नगर - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अहमदनगर शाखेच्या वतीने यंदाचा जीवनगौरव पुरस्कार जेष्ठ दिग्दर्शक, नाट्यकर्मी अय्युब खान यांना तर युवा नाट्य गौरव पुरस्कार अँड. अभिजित दळवी व अँड. पुष्कर तांबोळी तर महाराष्ट्र रत्न पुरस्कार गणेश शिंदे यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष अमोल खोले यांनी दिली.
अहमदनगर जिल्ह्यातील नाट्य व कलाक्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या कलावंताना विविध पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. जेष्ठ नाट्य दिग्दर्शक, लेखक, नाट्यकर्मी श्री.अय्युब खान यांनी नगरच्या नाट्यक्षेत्रात भरीव कार्य केले आहे. त्यांनी शालेय जीवनात वक्तृत्व, काव्यवाचन, एकांकिका, एकपात्री यातून नाट्यकलेकडे प्रवास सुरू केला. कै. सदाशिव अमरापूरकर यांच्या सोबत त्यांनी अनेक वर्षे नाट्यसेवा केली आहे. नगर काॕलेजमध्ये त्यांनी अनेक नाटके, एकांकिका दिग्दर्शित करून भूमिका केल्या आहेत. वाचनाची आवड असल्याने अनेक दिग्गज लेखकांचे पुस्तके वाचून साहित्याचा अभ्यास त्यांनी केला. नगरच्या शारदा करडंक एकपात्री अभिनय स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी प्रथम क्रमांक त्यांनी मिळविला. तसेच अनेक एकपात्री स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिके त्यांना मिळाले.
वसंत सबनीस यांची " नट " ही एकांकिका , रत्नाकर मतकरी यांची " राखावी बहुतांची अंतरे", काच सामान जपून वापरा " , रमेश मंत्री यांची " विदुषक काॕलेज " मी उभा केंव्हाचा , कन्स्ट्रक्शन, लोकयुग ८०-८१, स्नेहांकित संजय, इतिहास, चित्रकथी, काजळ कुबड्या एकांताला, दीर्घांक - तडमताशा, पथनाट्य - भूक गर्भ व्याली आदी एकांकिका दिग्दर्शीत केल्या. महाराष्ट्रातल्या विविध स्पर्धांमधून एकांकिका सादर केल्या आणि भरघोस मानाची पारितोषिके श्री. अय्युब खान यांनी मिळविली.
आंतरमहाविद्यालयीन पुरूषोत्तम करंडकासाठी - एक तमाशा शुन्याचा, मी उभा केंव्हाचा, श्वेतकृष्ण , होड्या एकांकिकांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.
नगरमधून प्रथमच मुंबईच्या गाजलेल्या छबिलदासच्या रंगभूमीवर नगरच्या दृष्टी थिएटर्सच्यावतीने "विदूषक काॕलेज, श्वेतकृष्ण व मैत " नरकपुत्र, युवावाणी व अमुशा आदी एकांकिका अय्युब खान यांच्या दिग्दर्शनाखाली सादर झाल्या होत्या.व छबिलदासच्या रंगमचावर नगरच्या नाटकाचा झेंडा रोवला आणि इतिहास रचला.
राज्य नाट्य स्पर्धेत अमरापुरकरांच्या दिग्दर्शनाखाली काही स्वप्न विकायचीत व छिन्न या नाटकात भूमिका केली. त्यानंतर राज्य नाट्य स्पर्धेत खान यांनी दिग्दर्शित केलेले निखारे, दैवं चैवात्र पचमं, बांधवडी मोडील कोण, कोसळे आज इथे देव्हारा अर्थात मेलो मेलो ड्रामा, कबंध, बापू तुझी जनता मैली, सीएम, बि-हाड वाजलं आदी नाटके दिग्दर्शीत केली. यात अनेक पारितोषिके त्यांना मिळाली आहेत.
नगरमधून व्यावसायिक नाटक म्हणून आपलं बुवा असं आहे, मयुरिका-नृत्यानाट्य, पदरी पडलं पवित्र झालं, करायला गेलो एक, साष्टांग नमस्कार, तरूण तुर्क म्हातारे अर्क, दोघात एक, गाढवाच लग्न, तीन चोक तेरा, बायको उडाली भूर, वरचा मजला रिकामा, सौजन्याची ऐशी तैशी, जोडी तुझी माझी, डार्लिंग डार्लिंग, बि-हाड वाजलं आदी नाटके दिग्दर्शीत केली.
पुण्यातून व्यावसायिक नाटक "साॕरी गॉडफादर" हे नाटक दिग्दर्शीत केले. यात राहुल सोलापुरकर व कै. आनंद अभ्यंकर यानी काम केले. पुण्यातून दुसरे व्यावसायिक नाटक कार्टी प्रेमात पडली हे नाटक सादर केले .यात सतिश तारे, वृंदा बाळ व दिलीप हल्ल्याळ व संजय आढाव यांनी काम केले. एकच प्याला या नाटकाचा उर्दू भाषेत अनुवाद करून "एकही जाम" या नाटकात तळीरामाची भूमिका त्यांनी साकारली.
बालनाट्य अलबत्या गलबत्या, वेताळ आणि विदुषक , संत ज्ञानेश्वर आदी बालनाट्ये त्यांनी दिग्दर्शीत केली. तसेच लोकयुग ८०-८१ ,मयुरिका,वेताळ ? विदुषक, संत ज्ञानेश्वर आदी नाटक, एकांकिकांचे लेखन त्यांनी केले. पौराणिक संगीत नाटकही अय्युब खान दिग्दर्शीत केले.
युवा नाट्य गौरव पुरस्कार मिळालेले ॲड. अभिजीत दळवी व ॲड. पुष्कर तांबोळी यांना नुकताच ६८ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार "कुंकुमार्चन" या लघू चित्रपटासाठी मिळाला आहे. त्यांनी अनेक एकांकिका,नाटके लिहून दिग्दर्शित केलेली आहेत. सध्या मालिका व चित्रपट क्षेत्रात ते सक्रीयपणे कार्य करीत आहेत.
महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त श्री. गणेश शिंदे हे प्रसिध्द व्याख्याते असून थोड्या गप्पा,थोडी गाणी या कार्यक्रमाचे त्यांनी हजाराच्यावर प्रयोग केले आहेत.
युवा नाट्य गौरव पुरस्कार वितरण कलारंग महोत्सवात दि.१६ रोजी, तर नाट्य परिषद जीवनगौरव पुरस्कार सोहळा दि.१७ रोजी रात्री ८ वाजता माऊली सभागृह येथे अभिनेते प्रशांत दामले, स्वागताध्यक्ष आ. संग्राम जगताप, डॉ. पंकज जावळे, आयुक्त अ.नगर म.न.पा., उद्योजक नरेंद्र फिरोदिया, डॉ. राकेश गांधी, धनंजय जाधव मा. नगरसेवक, आजिनाथ हजारे,चेअरमन ज्योतीक्रांती मल्टीस्टेट, माधव ठुबे, राजेश भंडारी यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात येणार आहे अशी माहिती परिषदेचे प्रमुख कार्यवाह श्री. सतीश लोटके यांनी दिली.
तसेच अभिवाचन स्पर्धेचा पारितोषिक वितरण दि. १६ रोजी डॉ. संजय दळवी, अध्यक्ष,नाट्य परिषद, संगमनेर शाखा , जेष्ठ नाट्यकर्मी दीपक घारू, निवेदक सुफी सय्यद, विठ्ठल बुलबुले,जिज्ञासा अकादमी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यास रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नाट्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment