दिवंगत सुर्यभान वहाडणे व प्रा.ना.स.फरांदे यांच्यानंतर प्रथमच प्रा.शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी.
जामखेड । प्रतिनिधी -
भारतीय जनता पार्टीच्या राज्यस्तरीय विस्तारित कोअर कमिटी सदस्य म्हणून भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व माजीमंत्री प्रा.राम शिंदे यांची निवड झाली आहे.
महाराष्ट्रातील पक्षाचे भविष्यातील ध्येय धोरणे , कार्य , नियोजन , दौरे ,यात्रा, निवडणूक प्रचार , प्रसार व आगामी सर्व निवडणुकीचे उमेदवार निवडणे यासाठी कोअर कमिटी कार्य करते . मुंबई येथे भारतीय जनता पार्टी च्या झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील आगामी सर्व निवडणुकांसाठी युव्हरचना आखण्यासाठी राज्यस्तरीय विस्तारित कोअर कमिटी नेमण्यात आली.
अहमदनगर जिल्ह्यातील भाजपाचे दिवंगत नेते सूर्यभान वहाडणे व ना. स.फरांदे यांच्यानंतर पहिल्यांदाच प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमातून जिल्ह्याला मान मिळाला आहे.
दरम्यान जिल्ह्याला प्रा. शिंदे यांच्या रूपाने या विस्तारित कोअर कमिटी वर सदस्य म्हणून काम करण्याची जबाबदारी मिळाल्याने भाजपा च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला जात आहे .
गोवा येथील विधानसभा निवडणुकीची जबाबदारी प्रा.शिंदे यांनी अतिशय जबाबदारीने व नेटाने पार पाडली असून, त्यांच्या कार्यकौशल्याने नक्कीच त्यांना दिलेल्या मतदारसंघात निकालाच्या माध्यमातून त्यांच्या कामाचा ठसा उमटलेला दिसणार आहे. प्रा.शिंदे यांच्यावर पक्षाने टाकलेल्या जबाबदारीच्या माध्यमातून महाराष्ट्रात आपल्या कार्यकुशलतेने व समयसुचकतेने भाजपा चे कार्य चांगल्या पद्धतीने करून पक्ष वाढीचे प्रयत्न करतील असा विश्वास पक्ष कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
चौकट - १
सन २०१९ चा विधानसभा निवडणूकीतील पराभव वगळता प्रा राम शिंदे यांचा राजकीय आलेख चढताच राहिलेला आहे. चोंडी ग्रामपंचायतीचे सरपंच , पंचायत समितीचे सभापती , आमदार व पुढे राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्री असा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. कसलाही राजकीय वारसा नसताना, कोणतेही राजकीय पाठबळ नसताना स्वकर्तृत्वावर प्रस्थापितांविरूध्द संघर्ष करत प्रा.शिंदे यांची राजकीय वाटचाल कौतुकास्पद ठरली आहे.
चौकट - २
भाजपाकडून प्रा.शिंदे यांना वाढती जबाबदारी.
प्रा.राम शिंदे यांनी शिक्षण घेतल्यानंतर येण तारूण्यात सन १९९५ पासून भाजपात सक्रिय झाले. त्यानंतर २००४ ला भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष , २००६ ला जामखेड तालुकाध्यक्ष , २०१० ला जिल्हाध्यक्ष , २०१४ ला प्रदेश सरचिटणीस ,२०२० ला प्रदेश उपाध्यक्ष तर आता महाराष्ट भाजपा कोअर कमिटीत स्थान देवुन, प्रा.शिंदे यांच्यावर पक्षाने खूप मोठी जबाबदारी दिली आहे. यामाध्यमातून प्रा.शिंदे यांना पक्षाकडून नवनवीन जबाबदारी दिली जात असल्याचे दिसून येत आहे.
प्रतिक्रिया -
' भाजपा कोअर कमिटी सदस्य म्हणून निवड करून, पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवत खूप मोठी जबाबदारी दिली आहे. सदस्य म्हणून चांगले काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.'
- प्रा.राम शिंदे
माजीमंत्री
Post a Comment