शिकविल्या जात होत्या त्यावेळी राजे महाराजे आपला राज्यकारभार गोंडी भाषेत करीत असत आजही गोंडी भाषा अस्तित्वात आहे मात्र या गोंडी भाषेचा विकास स्वतंत्र भारतात झाला नाही तसेच तिला घटनात्मक दर्जा प्रधान करण्यात आला नाही हे दुर्दैव ! वीर बाबुराव शेडमाके चौदा वर्षाचे झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते लॉर्ड डलहौसी यांनी सुरू केलेल्या इंग्रजी विद्यालयात दाखल झाले .तेथील शिक्षण पूर्ण करून तेथूनच त्यांचे परिवर्तन झाले . यानंतर आंध्र प्रदेश राज्यातील आदिलाबाद या जिल्ह्यातील चेनूर येथील राजकुवर या कन्येशी तारीख 9 मार्च 1851 रोजी त्यांचा विवाह संपन्न झाला . मोलमपल्ली, अडपल्ली, घोट या तीन विभागांची सत्ता शेडमाके या घराण्याकडे होती. त्या काळात ब्रिटिशांच्या छत्रछायेखाली काही सावकार जनतेचे शोषण करत होते. सावकारांच्या जाचातून जनतेची सुटका व्हावी असे वीर बाबुराव शेडमाके यांना वाटत होते. याचाच परिणाम म्हणून त्यांनी घोट परिसरातील रमय्या सावकार व देवलमरी येथील कोंड्या सावकारास चांगली अद्दल घडवून त्यांच्याकडील धनसंपत्ती लुटून गरिबांना वाटून टाकली तसेच त्यांच्याकडील कर्जाच्या दप्तराची होळी केली. ब्रिटिशांच्या जुलमी सत्तेला उलथवून टाकण्यासाठी घोट येथील किल्ल्यात त्यांनी आपली स्वतःची एक प्रशिक्षीत अशी जंगोम सेना तयार केली . आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी वीर बाबुराव शेडमाके यांनी सर्वच जाती, धर्मियांना आवाहन केले. त्यास प्रतिसाद देऊन गोंड आदिवासी, गोवारी ,दलित, कुणबी, मराठा, तेली तसेच मुस्लिम हे सुद्धा वीर शेडमाके यांच्या सेनेत सामील झाले .आपली 500 जंगोम सेना उभी करून वीर बाबुराव शेडमाके यांनी ब्रिटिश सेनेवर हल्ला करण्याचे सत्र सुरू करुन त्यांना सळो की पळो करुन सोडले. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपल्या भारतमातेला मुक्त करण्यासाठी त्यांनी जुलमी ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा सुरू केला. ब्रिटिशांनी चांदागढमध्ये आपले अधिकार प्राप्त करताच विर बाबुराव शेडमाके यांनी सन 1857 ला ब्रिटिशांच्या विरोधात बंड पुकारले .सर्वप्रथम ब्रिटिशांचा हस्तक असलेला राजगडचा गेडाम जमीनदार याच्यावर चाल करून त्याचा सात मार्च 1857 रोजी शिरच्छेद केला.ही बातमी ब्रिटिश सेनेला समजताच त्यांना फार मोठा हादरा बसला. त्यांनी राजगढ परगण्याकडे धाव घेतली. गडीसुरला, नांदगाव,घोसरी येथे तारीख 13 मार्च 1857 रोजी ब्रिटिश सेना व वीर शेडमाके यांची क्रांतिसेना यांच्यामध्ये चकमक उडाली . आडपलीचे जमीनदार व्यंकटराव राजेश्वर हे शेडमाके यांना येऊन मिळाले . या लढाईत अनेक ब्रिटिश सैनिक मारले गेले. तुंबळ अशी लढाई होऊन घोसरी येथे ब्रिटिश सेनेचा निर्णायक पराभव झाला . पुढे अशीच एक लढाई संगणापुर येथे तारीख 19 एप्रिल 1857 रोजी होऊन याही लढाईत ब्रिटिश सेनेचा पराभव होऊन वीर शेडमाके यांच्या सेनेचा विजयी झाला. चांदागढचे मॅजिस्ट्रेट कॅप्टन क्रिक्टन यांना ही वार्ता समजतात त्यांनी ब्रिटिश सेनेची दुसरी तुकडी प्रचंड शस्त्रसाठा तसेच दारूगोळ्यासह वीर शेडमाके यांना पकडण्यासाठी रवाना केली. तारीख 27 एप्रिल 1858 रोजी बामनपेठेची लढाई तसेच तारीख 29 एप्रिल 1858 रोजी चीचगुडी येथे ब्रिटिश अधिकारी यांच्या छावणीवर केलेला हल्ला या दोन्ही लढाईत पुन्हा एकदा ब्रिटिशांचा पराभव होऊन त्यांचे अनेक सैनिक मारले गेले. काही सैन्यांनी शरणागती पत्करली. या हल्ल्यात टेलीफोन गार्ड लॅड व हॉल ठार झाले . इ.स. 1851 ते 1861 पर्यंत अहेरी राजसत्ता राजमाता लक्ष्मीबाई अत्राम यांच्याकडे होती परंतु या परिसरात वीर बाबुराव शेडमाके यांचे वर्चस्व होते. विर शेडमाके यांना पकडण्यासाठी नागपूर येथून कॅप्टन शेक्सपियर यांना अहेरीला बोलविण्यात आले.कॅप्टन क्रिकटन यांचा गुप्त खलिता घेऊन कॅप्टन शेक्सपियर अहेरीला पोहोचला. त्याने राजमाता लक्ष्मीबाई अत्राम यांना गुप्त खलीता सोपविला त्या गुप्त खलीत्यात म्हटले होते की ब्रिटिश सरकारच्या अधिपत्याखाली अहेरी जमीनदाराच्या घोट, आडपली आणि मोलमपल्ली या उपजमीनदारीचे जमीनदार बाबुराव शेडमाके आणि व्यंकटराव यांच्याद्वारे ब्रिटिश प्रशासनाविरुद्ध विद्रोह करिता राजद्रोहाच्या आरोपाबरोबर ब्रिटिश अधिकारी लॅड आणि हॉल यांना ठार केल्याचा आरोप आहे .जर या दोघांना पकडून ब्रिटिश सत्तेकडे स्वाधीन केले नाही तर अहेरी जमीनदारी जप्त केली जाईल यानंतर आपला कोणताही अधिकार राहणार नाही .हा गुप्त खलिता वाचल्यानंतर लक्ष्मीबाई यांनी वीर शेडमाके यांना पकडून देण्याची अट मान्य केली. कॅप्टन शेक्सपियर यांनी प्रचंड फोजफाटा घेऊन मोलम पलीकडे आगेकूच केली.वीर शेडमाके व बंधू व्यंकटराव हे घोट परिसरात परसापेन पूजा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येणार आहेत ही बातमी ब्रिटिश गुप्तहेराद्वारे कॅप्टन शेक्सपिअरला समजली. तातडीने त्यांनी आपल्या सैन्याला घोट परिसराकडे जाण्याचा आदेश दिला .तारीख 10 मे 1858 रोजी वीर शेडमाके यांची सेना व ब्रिटिशांची बलाढय सेना यांच्यात घोट परिसरात जोरदार धुमचक्रीच झाली .विर शेडमाके यांची तोकडी सेना तर ब्रिटिशांची दहा पट असलेली बलाढ्य सेना कसा निभाव लागणार! वीर शेडमाके यांची ताकद कमी पडत होती मात्र असे असूनही त्यांनी ब्रिटिश सेनेला जोरदार प्रत्युत्तर दिले. या युद्धात दोन्ही बाजूंचे सैनिक धारातीर्थ पडले . हजारो महिला पुरुषांच्या रक्ताने घोट परिसराची माती लाल झाली होती. समोर पराभव दिसत होता या लढाईत वीर शेडमाके यांचे सैनिकांना चंदागढ येथे बंदिवान करण्यात आले मात्र वीर शेडमाके व व्यंकटराव सुखरूप निसटले. गोंडवानाची महाराणी राणी दुर्गावती यांच्या स्मृतिदिनी तारीख 24 जून 1858 रोजी कपटनीतीने राजमाता लक्ष्मीबाई यांच्या रोहिला सेनेने विर शेडमाके यांना पकडले व त्यांना अहेरीला घेऊन मार्गस्थ झाले. यावेळी विर शेडमाके यांनी आपल्याच बांधवांना उपदेश केला. बंधुनो मी तुमचा शत्रू नाही कारण तुम्ही गोंडवानाचे रहिवाशी आहात . मी आपल्या या मातृभूमी करता संघर्ष करत आहे तुम्ही आजही गुलाम आहात उद्या सुद्धा गुलामच राहणार आहात . पुढे येणारी पिढी तुम्हाला कदाचित माफ करणार नाही हे विचार ऐकून रोहिला सैनिक भावनिक झाले त्यांनी विर शेडमाके यांना मुक्त केले . अशाच एका प्रसंगी तारीख 15 सप्टेंबर 1858 रोजी ब्रिटिश सेना तारसा घाटावरून वैनगंगा नदी पार करून जात असल्याचे समजले याचाच फायदा घेण्याचा विचार विर शेडमाके यांनी केला.कारण वैनगंगा नदीचा किनारा दूर होता एका किनार्यावरून दुसरा किनारा दिसत नव्हता त्यामुळे एक तुकडी ब्रिटिश सेना नदी पार करतात घाटातच विर शेडमाके यांची सेना त्यांच्यावर हल्ला करत व ब्रिटिश सेनेला ठार मारून त्यांचे प्रेत नदीपात्रात सोडून देत असत अशा प्रकारे ब्रिटिश सेनेचे एकूण 700 सैनिक मारले गेले. ही वार्ता चांदागढचे मॅजेस्ट्रेट कॅप्टन क्रिक्टन यांना समजतात ते प्रचंड क्रोधित झाले. वीर शेडमाके यांच्या युद्धनीतीपुढे ब्रिटिश सरकार हतबल झाले. विर शेडमाके यांना सरळ प्रत्यक्ष युद्धात पराजित करणे अवघड आहे याची जाणीव कॅप्टन क्रिक्टन यांना झाली .त्यांनी फोडा - झोडा व राज्य करा या कुटनितीचे धोरण अनुसरले. राजमाता लक्ष्मीबाई अत्राम यांना फितूर करुन त्यांचे सैन्य विर शेडमाके यांच्या सैन्यात घुसवले . लक्ष्मीबाई अत्राम यांचे सैन्य वीर शेडमाके यांच्या सर्व हालचाली बाबत गुप्त माहिती पुरवीत असत. तारीख 18 सप्टेंबर 1858 रोजी लक्ष्मीबाई अत्राम यांनी विर शेडमाके यांना अभिनंदनपर पत्र पाठवून अहेरीला येण्याचे निमंत्रण दिले दोघांमध्ये महत्त्वपूर्ण अशी चर्चा झाली . त्यानंतर भोजन प्रसंगी कॅप्टन शेक्सपियर यांनी दगलबाजीने वीर शेडमाके यांना पकडले.विर शेडमाके यांना अटक करून चांदा (सध्याचे चंद्रपूर) येथे तुरुंगात बंदिस्त करण्यात आले. प्रत्येक लढाईत वीर शेडमाके यांनी ब्रिटिश सेनेचा पराभव केला मात्र भारतीयांना मिळालेल्या फितूरच्या शापामुळेच वीर शेडमाके यांना पकडण्यात ब्रिटिशांना यश आले . आणि तो दिवस उजाडला ! विर शेडमाके यांच्या फाशीची तारीख ठरली विर शेडमाके यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल होऊन कॅप्टन क्रिक्टन यांनी कशाचाही विलंब न लावता तारीख 21 ऑक्टोबर 1858 रोजी विर बाबुराव शेडमाके यांना संध्याकाळी साडेचार वाजता चांदागढ येथील मध्यवर्ती कारागृहात पिंपळाच्या झाडाला लटकवून फाशी देण्यात आली. जाज्वल देशभक्ती आणि राष्ट्रीय एकतेचा पुरस्कार करणारे आणि हसत हसत फासावर जाणारे विर बाबुराव पुलेसूर शेडमाके यांना त्यांच्या 192 व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम ! मा. काशिनाथ गवारी आदिवासी अभ्यासक 8888697428

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post