संसर्गाची साखळी तोडण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवा - जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र. भोसले

संसर्गाची साखळी तोडण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढवा - जिल्हाधिकारी डॉ. भोसले

सर्व तालुक्यांचा आठवडाभरात करणार पुन्हा दौरा; कोरोना उपाययोजनांचा घेणार आढावा
अहमदनगर:  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गाव हे केंद्र मानून कार्यवाही केली जात आहे. जिल्ह्यात हिवरे बाजार गावाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि त्याला मिळालेले यश पाहता त्याप्रमाणे सर्व गावांनी कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिल्या आहेत. संभाव्य रुग्णांना शोधून कोरोना चाचण्या वाढविणे आणि संसर्गाची साखळी तोडणे आवश्यक असून तशी कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या असून आठवडाभरात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह पुन्हा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा दौरा करुन आढावा घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले दैनंदिनरित्या तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून कोरोना उपाययोजना आणि त्याबाबत तालुकास्तरीय यंत्रणांना येणाऱ्या अडचणी, करावयाची कार्यवाही आदींबाबत मार्गदर्शन करत आहेत. गेले काही दिवस जिल्ह्यातील रुग्णसंख्या घटताना दिसत असली तरी गाफील न राहता चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिल पोखरणा, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे जिल्हा मुख्यालय तर उपविभाग, तालुकास्तरावरील महसूल, पोलीस, ग्रामविकास, आरोग्य आणि नगरविकास विभागाचे अधिकारी  आदी उपस्थित होते.

 
नुकतेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील बाधित रुग्णसंख्या जास्त असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता. त्यात त्यांनी अहमदनगर जिल्हयातील होम आयसोलेशन (गृह विलगीकरण) पूर्णपणे बंद करण्याच्या आणि आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. क्षीरसागर यांनी तालुकास्तरीय यंत्रणांना दिले.

सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अॅण्टीजेन चाचणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले होते. मात्र, अद्यापही काही नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात कार्यवाहीची गती कमी आहे. ही गती वाढविण्याची सूचना त्यांनी दिली. एकीकडे चाचण्यांची संख्या वाढेल तसे त्या चाचण्यांची नोंद तात्काळ पोर्टलवर घेणे आवश्यक आहे. प्रत्येक तहसीलदारांनी याबाबत आढावा घेऊन नोंदी प्रलंबित राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.

कोविड केअर मधील स्वच्छता अत्यावश्यक असून याबाबत कंत्राटी कर्मचारी नेमून कार्यवाही व्हावी. कोविड सुसंगत वर्तणूकीबाबत नागरिकांना प्रोत्साहित करावे. मास्कचा वापर, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन, सॅनिटायझरचा वापर आवश्यक आहे. याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही करावी. प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कार्यवाही करावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
तालुकास्तरीय अधिकारी यांनी गावपातळीवर जाऊन कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीकडे लक्ष द्यावे. आदर्श गाव हिवरे बाजार मॉडेल राबविण्याबाबत यापूर्वीच सूचना देण्यात आल्या आहेत. याकामी गावातील सामाजिक संघटनांचाही सहभाग घ्यावा, असे ते म्हणाले. यासोबतच, माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. सर्वेक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या पथकांद्वारे घरोघरी जाऊन सर्वेक्षण होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. 



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post