नगर - भारतमातेसाठी बलिदान देणार्या क्रांतीकारकांमध्ये भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव या तिघांची नावे एकत्रितपणे घेतली जातात, कारण इंग्रज अधिकारी सँडर्स यांच्या जाचातून मुक्तता करणार्या आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मृत्यूलाही कवटाळणार्या या तिघांना फाशीची शिक्षा ठोठवण्यात आली, तो दिवस 23 मार्च 1931 होता. अशा या थोर क्रांतीकारकांना आपण विसरुन कसे चालेल? त्यामुळेच आज शहिद दिन म्हणून त्याचे स्मरण करुन अभिवादन करणे सर्वांचेच कर्तव्य आहे, असे प्रतिपादन अर्बन बँकेचे निवृत्त शाखाधिकारी हेमंत बल्लाळ यांनी केले.
मुकुंदनगर येथे हुतात्मा स्मरण प्रबोधिनी मंचच्यावतीने शहिद दिनानिमित्ताने भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी व्याख्याते अशोक औटी, राजकुमार जोशी, मंचचे अध्यक्ष कुतुबुद्दीन शेख, शेख शाबीर, शेख अब्दुल आदि उपस्थित होते.
श्री.बल्लाळ म्हणाले, जेव्हा या तिन्ही विरांना फाशी देण्यासाठी नेण्यात आले तेव्हा त्यांनी देशभक्तीपर गीत गात आनंदाने सामोरे गेले. जेव्हा सॅडर्सला मारायचे ठरले, तेव्हा सुखदेव यांनी संकेत देतांच भगतसिंग व राजगुरु यांनी एकाचवेळी गोळ्या झाडून त्याचा बळी घेतला होता, त्यानंतर इंग्रज सरकारला हुलकावणी देत हे तिन्ही क्रांतीकारक भुमिगत राहिले होते, पण फितुरीमुळे ते पकडले गेले, मात्र फासावर जातांना प्रखर देशप्रेम दर्शविणारे प्रसंग आजही स्मरणात राहतात.
यावेळी कुतुबुद्दीन शेख म्हणाले, त्यावेळी हे क्रांतीकारक स्वत:च्या दु:खातही इतरांचा विचार करीत असत. तिघांमध्ये प्रचंड सहनशिलता होती. कारागृहात अनन्वित छळ होऊनही राजगुरुंनी आपल्या सहकार्यांची नावे मात्र सांगितली नाहीत. स्वातंत्र्य लढ्यातील या तिन्ही क्रांतीकारकाचे योगदान आमच्या पिढीला प्रेरणा देणारे आहे.
व्याख्याते अशोक औटी यांनी सांगितले की, या बरोबर 91 वर्षांपूर्वी 23 मार्च 1931 ला लाहोर सेंट्रल जेलमध्ये राजगुरु, सुखदेव, भगतसिंग यांना फाशी देण्यात आली. पुढे हाच दिवस हुतात्मा क्रांती दिवस म्हणून पाळला जातो. त्यांना फाशी देतांना नियमबाह्य पद्धतीने एक दिवस आधीच ही शिक्षा अंमलात आणली गेली होती. अशा या तिनही क्रांतीकारकाच्या जीवनचरित्रावर थोडक्यात माहिती दिली.
---------
Post a Comment