धनगर समाजाचा मेळाव्यात समाजाच्या विकासासह अनेक विषयांवर चर्चा

 


धनगर समाजाचा मेळाव्यात समाजाच्या विकासासह अनेक विषयांवर चर्चा

राज्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प नगर जिल्ह्यात राबविणार- शशांक कांबळे

     नगर - तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील पहिला पथदर्शी प्रकल्प नगर जिल्ह्यातील ढवळपुरी या गावात होणार असून, या प्रकल्पामुळे मेंढी व शेळी यांच्या आरोग्यसह विक्रीतून समाजाचे उन्नत्ती होईल. या प्रकल्पासाठी 50 एकर जमीन अधिग्रहीत करण्यात आली असून, शेळी-मेंढी संशोधन केंद्रामुळे नगर जिल्ह्यात आय.सी.आर.च्या धर्तीवर अनेक योजना राबविण्याचा मानस राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेळी-मेंढी पालन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शशांक कांबळे यांनी व्यक्त  केला.

     नगर येथील लक्ष्मी-नारायण मंगल कार्यालयात श्रीमंत राजे यशवंतराव होळकर जयंतीनिमित्त आयोजित धनगर समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी यशवंत सेनेचे सरसेनापती माधव गडदे, समाज कल्याणचे उपायुक्त राधाकिसन देवढे, यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय तमनर, शहरप्रमुख कांतीलाल जाडकर, धनगर समाज सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष निशांत दातीर, अशोक वीरकर, रंगनाथ तमनर, सुनिल खामगळ, किशोर शिकारे, जालिंदर भांड आदि मान्यवर उपस्थित होते.

     पुढे बोलतांना कांबळे म्हणाले की, धनगर समाज हा पुर्णत: शेळी-मेंढी यांच्यावर अवलंबून आहे, या व्यवसायाला राज्य शासन संरक्षण देणार असून, यशवंतराव होळकर महामेष योजनेतून 20 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात येणार आहे. 20 मेंढ्या व एक मेंढा (नर) 75 टक्के अनुदानावर लाभार्थींना देण्यात येणार आहे. नव्याने अहिल्या शेळी योजना सुरु करण्यात आली असून, या योजनेंतर्गत 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत फिरत्या दवाखान्याचीही सुविधा देण्यात येणार आहे. एकूणच मेंढपाळांच्या विकासासाठी महामंडळ सर्वोतोपरि सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

     समाज कल्याणचे उपायुक्त राधाकिसन देवढे यांनी नव्याने धनगर समाजासाठी राबविण्यात येणार्‍या योजनांसंदर्भात विस्तृत मार्गदर्शन केले.

     यशवंत सेनेचे सरसेनापती माधव गडदे म्हणाले, धनगर समाजाला जाज्वल इतिहास असून इंग्रजांना सळोकीपळो करुन सोडणारा एकही लढाई न हरलेला यशवंतराव होळकर एकमेव राजा होता. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी देशातील अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार केला. महिला सक्षमिकरण व सबलिकरणाची मुहूर्तमेढ खर्‍या अर्थाने त्यांच्या कारकिर्दीत सुरु झाली. खंडाळा घाटाचा शोध शिंगरोबा धनगराने लावला. या इतिहासातून बोध घेऊन समाजाने आपला सर्वांगिण विकास करण्याची गरज आहे.  राजकारणासह समाज कारणातही समाजाने एकोपा दाखवून व्यापारातही आता पाऊल टाकण्याची वेळ आली आहे. शेळी-मेंढी पालनाचा व्यवसाय इतर लोकांनीही अंगिकारला आहे. या व्यवसायाकडे आधुनिक पद्धतीने लक्ष देण्याचे गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट

माजी उपमुख्यमंत्री अजितदादांना घोंगडी द्यावी लागेल

     भारतीय जनता पार्टी सत्तेत असतांना राष्ट्रवादीचे नेते खांद्यावर घोंगडी टाकून धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी करत होते. मात्र सत्तेत आल्यावर त्यांनी समाजाच्या आरक्षणाचा विसर पडला. महाविकास आघाडी सरकारने 1 हजार कोटींची योजनाही बंद केली होती. आता विरोधीपक्ष नेते अजित पवार यांना धनगर समाजाच्या आरक्षणाची आठवण होणार आहे. त्यामुळे आगामी आधिवेशनापूर्वीच अजितदादांना घोंगडी द्यावी लागेल, असा उपरोधक टोलाही यशवंत सेनेचे सरसेनापती माधव गडदे यांनी लगावला.

--------

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post