माजी मंत्री राम शिंदेचे कर्जतला मौन आंदोलन



अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. यात कर्जत नगर पंचायतीचाही समावेश आहे. या निवडणूक कार्यक्रमात आज उमेवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. भाजपच्या चार ते पाच उमेदवारांनी अचानक उमेदवारी अर्ज माघारी घेतले. यावर संतप्त झालेले भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री राम शिंदे यांनी निवडणूक प्रक्रियेत बळाचा वापर झाल्याचा आरोप करत कर्जत मधील गोदड महाराज मंदिरासमोर मौन आंदोलन सुरू केले आहे. 

कर्जत नगरपंचायतच्या 17 जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र आरक्षणाच्या गुंत्यामुळे 17 पैकी 13 जगांवर निवडणूक होत आहे. ही निवडणूक आमदार रोहित पवार व राम शिंदे यांनी प्रतिष्ठेची बनविली आहे. निवडणूक जाहीर होण्या आधीच राम शिंदे यांचे समर्थक असलेले प्रसाद ढोकरीकर व नामदेव राऊत यांच्या सारखे दिग्गज भाजपला राम राम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. भाजपला मोठे खिड्डार पाडण्यात आमदार रोहित पवार यशस्वी झाले. मात्र राम शिंदे यांनी न खचता निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
राम शिंदे यांनी तरूण व नवख्या कार्यकर्त्यांना बरोबर घेत निवडणुकीसाठी पक्ष बांधणी केली. सर्व जागांवर उमेदवार दिले. मात्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या चार ते पाच उमेदवारांनी उमेवारी अर्ज माघारी घेतले. हे उमेदवारी अर्ज राष्ट्रवादी काँग्रेसने दबाव तंत्राचा वापर करून माघारी घ्यायला लावले, असा आरोप राम शिंदे यांनी केला. त्यांनी पंचायत समितीत जाऊन निवडणूक अधिकाऱ्यासमोर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच राम शिंदे यांनी समर्थकांसह तडक कर्जतचे ग्रामदैवत असलेल्या गोदड महाराज मंदिरासमोर जाऊन ठिय्या मांडला. तसेच मौन आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. तर राज्यभर चर्चेचा विषय होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post