जैन ओसवाल पतसंस्थेच्या सभासदांनी शेअर 1 हजार रुपये करून घ्यावा : माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक ईश्वर बोरा

 मतदान हक्कासाठी सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेच्या सभासदांनी आपला शेअर 1 हजार रुपये मूल्याचा करून घ्यावा
माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक ईश्वर बोरा यांचे आवाहन

नगर : सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाने संस्थेस मतदार याद्या सादर करणेबाबत पत्रही पाठविले आहे. पतसंस्थेच्या नियमानुसार 1000 रुपयांचा शेअर असलेले सभासद संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदानास पात्र असतील. ज्या सभासदांकडे अजूनही 100 रुपये मूल्याचाच शेअर आहे, त्यांनी संस्थेत उर्वरित 900 रुपये भरून एक हजार रुपयांचा शेअर मिळवावा. त्यामुळे संबंधित सभासद मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र राहिल व संस्थेच्या प्रगतीसाठी चांगले संचालक मंडळ निवडून देण्यात योगदान देता येईल, असे आवाहन संस्थेचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक ईश्वर बोरा यांनी केले आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात ईश्वर बोरा यांनी म्हटले आहे की, सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्था ही सभासद, ग्राहकांची कामधेनू आहे. संस्थेला शिस्तबध्द व आदर्श कारभाराची मोठी परंपरा आहे. यात सभासदांचा मोलाचा वाटा आहे. आजही काही सभासदांकडे फक्त 100 रुपये मूल्याचे शेअर आहेत. त्यामुळे ते मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू शकतात. अशा सभासदांना निवडणुक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवता यावा, मतदान करता यावे यासाठी 1 हजार रुपयांचा शेअर मिळवावा. संस्थेच्या प्रगतीत संचालक मंडळाचे निर्णय महत्वाचे ठरतात. त्यामुळे अभ्यासू, दूरदृष्टीचे संचालक संस्थेत कार्यरत असणे आवश्यक आहे. मी स्वत: 2017 पासून व्हाईस चेअरमन तर 21 नोव्हेंबर 2019 पासून चेअरमन म्हणून संस्थेचे काम पाहिले. सर्व सहकारी संचालकांना बरोबर  घेऊन सभासद हिताचा कारभार केला. कोविड महामारी काळातही संस्थेच्या ठेवी, सोनेतारण कर्ज यामध्ये वाढ करण्यात यश मिळवले. 2001 मध्ये संस्था स्थापन झाल्यापासून 2017 पर्यंत संस्थेकडे 27 कोटींच्या ठेवी जमा झाल्या. माझ्या कारकिर्दीत सर्व सहकारी संचालकांच्या मदतीने ठेवी 27 कोटींवरुन 72 कोटींपर्यंत पोहचल्या. संस्थेचे भागभांडवल 1 कोटी वरून 2.20 कोटींवर पोहोचले. एनपीएमध्येही लक्षणीय घट झाली. तसेच सभासदांना सातत्याने 15 टक्के लाभांश देण्यात यश मिळाले. माझ्या कार्यकाळातच संस्थेच्या स्वमालकीच्या इमारतीसाठी जागा खरेदी करण्यात आली. आज त्याच जागेत संस्थेची दिमाखदार वास्तू उभी राहिली आहे. संस्थेच्या इतिहासात प्रथमच संस्थेला राज्यस्तरावरील पतसंस्था फेडरेशनचा प्रतिष्ठित दीपस्तंभ पुरस्कारही मिळाला. अशा सर्व चांगल्या कामांवर शिक्कामोर्तब करण्याची संधी सभासदांना निवडणुकीवेळी मिळत असते. त्यामुळे सभासदांनी जागृत होवून शेअरची एक हजार रुपयाची रक्कम भरून मतदानासाठी पात्र व्हावे असे आवाहन ईश्वर बोरा यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post