नीरव मोदीशी काही बोलणे झाले होते का? आ. प्रा. शिंदेंचा सवाल
अहमदनगर (प्रतिनिधी)-कर्जत-जामखेड तालुक्यात एमआयडीसी प्रस्तावित करताना त्याबाबत कधी मिटींग झाल्याचे सांगितले नाही, प्रस्तावीत जमिनीचा कधी सर्व्हे केला हे सांगितले नाही, कोणती जागा देणार व ती जागा नेमकी कोणाची होती, हेही सांगितले नाही. याबाबत नीरव मोदीशी काही बोलणे झाले होते का?, असा खोचक सवाल विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवारांना केला आहे.
नगरला कार्यक्रमानिमित्त आलेल्या आ. प्रा. शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. कर्जत तालुक्यातील एमआयडीसीवरून त्यांच्यात व आ. पवार यांच्यात वाद सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना आ. शिंदे म्हणाले, ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे जागेला विरोध का केला? फॉरेस्टची जागा का दाखवली, अशा प्रश्नांची उत्तरे आधी पवारांनी द्यावीत. मी फोटो काढायला कोठेही गेलो नाही. जागा दाखवण्याचे आवाहन करणारे पत्र सोशल मिडियात फिरले. सर्व नियम पूर्ण करणारी जागा सुचवण्याचे आवाहन केले होते. त्याला सर्वांचाच प्रतिसाद मिळाला. आता सर्व्हेही झाला व त्यावर आता उद्योग मंत्रालय आवश्यक ती कार्यवाही करेल, असेही शिंदेंनी स्पष्ट केले.
असे सर्व्हे फोल असतात
गुजरात, उत्तर प्रदेश एव्हडेच नव्हे तर नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीतही भाजपचा पराभव होणार असल्याचे सर्व्हे होते. पण पाचपैकी तीन राज्यात भाजप जिंकले. गुजरात व उत्तर प्रदेशही जिंकले. त्यामुळे निवडणूक पूर्व सर्व्हे हा फोलपणा आहे, असा दावा करून आ. प्रा. शिंदे म्हणाले, नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजप जिंकणार असे दाखवले आहे व त्याचवेळी मोदींच्याच नेतृत्वाखालील राज्यातील महायुती सरकारची हार होताना दाखवले आहे. त्यामुळे या सर्व्हेत तथ्य नाही व राज्यात महायुती सरकार लोकसभेच्या 45 हून अधिक जागा जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विरोधकांच्या इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरू शकत नाही. देशाची पाच ट्रिलीयन अर्थव्यवस्था करण्याचे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे. त्यामुळे त्यांची व मल्लिकार्जून खर्गे यांची तुलना होऊच शकत नाही, असा दावा करून आ. शिंदे म्हणाले, इंडिया आघाडीत एकमत झाले तरी भाजपला चिंता नाही. मोदी तिसर्यांदा मोठ्या मताधिक्याने पंतप्रधान होणार आहेत, असा विश्वासही आ. शिंदेंनी व्यक्त केला. दरम्यान, नगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. कोणाचाही त्याला विरोध नाही. सर्वांची ती अपेक्षा आहे. त्यामुळे जनतेची इच्छा ओळखून सरकार लवकरच याबाबत आवश्यक कार्यवाही करेल, असा विश्वासही आ. प्रा. शिंदे यांनी व्यक्त केला
Post a Comment