विधीमंडळाच्‍या विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती कल्‍याण समितीने घेतला विविध विभागांच्‍या कामकाजाचा आढावा

  

            अहमदनगर  :-  विधीमंडळाची विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती कल्‍याण समिती  दि. 21 ते 23 एप्रिल 2022 दरम्‍यान जिल्‍हा दौ-यावर आली आहे. या समितीने आज जिल्‍हाधिकारी कार्यालयात विमुक्‍त जाती व भटक्‍या जमातीचे अधिकारी कर्मचारी यांच्‍या शासकीय सेवेतील भरती, बढती, आरक्षण व अनुशेष तसेच विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती प्रवर्गाकरीता राबविण्‍यात येणा-या कल्‍याणकारी योजनांच्‍या संदर्भातील कामगाजांचा जिह्यातील विविध विभागांचा आढावा घेतला.

            येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयात आज या बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी समितीचे अध्‍यक्ष आमदार शांताराम मोरे, समिती सदस्‍य आमदार बळवंत वानखेडे, आमदार राजेश राठोड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार रत्‍नाकर गुट्टे, आमदार इंद्रनील नाईक, जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्‍हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, विधीमंडळाचे कक्ष अधिकारी विनोद राठोड, अर्जुन इलग आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

            या बैठकीत समितीने विमुक्‍त जाती व भटक्‍या जमातीच्‍या अधिकारी-कर्मचा-यांसदर्भात जात पडताळणी प्रकरणांचा, रिक्‍त पदे, बिंदु नामावली आणि या समाजाच्‍या विकासासाठी शासनातर्फे राबविल्‍या जाणा-या विविध योजनांचा आढावा घेतला. यामध्‍ये जात पडताळणी समिती कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्‍हा  परिषद कार्यालय, महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, ग्रामपंचायत या विभागांच्‍या विभाग प्रमुखांकडून माहिती जाणून घेतली. बैठकीत समितीचे अध्‍यक्ष आमदार शांताराम मोरे यांनी विमुक्‍त जाती व भटक्‍या  जमातींच्‍या लोकांसाठी असलेल्‍या शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. या समाजाच्‍या विकासासाठी व शासकीय अधिकारी-कर्मचा-यांबद्दल प्रशासनाने न्‍यायीक भुमिकेतुन काम करावे अशा सूचना त्‍यांनी संबंधितांना दिल्‍यात. काही विभागांची अपूर्ण माहिती असल्‍याबद्दल समितीने नाराजी व्‍यक्‍त केली. बैठकीस उपस्थित नसलेल्‍या अधिका-यांना उपस्थित का राहिला नाहीत त्‍याबाबत विचारणा करावी, अशा सूचना त्‍यांनी जिल्‍हा प्रशासनास दिल्‍यात. विमुक्‍त जाती व भटक्‍या    जमातीच्‍या अधिकारी-कर्मचा-यांच्‍या काही समस्‍या असतील तर त्‍यांनी त्‍या विधीमंडळ समितीकडे कळवाव्‍यात, असे आवाहन समितीतर्फे करण्‍यात आले. तत्‍पुर्वी समितीचे अध्‍यक्ष  आणि समिती सदस्‍यांनी दि. 21 व 22 एप्रिल रोजी  जामखेड, पाथर्डी, कर्जत, पारनेर आणि राहुरी तालुक्‍यातील विविध गावांना भेटी दिल्‍यात.

***



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post