चौंडी राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी प्रयत्नशील :प्रा. राम शिंदे

अहमदनगर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती महोत्सव वर्षाला येत्या 31 मेपासून सुरुवात होणार आहे, त्यामुळे त्यांचे जन्मस्थळ असलेले जामखेड तालुक्यातील चौंडी हे गाव राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे, अशी माहिती विधान परिषदेचे आमदार व अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समितीचे प्रमुख प्राध्यापक राम शिंदे यांनी येथे दिली. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299 व्या जयंतीनिमित्त येत्या 31 मे रोजी चौंडी येथे विविध कार्यक्रम होणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे, महादेव जानकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती देऊन प्राध्यापक शिंदे म्हणाले, या जयंती महोत्सवानिमित्ताने आम्ही अहिल्याच्या लेकी-जागर नारी शक्तीचा...हा महिला किर्तन महोत्सव 28 मे पासून चौंडीमध्ये होणार आहे. 31 मे रोजी जयंतीच्या दिवशी पहाटे महाअभिषेक, पालखी सोहळा व काल्याचे किर्तन आणि महाप्रसाद वाटप होणार आहे. त्यानंतर पुढील वर्षी 2025 मध्ये अहिल्यादेवी होळकर यांचा 300 वा जयंती समारंभ होणार आहे. त्यामुळे या त्रिशताब्दी जयंती महोत्सव वर्षाची सुरुवात येत्या 31 मे रोजी होणार आहे. या पूर्ण वर्षभरात देशात, राज्यात व जिल्ह्यात भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. या वर्षभरात चोंडी हे गाव राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित होऊन त्यादृष्टीने परिसराचा विकास करण्याचे नियोजन आहे, असे सांगून प्राध्यापक शिंदे म्हणाले, मागील वर्षी 31 मे 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचे घोषित केले होते. त्या दृष्टीने सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य मंत्रिमंडळाने नामकरणाचा हा विषय मंजूर केला आहे व अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला आहे. त्यामुळे लवकरात लवकर केंद्र सरकारकडून या नामकरणाची अंमलबजावणी अपेक्षित आहे, असे ते म्हणाले.

 मी निधी सुरू केला 

1995 पूर्वी चौंडी या गावाला जायला रस्ता नव्हता. हे दुर्लक्षित तीर्थक्षेत्र होते. 1995 मध्ये युती सरकार आल्यावर तत्कालीन ग्रामविकास मंत्री अण्णा डांगे यांनी सर्वांचे लक्ष चोंडीकडे वेधले. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना चौंडीला आणले. त्यावेळी चोंडी विकासासाठी दोन कोटीचा निधी मिळाला. तेव्हापासून तो निधी पुढेही येत गेला, पण 1999 ते 2008 पर्यंत असा विकास निधी आलाच नाही. 2008 मध्ये तत्कालीन पर्यटन मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी चौंडीच्या शिल्पसृष्टीसाठी 80 लाखाचा निधी दिला. त्यानंतर मी मंत्री झाल्यावर चौंडीतील विकास कामांचा निधी नियमितपणे सुरू झाला व त्यानंतर चोंडीच्या विकासाला गती मिळाली, असा दावाही प्राध्यापक शिंदे यांनी केला. दरम्यान, 31 मे रोजी अहिल्यादेवी जयंती महोत्सवानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत निलेश लंके यांचा आमदार म्हणून असलेल्या उल्लेखाबद्दल बोलताना प्राध्यापक शिंदे म्हणाले, ज्यावेळेस ही निमंत्रण पत्रिका तयार होत होती, त्यावेळी लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला नव्हता, म्हणून त्यांचे नाव पत्रिकेत आमदार म्हणून राहिले. आता लोकांनी ते माजी आमदार म्हणून वाचावे, अशी टिपणीही त्यांनी केली.
--
चौकट -1

आम्ही पवारांचे नाव काढले नाही 

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, चौंडी हे माझे गाव आहे. अहिल्यादेवींचे माहेर असलेल्या शिंदे परिवाराचा मी घटक आहे. दोन वेळा गावचा सरपंच, दोन वेळा आमदार व जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी काम केले आहे. मात्र, 2022 च्या जयंती महोत्सवाच्या पत्रिकेत माझे नाव नव्हते, मला बोलावलेही नाही. माझ्या घरात मला स्थानबद्ध केले होते. त्यावेळी 31 मे 2022 चा जयंती महोत्सव मी घरात केला. मात्र अहिल्यादेवींची माझ्यावर कृपा असल्याने लगेच 7 जून 2022 ला राज्याच्या वरिष्ठ सभागृहात पोहोचण्यासाठी मला तिकीट मिळाले व वीस दिवसात मी आमदारही झालो. मात्र, आम्ही जयंती महोत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेत कोणाचेही नाव टाळले नाही. रोहित पवारांचे नाव आम्ही टाकले, असे सूचक भाष्यही त्यांनी केले.
---

चौकट दोन

कुकडीचे आवर्तन सुटणार

 कुकडीचे आवर्तन येत्या दोन-तीन दिवसात सुटेल असे सांगून प्रा. शिंदे म्हणाले, कर्जतच्या विद्यमान आमदाराला पाणी वाटप व अन्य प्रत्येक गोष्टीत त्यांचे फोटो व नाव टाकण्याचा हव्यास आहे, त्याला आमचा व प्रशासनाचाही आक्षेप आहे. शिवाय मी व खासदार सुजय विखे पाटील आम्ही कर्जत-जामखेड तालुक्यात टंचाईग्रस्त भागात पाणी वाटपाचे नियोजन केले आहे. तसेच कुकडीचे पाणी लवकरच येणार असल्याने जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, असा दावा त्यांनी केला.

---

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post