जिल्हास्तरीय मराठी भाषा समितीवर डॉ .कळमकर यांच्यासह मरकड, शिंदे, नजान यांची नियुक्ती

अहमदनगर-   प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर न करण्यासंदर्भात प्राप्त होणाऱ्या तक्रारींची चौकशी करून निराकरण करण्यासाठी व मराठी भाषेच्या संदर्भातील उपक्रम राबवण्यासाठी  अहमदनगर जिल्हास्तरीय मराठी भाषा समिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी गठीत केली आहे. या समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर ,महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शाखा कार्याध्यक्ष साहित्यिक पत्रकार किशोर मरकड, ज्येष्ठ साहित्यिक प्रा .शशिकांत शिंदे, नाट्य लेखक,दिग्दर्शक, अभिनेते व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ समन्वयक नाटय परिषदेचे माजी अध्यक्ष  शशिकांत नजान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे असणार असून  सचिव म्हणून सामान्य प्रशासन तहसीलदार हे आहेत. शासकीय सदस्य म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषद माध्यमिक व प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी हे सदस्य राहणार आहेत.
डॉ . संजय कळमकर हे नामवंत साहित्यिक असून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत तसेच प्रभावी वक्ते व कथाकथनकार म्हणून ते महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. शशिकांत शिंदे हे प्रसिद्ध कवी असून स्वतः सारडा महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीत आहेत. तसेच किशोर मरकड हे साहित्यिक असून गेली 20 वर्षापासून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून या कार्यात सक्रिय आहेत .शशिकांत नजान हे अभिनेते,लेखक , दिग्दर्शक असून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि नाट्य परिषदेच्या माध्यमातून नाट्य, चित्रपट,सांस्कृतिक चळवळीशी संबधीत आहेत . त्यांच्या निवडीबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post