नगर - भाजपा प्रदेश उपाध्यक्षा सौ चित्राताई वाघ यांनी पिडीत कै सुमन काळे प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर व त्यांनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रशासनाचे पितळ उघडे पाडल्यामुळे खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने पिडीतेच्या परिवाराला कोर्टाच्या आदेशाने जी मदत 1 वर्षांपूर्वी देणे अपेक्षीत होते ती तातडीने देऊ केली.
भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी सांगितले की, पारधी समाजातील कार्यकर्त्या सुमन काळे यांची 14 वर्षांपूर्वी पोलीस कोठडीत मारहाण झाल्याने निर्घृण हत्या झाली. सदर प्रकरण अजूनही न्यायालयीन प्रक्रियेत आहे. या केस संदर्भात माननीय कोर्टाने राज्य सरकारला रुपये पाच लाख भरपाई म्हणून काळे परिवाराला द्यावेत, असा आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी अद्यापपर्यंत झाली नव्हती.
सदर बाब पक्षाच्या नेत्या सौ.चित्रा वाघ यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी गेले काही दिवस याचा अनेक पातळ्यांवर काळजीपूर्वक पाठपुरावा केला. त्याची परिणीती म्हणजे आज अखेर राज्य शासनाने पाच लाख रुपयांचा डीडी सुमन काळे यांच्या कुटुंबियांना प्रदान केला आहे.
या संदर्भात आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे सौ चित्रा वाघ यांनी सदर प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर एकेक मुद्दा शांतपणे समजून घेतला. ज्या बाबी माहीत नाही त्या विचारल्या, स्वतः लेखी नोट्स काढल्या मुद्देसूदपणे राज्य शासनापुढे त्या मांडल्या.
या संपूर्ण प्रकरणाकडे पाहिल्यास राजकीय दृष्टीने यात कसलाही लाभ नसताना फक्त सामाजिक भान म्हणून चित्रा वाघ यांच्यासारखे राजकीय नेते सामान्य नागरिकांना येणार्या अडचणींची योग्य ती दखल घेत न्याय देण्यासाठी झगडतात ही दिलासादायक बाब असल्यचे त्यांनी सांगितले.
----------
Post a Comment