उमराणीच्या लढाईमध्ये धनगर सरदारांची मोठी कामगिरी.

 उमराणीच्या लढाईमध्ये धनगर सरदारांची मोठी कामगिरी.


अहमदनगर (विशेष लेख)  लढाई 9 मार्च ते 7 एप्रिल 1673 च्या दरम्यान सेनापती कुडतोजी गुजर प्रतापराव व आदिलशाही सरदार बेहलोल खान यांच्या मध्ये झाली. 

बेहलोल खान स्वराज्यावर चालून येत आहे ही हकीकत शिवाजी राजेंना कळताच त्यांनी प्रतापराव गुजर व आनंदराव या आपल्या सेनापतींशी गुप्त मसलत करून बहलोलखानाला इतर मोगल सरदार मिळण्यापुर्वीच हल्ला चढवावा अशी रणनीती आखण्यात आली. 

ठरल्या प्रमाणे प्रतापराव व साथीदारांनी विजापूर पासून जवळच असणाऱ्या बहलोल खानाच्या छावणीला वेढा घालण्याचे नियोजन केले. 

उमराणी जवळच्या ओढ्याजवळ पाण्याची सोय पाहून बेहलोल खान डेरा टाकून बसला असता रात्रीत मराठ्यांनी उमराणीतील तलावाला वेढा टाकला. जेंव्हा शत्रूचे हत्ती काही विरांच्या रक्षणाखाली पाणी पिण्यासाठी बाहेर पडले तेंव्हा तेंव्हा प्रतापरावाने एक हजार घोडे स्वारानिशी त्यांच्या वर हल्ला चढवून धांदल उडवली. या लढाईत बहलोल खानाची पूर्णतः पराभव होऊन देखील प्रतापरावांनी त्याला अभय दिले. 

या लढाईची जेधे शकावली मधील नोंद अशी , शके 1595 प्रमादी संवत्सरे चैत्र शुध्द प्रतिपदेला राजश्री राहिरिहून (रायरी) पनाल्यास (पन्हाळ्यास ) गेले तेच मासी बहलोलखान यांसी प्रतापराव व आनंदराव यांसी लढाई जाहाली विज्या पुरा जवळ फत्ते जाली येक हाती पाडाव झाला. तर सभासद बखर खालील प्रमाणे नोंद देते . 
"प्रतापराव यास हुकूम करून आणविले आणि हुकूम केला की, विजापूरचा बेलोलखान येवढा वळवळ बहुत करीत आहे. त्यास मारून फते करणे. म्हणोन आज्ञा करून लष्कर नवाबा वरी रवाना केले. त्यांनी जाऊन उमराणीस नवाबास गाठिले. चौतर्फा राजीयाचे फौजेने कोंडून उभा केला. युध्द ही थोर जाहले. 

*या लढाई मधील काही धनगर सरदार* 

*नाईकजी राजे पांढरे:-* 

उमराणीच्या लढाई मध्ये नाईक जी राजे पांढरे यांनी  मोठी भूमिका बजावली होती. आपले सोबती खराडे नाईक यांना सोबत घेऊन भाईर खान तरीन या पठाण या सेनापतीवर मोठी चढाई करून त्याला नेस्तनाबूत केले.  

*विठोजी शिंदे :-*

मराठ्यांनी उमराणीच्या लढाईत बेहलोल खानास एका तलावानजिक. वेधले होते. त्यावेळी सिद्दी हिलाल हा आघाडी वर होता तर मागे एक कोसावर  विठोजी शिंदे उभा होते. तसेच विठ्ठल पीलदेव याच्यासह शत्रूवर एका बाजूने भारी चाल करून शत्रूस जेरीस आणले. पुढे पन्हाळा जवळ सर्जा खानाशी लढताना विठोजी शिंदे ना वीरमरण आले.

*दीपाजी राऊतराय:-*

दीपाजी राऊतराय यांनी उमराणीच्या लढाईत प्रतापराव गुजर यांच्या समवेत समवेत सहभाग घेतला. बेहलोलखान चा सरदार सिद्दी महम्मद बर्की हा ऐन युध्दाच्या मध्येच रण सोडून निघाला असता, दीपाजी राऊतराय याने त्याचा पाठलाग करून त्याच्या खांद्यावर वार केले. बर्की च्या अंगातील चिलखताचे तुकडे तुकडे झाले इतका हा वार जहरी होता. बर्की ने धनुष्यबाण सोडून दीपाजी यांच्या घोड्यास मारले तेंव्हा दीपाजी यांनी दुसऱ्या घोड्यावरून निकराची झुंज दिली.याही घोड्यास बर्की ने जखमी केले. परंतु अश्या ही अवस्थेत दीपाजी यांनी बर्की यांच्या खांद्यावर जबरी वार करत त्यास ठार मारले.  

अश्या या स्वराज्यातील थोर धनगर सरदारांना विनम्र अभिवादन.. __/\__ 

संदर्भ :-

पर्णालपर्वतग्रहणआख्यान श्लोक  83, 99 ते 103 

औरंगजेबकालीन मराठा आमीर वर्ग की  भूमिका श्रीराम तिवारी. 

सरंजामी मरहट्टे. प्रा. संतोष पिंगळे पहा राजे शिंदे,  राजे पांढरे व शेळके राऊतराय प्रकरण. 

धन्यवाद 
मधुकर सर्जेराव हाक्के 
मरहट्टी इतिहास संशोधन मंडळ.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post