दिव्यांचा हार घालून आमदार संग्राम जगताप यांचा सत्कार


     नगर -(विजय मते ) शहरवासियांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला, मोठ्या आशा-अपेक्षा ठेवून आमदार केले, त्या तमाम नगरकरांच्या विश्वासास पात्र राहून शहर विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिलो. रस्ते, पाणी, ड्रेनेज सारख्या प्रश्नांना प्राधान्य दिले. आता शहरातील पथदिव्यांचा प्रश्न  सोडविला. वीज दिव्यांनी शहर उजळले, आता रस्तेही चकाकतील, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
     सावेडी उपनगरातील प्रभाग 2 मध्ये मनपाच्यावतीने एलईडी दिवे बसविण्यात आले, यासाठी आ.जगताप यांचे मोलाचे सहकार्य मिळाले याबद्दल शिलाविहार येथील जगदंबा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या संकल्पनेतून चक्क एलईडी दिव्यांची माळ घालून आ.संग्राम जगताप यांचा बहार अर्बन बँक कॉलनीच्यावतीने सत्कार करण्यात आला.
     याप्रसंगी स्थायी समिती सभापती अविनाश घुले, विरोधीपक्ष नेते संपत बारस्कर, नगरसेविका नूतन स्थायी समिती सदस्य रुपालीताई वारे, संध्याताई पवार, नगरसेवक विनित पाउलबुधे, सुनिल त्र्यंबके, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, प्रकाश भागानगरे, समद खान आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
     आ.जगताप पुढे म्हणाले, नगरसेवकांचे विकास कामांना चांगले सहकार्य मिळते, त्यामुळे सर्वांना सारखा निधी देण्याचा प्रयत्न असतो. मात्र प्रभाग 2 हा खूप मोठा असल्याने येथील नगरसेवक कामे करुन घेण्याबाबत माघार घेत नाही, त्यामुळे या भागात विकासाचे पर्व सुरु आहे. गुलमोहोर रोड रस्ता रुंदीकरण होऊन चौक सुशोभिकरणासह शिलाविहार रोड, पाईपलाईन रोड रस्त्यांची कामे सुरु झाली असून, लवकरच ती पूर्ण होतील, असे सांगितले.
     श्री.वारे म्हणाले, एलईडी दिव्यांमुळे प्रभाग उजळला आहे. 80 टक्के काम पूर्ण झाले आहे, राहिलेले काम सुरु आहे. सुमारे 2300 दिवे आमच्या प्रभागात बसविले. या कामासाठी आ.संग्राम जगातप यांचे मोठे सहकार्य मिळाले, त्यामुळे दिव्यांची माळ घालूनच त्यांना आम्ही सन्मानित केले, याचा आनंद वाटतो.
     यावेळी विनित पाउलबुधे, सुनिल त्र्यंबके, बाळासाहेब पवार आदिंनी आपली मनोगते व्यक्त करतांना प्रभागातील केलेल्या कामांचा आढावा घेऊन आ.जगतापांमुळे कामे मार्गी लागल्याने विकासाला गती मिळाली असे सांगितले. बहार अर्बन बँक कॉलनी व जगदंबा युवा प्रतिष्ठान यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
-------
     

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post