आंदोलनाचा माजी नगरसेविका शारदा ढवण यांचा इशारा
नगर - अ.नगर महानगरपालिकेतील प्रभाग 1मध्ये नागरी समस्यांचा बोजवारा उडाला असून, नागरिकांचे खूप हाल होत आहेत. या संदर्भात महानगरपालिका उपायुक्त श्री. डांगे यांना निवेदन देऊन माजी नगरसेविका शारदा ढवण यांनी लक्ष वेधले आहे. या निवेदनावर शारदा ढवण यांच्यासह ऋषी ढवण, अनिल ढवण, भाग्येश शिंदे, रोहन ढवण, विजय शिंदे, गुरूनाथ क्षेत्रे, शुभम वाटक, प्रकाश भोंडवे, स्वप्नील दिवटे, हर्षद आगळे, नजन, दीपाली शेंदूरकर, मीना वाटक आदींच्या सह्या आहेत.
निवेदनात ढवण यांनी म्हटले आहे की, तपोवन हडको परिसरातील नागरिकांकडून कररूपी पैसे मात्र महापालिका गोळा करते. मात्र, त्यांना कुठल्याही प्रकारच्या नागरी सुविधा दिल्या जात नाहीत. या भागातील नागरिकांना रस्ता, लाईट, गटार, पाणी, कचरा व्यवस्थापन आदी नागरी सुविधा मागील अनेक वषार्र्ंपासून मिळत नाहीत. मागील 15 वर्षांपासून अंतर्गत रस्त्यांची कामे झालेली नाहीत. मुख्य रस्त्याची साधी डागडुजी देखील करण्यात आलेली नाही. या भागातील गटार पूर्णपणे चोकअप झालेले आहे. त्यामुळे गटारीचे व मैलामिश्रित पाणी रस्त्यावर वाहत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कोरोनामुळे आधीच वैतागलेल्या नागरिकांना साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागते की काय, ही भीती सतावते आहे. या भागात खांब आहेत. मात्र, त्यावर दिवे नाहीत. ते पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे अंधाराचे साम्र्राज्य पसरले असून, चोरट्यांची भीती कायम आहे. कचरा उचलणार्या गाड्या या भागात कधीतरी व अवेळी येतात. पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत असून, पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. समस्यांच्या सोडवणुकीसाठी अनेक वेळा मनपाकडे पाठपुरावा केला. मात्र, कोणीही दाद देत नाही. आम्ही महानगरपालिकेत आहोत की नाही, असा प्रश्न आम्हा सर्वांनाच पडला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही. येत्या 15 दिवसांत या भागातील समस्यांचे निराकरण करावे. अन्यथा नागरिकांसमवेत तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात म्हटले आहे.
Post a Comment