दंगलीची नि:पक्षपणे चौकशी करुन नागरिकांवरील कारवाई थांबवावी - भैय्या गंधे
नगर - मालेगाव, अमरावती व नांदेड येथे घडलेल्या दंगलीची निवृत्त न्यायमूर्ती मार्फत चौकशी करुन रझा अकादमीवर बंद घालावी, तसेच नागरिकांवर होत असलेली कारवाई बंद करावी, या मागणीसाठी भाजपाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करुन निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, अॅड.विवेक नाईक, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, तुषार पोटे, मनेष साठे, संतोष गांधी, दिलीप भालसिंग, बाळासाहेब महाडिक, वसंत राठोड, शिवाजी दहिंडे, बाळासाहेब गायकवाड, सचिन पोटरे, अजय चितळे, विलास गांधी, शशांक कुलकर्णी, अनिल गटणे, संजय ढोणे, साहेबराव काते,सुमित बटुळे , आदि उपस्थित होते.
याप्रसंगी भैय्या गंधे म्हणाले, त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना, जगात कोठे तरी मशिदीची नासधूस झाल्याची क्लिप व्हायरल करून महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती व नांदेड येथे नुकत्याच दंगली झाल्या. पंधरा हजार ते चाळीस हजार लोकांचे जमाव रस्त्यावर उतरून दुकाने, कार्यालये, गाड्या यांचा विध्वंस केला गेला. याचा भारतीय जनता पार्टी निषेध करते. जमावाने केलेल्या हिंसाचाराची उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून प्रामुख्याने अमरावतीमध्ये लोक रस्त्यावर उतरले. ते कोण्या एका पक्षाचे नव्हते व कोणी त्यांचे नेतृत्व करत नव्हते. स्वसंरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरही हल्ले केले गेले. त्यानंतर पोलीस यंत्रणेकडून पक्षपाती पद्धतीने कारवाई केली जात असल्याचा आरोप भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे म्हणाले, मालेगाव, अमरावती व नांदेड येथे समाजकंटकांनी अफवा पसरवून दंगल घडविली. या लोकांवर कारवाई होण्याऐवजी त्यांना पाठीशी घालून स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या सामान्य लोकांना मात्र पोलिसांकडून लक्ष्य केले जात आहे. सामान्यावर होणारी कारवाई थांबवावी, ही दंगल घडविणार्या रझा अकादमीवर बंद घालावी, अशी मागणी आम्ही करत आहोत.
मुख्यमंत्री यांच्या नावे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेच्या आधारे मालेगाव, अमरावती व नांदेड येथे अफवा पसरवून व धार्मिक भावना भडकवून दंगल घडविण्याच्या प्रकाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत झाली पाहिजे. ही दंगल घडविणार्या सूत्रधारांना व त्यांच्या समर्थकांना अटक केली पाहिजे. दंगलीत हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घातली पाहिजे. स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरील कारवाई बंद करावी.भारतीय जनता पार्टीच्या नेते - कार्यकर्त्यांवरील पूर्वग्रहदूषित कारवाई थांबवावी आणि त्यांच्याविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. असे निवेदनात म्हटले आहे.
Post a Comment