अहमदनगर : ज्यांच्या मनात जिल्हा विभाजन करायचे नाही, ते सत्तेपासून दूर झाल्याशिवाय जिल्हा विभाजनाचा प्रश्न ऐरणीवर येणार नाही व मार्गी लागणार नाही, असा दावा भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी शनिवारी येथे केला. या वक्तव्यातून त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावल्याचे मानले जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात काही कामानिमित्त आलेल्या आमदार प्रा. शिंदे यांच्याशी माध्यम प्रतिनिधी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज नगर व उस्मानाबादचे नामकरण धाराशिव करण्याबाबत एक विशिष्ट वेळ व परिस्थिती निर्माण झाली होती. तशी स्थिती नगर जिल्हा विभाजनाबाबत मी पालकमंत्री असतानाही झाली होती. मात्र, त्यावेळी निर्णय होऊ शकला नाही. पण आता ज्यांच्या मनात विभाजन करायचे नाही, ते सत्तेपासून दूर झाल्यानंतर विभाजनाचा निर्णय प्रश्न ऐरणीवर येईल व तो प्रश्न मार्गी लागेल, असा दावा करून प्रा. शिंदे म्हणाले, जसा जिल्हा नामकरणाचा प्रश्न सुटला व अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी नगर करण्याचा निर्णय झाला, तसा जिल्हा विभाजनाचा प्रश्नही सुटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा विभाजनाबाबत सर्व पक्षीय नेतृत्व, लोकप्रतिनिधी व प्रमुख नेत्यांनी या मुद्द्यावर एकत्र येऊन व जिल्हा विभाजनाला पाठिंबा देऊन निर्णय करण्याची आवश्यकता आहे असा सर्वसाधारणपणे सर्वांच्याच बोलण्यातून सूर निघतो, शिवाय सर्वांचीच मागणी असतानाही निर्णय का होत नाही ही जनतेची भावना आहे, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे, असे सूचक भाष्यही प्राध्यापक शिंदे यांनी केले.
जिल्हा विभाजन गरजेचेच
नगर जिल्ह्याचे विभाजन आवश्यक आहे व या विषयापासून कोणालाही दूर जाता येणार नाही. कारण, जिल्ह्यातील जनता आवश्यक सुविधांपासून वंचित राहते. अधिकारी सर्वांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. मोठा जिल्हा असल्याने प्रशासन चालवणारे अधिकारीही मेटाकुटीला येतात. त्यामुळे रत्नागिरी, ठाणे, परभणी या जिल्ह्यांचे विभाजन होत असताना नगर जिल्ह्याचे का होत नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर आहे. क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या दृष्टीनेही अनेक जिल्ह्यांमध्ये विभाजन झाले आहे. काही जिल्ह्यात दोन जिल्हे मिळून एक खासदार आहे तर आपल्या जिल्ह्यात दोन स्वतंत्र खासदार आहे. अशा स्थितीत जिल्हा विभाजन आवश्यकच आहे, असे मतही त्यांनी मांडले.
'बीआरएस'चा राष्ट्रवादीला फटका
तेलंगणातील भारत राष्ट्र समिती (बीआरएस) हा पक्ष जाहिरातबाजी व प्रसिद्धीतून महाराष्ट्रात येत आहे. याआधीही अनेक पक्षांनी महाराष्ट्र येण्याचा प्रयत्न केला आहे. बहुजन समाज पक्ष, केजरीवालांचा आम आदमी पक्ष यांनी प्रयत्न केले व आता बीआरएस येत आहे परंतु महाविकास आघाडी व विशेषतः राष्ट्रवादीचे मासे त्यांच्या गळाला लागत आहेत. त्यामुळे भाजप- शिवसेनेवर त्यांचा काहीही परिणाम होणार नाही, असा दावा शिंदे यांनी केला.
---
चौकट
आता अजित पवारांना उत्तर द्यावे लागणार
तीन वर्षांपूर्वीच्या पहाटेच्या शपथविधीसंदर्भात भाष्य करताना प्रा. शिंदे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्ता ओपन करताच कधी नव्हे ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उत्तर द्यायला त्यांनी भाग पाडले. शरद पवार कोणत्याही प्रश्नावर सहजासहजी उत्तरे देत नाहीत, परंतु पवारांना फडणवीस यांच्या प्रश्नावर उत्तर द्यायला भाग पडले. यामुळे फडणवीस यांच्या गुगलीवर शरद पवारच घायाळ झाले आहेत, असा दावा करून प्राध्यापक शिंदे म्हणाले, त्या काळात जे घडले, त्यावर आता अजित पवारांना उत्तर द्यावे लागणार आहे. फडणवीस यांच्या समवेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर 72 तासात ते परत गेले, त्यानंतर ते पुन्हा परतले ते उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात व तेही उपमुख्यमंत्री म्हणून. त्यामुळे अजित पवारांकडून ते आधी भाजप बरोबर का आले व नंतर का परत गेले व नंतर ठाकरेंबरोबर का गेले, याची उत्तरे लोकांना हवी आहेत. फडणवीस यांच्या समवेत उपमुख्यमंत्री असताना नंतर पुन्हा ते ठाकरे समवेत उपमुख्यमंत्री झाले, हे त्यांनी त्यांच्या मनाने केले की शरद पवार यांनी सांगितले म्हणून केले, याची उत्तरे महाराष्ट्रातील जनतेला अजित पवार यांनी दिली पाहिजे, असे आवाहनही प्राध्यापक शिंदे यांनी केले.
---
Post a Comment