गेली तीन वर्षे माजी मंत्री तथा भाजप प्रदेश उपाध्यक्ष आ.प्रा.राम शिंदे यांच्या बरोबर काम करण्याचा योग आला. तसं पाहिलं तर अनेक वर्ष आ. शिंदे यांच्या विरोधात काही प्रश्नांवर मी मनसेच्या माध्यमातून विरोधक म्हणून काम करत होतो. परंतु मोठ्या साहेबांच्या नातवाला कर्जत जामखेडमध्ये लॉन्च करताना राजकारणातला पहिला बळी आमचा गेला. प्रचंड मोठी ताकत व नियोजनबद्ध जातीयवाद , ग्लोबल निती, फोडाफोडीची कूट निती मतदारांना वेगवेगळी प्रलोभने , कार्यकर्त्यांना फोडतानाच अनेक पक्ष ही फोडले गेल्यामुळे....आम्ही तळहातावरील फोडा प्रमाणे जपलेल्या मनसे परिवाराला मला सोडावं लागलं. परंतु कायम विरोध करणाऱ्या पण कधीच विरोधकाला शत्रू न समजणाऱ्या आ. शिंदे यांनी एका सर्वसामान्य चळवळीतल्या कार्यकर्त्याचा भाजपासारख्या अतिविराट राष्ट्रीय पक्षात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश करून घेतला .
२०१९ च्या विधानसभा पराभवानंतर राम शिंदे यांना अनेक सांभाळलेल्या व मोठे केलेल्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी राम राम केला. दरम्यान दडपशाही, दादागिरी, तर कधी सत्तेच्या लालसेपोटी वेळोवेळी अनेकजण पक्ष सोडत राहिले . अशा परिस्थितीत विरोधक राम शिंदे यांचे राजकारण संपवण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या शोधत त्यांना संपुष्टात आणण्याचा कसोशीने प्रयत्न करत होते. परंतु प्रचंड आशावादी व प्रगल्भ असणाऱ्या राम शिंदे यांनी धीर न सोडता थेट जनतेशी नाळ जोडण्याचा संकल्प केला .चळवळीतून व स्वतःच्या हुशारीने गावपातळीतून पुढे आलेल्या कॅबिनेट मंत्र्यापर्यन्त पोहचलेल्या राम शिंदे यांना पराभवानंतर अनेक कटू गोष्टींना सामोरे जावे लागले.
निवडक निष्ठावंताच्या बरोबरीने पुन्हा एकदा जनसामान्याशी जवळीक साधताना मन मोठे करून झालेल्या चुकांवर आपले मन मोकळे करत राहिले.
परंतु मतदारसंघात विकासाच्या पेरलेल्या अनेक कामांनी राम शिंदे यांचे कार्य पुन्हा उगवत होते. पक्ष आणि राम शिंदे यांचेसोबत एकनिष्ठेने काम करत असताना, माझ्या बरोबरचे अनेक सहकारी वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून , वृत्तपत्रातून व जाहीर कार्यक्रमातून व आंदोलनातूनही राम शिंदे यांनी केलेली विकासकामे जनतेपर्यंत मांडत राहिले
कर्जत जामखेड मतदारसंघात त्यांनी केलेल्या जलयुक्तच्या माध्यमातून मोठं मोठी बंधारे ज्या वेळेस पराभवा नंतरच्या पहिल्या पावसाळ्यात भरली गेली, त्यावेळी अनेक मतदारांना त्यांची आठवण आली. मतदारसंघातील अनेक गावांत त्यांना जलपूजनाला बोलावलं गेलं. पराभवचं शल्य असतानाही जल पूजनाच्या सर्व कार्यक्रमात राम शिंदे यांनी हजेरी लावून जनतेशी मोकळ्या मनाने संवाद साधला. या संवादातून त्यांनी झालेल्या अनेक चुकाही मान्य केल्या व जनतेलाच पराभवाचा जाब विचारला. त्यामुळे मतदानात जनतेने केलेल्या चुकाही अनेकांना जाणवल्या.
पराभवाच्या काळात राम शिंदे यांना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. भविष्यात या सर्व गोष्टींचा अभ्यास नक्कीच त्यांच्याकडून होईल.
कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीत तोडा ,फोडा ,आणि झोडाच्या राजकारणाने दुष्काळी आणि तहानलेल्या कर्जत शहराला पाणी देणाऱ्या राम शिंदे यांना पराभव जरी स्वीकारावा लागला, तरी नवीन व अनोळखी उमेदवार असतानाही आणि समोर महाविकास आघाडी असतानाही पक्षाला 38 %अशी चांगली मते मिळाली. भाजपाच्या उमेदवारांना आमिष दाखवून
सत्तेचा प्रचंड गैरवापर करून उमेदवारांना फॉर्म काढायला लावल्याने त्यांनी निवडणूक कार्यालयात जाऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांना लोकशाही पद्धतीने जाब विचारला. परंतु सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणून शिंदे यांनी कार्यकर्त्यां सहित श्री.सद्गुरु गोदड महाराज मंदिराच्या दारात व त्यांच्या दरबारात मौन आंदोलन केले. अतिशय कडाक्याच्या थंडीत मंदिराच्या दारातच त्यांनी निवडक कार्यकर्त्यांसमवेत रात्र काढली. त्यामुळे या नवीन पर्वाची राजकारणाची नवी प्रथा संपूर्ण महाराष्ट्राला समजली.
आ.रोहित पवार यांनी त्यावेळी कर्जत नगरपंचायत ताब्यात जरी घेतली तरी या त्यांच्या दडपशाही ,दादागिरी व दहशतीमुळे मिळालेल्या विजयाचा मतदारसंघातील जनतेने मात्र मोठा धसका घेतला. त्यांच्या बरोबर गेलेल्या अनेक स्थानिक नेत्यांना काय किंमत मिळतेय याचीही मतदारसंघात आता चर्चा चालू आहे. त्याचाच परिणाम पुढे झालेल्या जिल्हा बँक तसेच त्यानंतरच्या झालेल्या सर्व ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाच्या रूपाने दिसून आला.
संपूर्ण महाराष्ट्राच्या जलयुक्त कामांची महाविकास आघाडीने चौकशी लावली असता ती पूर्ण होऊन त्या चौकशीत काहीही सापडले नाही, तरीही राजकीय षड्यंत्र करून विद्यमान आमदाराने पुन्हा एकदा स्वतंत्र कर्जत जामखेड मतदारसंघातील जलयुक्तची चौकशी लावली. या चौकशीला ही सामोरे जाण्याची तयारी त्यांनी दाखवली. परंतु या चौकशीत मात्र काय सापडले? तर, अनेक बंधाऱ्यांना पाणी व मतदारसंघातील पाण्याची पातळी तीन फूट वर वाढल्याची माहिती या चौकशीत पुढे आली व विरोधक पूर्ण तोंडावर पडले.
गेली अडीच वर्षे कुकडीच्या पाण्याचे विद्यमान आमदाराला नियोजन करता आले नाही. ते स्वतः पुणे जिल्ह्याचे असले तरी वरिष्ठ नेत्यांमुळे पुणे जिल्ह्याचा त्यांच्यावर दाब राहिला. कुकडीच्या पाण्याअभावी, कुकडी पट्ट्यातील अनेक शेतकऱ्यांची पिके व फळबागा डोळ्यादेखत जळून गेल्या. उसाचा प्रश्न गंभीर झाला अनेकांचा ऊस कारखान्यानी न उचलल्यामूळे शेतकरी मेटाकुटीस आला. दुष्काळात तेरावा महिना की काय वीजेचा प्रश्नही गंभीर बनला. आशा वेळी राम शिंदे यांचा चळवळीतला कार्यकर्ता जागा झाला. विद्यमान आमदार व महाविकास आघाडीच्या विरोधात मार्च २०२२ मध्ये कर्जत येथे विराट मोर्चा व रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनात राजकीय दबावाने हस्तक्षेप होऊन जाणीवपूर्वक राम शिंदे यांचेसहित आमच्यावरही गुन्हे दाखल झाले.
परंतु या आंदोलनामुळे कुकडीचे आवर्तन सोडावे लागले , उसाचा प्रश्नही मार्गी लागला व विजेच्या प्रश्नाचा निपटारा होऊन राम शिंदेचीच गरज या मतदारसंघाला कायम आहे याची जाणीव जनतेला झाली.
पराभवानंतर लगेच लागलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी त्यांच्या नावाची चर्चा चालू झाली. ते पुढील प्रत्येक विधानपरिषद , राज्यसभेसाठीही भारतीय जनता पार्टीने राम शिंदे यांच्या नावाची चर्चा करून त्यांचं पार्टीत असलेलं महत्व अधोरेखित केलं. जून २०२२ मध्ये ते विधान परिषदेवर चांगल्या मतांनी निवडून गेले. त्यांच्या पायगुणाने महाविकास आघाडीचं सरकार जाऊन भाजपा व मित्र पक्षाचे मतदार संघासहित महाराष्ट्रात रामराज्यचं सरकार आले.
प्रदेश अध्यक्षाच्या नावासाठी ही त्यांची चर्चा झाली, मंत्री पदासाठी व विधान सभेच्या सर्वोच्च सभापती पदासाठीही अधून मधून चर्चा होतच असते. नक्कीच पक्ष देईल ती जबाबदारी आ. राम शिंदे लिलया पार पाडतील असा आम्हाला सार्थ विश्वास आहे.
प्रचंड अभ्यासू व प्रगल्भ असणाऱ्या राम शिंदे यांचा आत्ताच्या हिवाळी अधिवेशनातील वावर आता नक्कीच मतदारसंघात मोठा बदल घडवील यात शंका नाही.
ओबीसी नेते म्हणून जरी राम शिंदे यांच नाव पक्षात आणि महाराष्ट्रात पुढे येत असलं तरी मतदारसंघात त्यांनी सर्वसमावेशक राजकारण आणि समाजकारण केलं. त्यामुळे भाजपा सोडलेले व इतर पक्षातील अनेक समाजाचे मतदारसंघातील नेते पुन्हा एकदा राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करायची इच्छा व्यक्त करत आहेत. परंतु तावून सुलाखून निघालेल्या व चांगले वाईट अनुभव आलेल्या राम शिंदेंना यावर कसे निर्णय घ्यायचे ते आता कोणी सांगण्याची आवश्यकता राहिली नाही.
दोन वर्षे तर राम शिंदे यांच्या कार्यकाळातील विकास कामांचीच उदघाटने विद्यमान आमदार करत राहिले...काही मोठी कामेही जाणीवपूर्वक रोखली गेली हे सर्वांना ज्ञात झालंच आहे. खरं तर या तीन वर्षांच्या काळात मतदारसंघाला राम शिंदे यांची गरज आहे हे आता सर्वसामान्य जनतेच्या ही लक्षात आलं आहे. अशा या कर्तबगार , विकासपुरुष , पाणीदार ,जलपुरुष व आपल्या कार्यकर्त्यानाच आपला राजकीय वारस समजणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या मनातील नेत्याचा आज वाढदिवस. या शुभ दिनाच्या प्रसंगी राशीनची आई जगदंबा व सद्गुरू श्री गोदड महाराज त्यांना जनसेवेसाठी उदंड व निरोगी आयुष्य देवो ही प्रार्थना... 🎂💐
Post a Comment