पक्षाची शिस्त पाळून संघटन करत रहा -बाळा नांदगांवकर
नगर - कार्यकर्ते ही पक्षाची खरी ताकद आहे. कुठलाही संघर्ष केल्याशिवाय संघटनेला महत्व प्राप्त होत नाही. पक्षात काम करतांना संघटन महत्वाचे आहे, त्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करावे. पक्षाची शिस्त प्रत्येक कार्यकर्त्यांनी पाळली पाहिजे, कार्यकर्त्यांनी लोकांची कामे केले तर पक्षावर त्यांचा विश्वास वाढेल. पराभव झाला तरी चालेल पण कोणापुढे लाचार होऊ नका, झुकू नका. पक्षाची शिस्त पाळून संघटन करत राहा. यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्यांच्या संपर्कात रहा. कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही एक पासून होत असते, त्यामुळे तुम्ही लढत रहा. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडविण्यासाठी राजसाहेब ठाकरे यांना साथ द्या, असे मत मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी व्यक्त केले.
मनसे नेते बाळा नांदगांवकर यांच्या उपस्थितीत नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, देवीदास खेडकर, बाबासाहेब शिंदे, दत्ता कोते, सचिव नितीन भुतारे, शहराध्यक्ष गजेंद्र राशीनकर, सुमित वर्मा, केतन नवले, इंजि.विनोद काकडे, परेश पुरोहित, आनंदा शेळके, संकेत होशिंग, दिपक दांगट, पोपट पाथरे, तुषार हिरवे, अशोक दातरंगे, रतन गाडळकर, संकेत व्यवहारे, गणेश शिंदे, डॉ.संतोष साळवे, अभिनय गायकवाड आदि उपस्थित होते.
यावेळी सचिन डफळ म्हणाले, मनसे पक्षाच्यावतीने जिल्ह्यात चांगले काम करुन कार्यकर्त्यांची फळी निर्माण करत आहे. जिल्ह्यात पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी पदाधिकारी प्रयत्न करत असून, त्या माध्यमातून अनेक युवक पक्षाशी जोडले जात आहेत. वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे आणखी चांगले काम करुन पक्षाची ताकद दाखवून देण्याचा आपला प्रयत्न राहील, असे सांगितले.
प्रास्तविकात सचिव नितीन भुतारे यांनी कोरोना काळात केलेल्या मनसेच्या कामगिरीचा आढावा घेतांना सांगितले, सुमारे 4 हजार लोकांना हॉस्पिटलने जादा आकारलेले पैसे परत केले. जिथे अन्याय असेल तेथे मनसे नागरिकांच्या मदतीला धावून जात आहे. विविध उपक्रमांतून मनसेचे काम चांगल्या पद्धतीने सुरु असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष देवीदास खेडकर, बाबासाहेब शिंदे, गजेंद्र राशीनकर आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्ह्यातील विविध कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला त्यांचे स्वागत बाळा नांदगांवकर यांच्या हस्ते करण्यात आला. शेवटी गजेंद्र राशीनकर यांनी आभार मानले. मेळाव्यास जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
-------
Post a Comment