नगर : सुधीर मेहता यांचे नगरच्या पत्रकारितेसह सामाजिक उपक्रमांमध्ये मोठे योगदान आहे. नगर महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळ रुजविण्याचे काम त्यांनी केले. सुरुवातीच्या काळात एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष व काँग्रेसचे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी काँग्रेसच्या वाटचालीत मोठे योगदान दिले. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आपल्या कार्यातून ठसा उमटविणारे अवलिया व्यक्तिमत्त्व त्यांच्या रूपांनी रूपाने नगरकरांनी गमावल्याची भावना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
मेहता काही दिवसांपूर्वी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. नगर शहराच्या दौऱ्यावर असताना ना. थोरात यांनी मेहता कुटुंबीयांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत सांत्वन केले. राज्याचे जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख हे देखील यावेळी उपस्थित होते. मेहता यांचे चिरंजीव व दैनिक पुढारीचे उपसंपादक मयूर मेहता, पत्नी कल्पना मेहता, किशोर मेहता, सुशीलकुमार शहा, सायली मेहता, पत्रकार श्रीराम जोशी, मिलिंद देखणे, आमिर शेख, अमित गटणे, सुरज कुरलिये आदींसह कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.
यावेळी थोरात म्हणाले की, सुधीर हे माझे मित्र होते. सतत काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची त्यांची धडपड असायची. त्यांनी उभी हयात सामाजिक चळवळीमध्ये काम केले. त्यांना अनेक चांगल्या गोष्टींचा व्यासंग होता. पुणे फेस्टिवलच्या धर्तीवर नगरमध्ये सुमारे पंचवीस वर्षे नगर महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळ रुजविण्याचे काम त्यांनी केले.
यावेळी थोरात यांनी मेहता यांच्या बरोबरच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. नगर शहराचे दिवंगत आ.नवनीतभाई बार्शीकर यांच्या कार्याविषयी मेहता यांना असणारी मनापासूनची आस्था आणि बार्शीकर यांचा शहराच्या विकासासाठीचा असणारा विचार सातत्याने तेवत ठेवण्यासाठी नवनीतभाई बार्शीकर मंचाच्या माध्यमातून मेहता यांचा अनेक वर्षांपासून सुरू असणारा यज्ञ याबद्दल थोरात यांनी यावेळी मेहता कुटुंबीयांकडे कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी ना.थोरात यांच्यासह आ. लहू कानडे, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी मनापा विरोधी पक्षनेता दशरथ शिंदे, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, ओबीसी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, उपाध्यक्ष निजाम जागीरदार, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट आदी उपस्थित होते.
Post a Comment