पाथर्डी(विशेष प्रतिनिधी) पाथर्डी तालुक्यातील
मोहोजदेवढे येथील शेतकरी जालींदर देवगुण उबाळे व कविता भाऊसाहेब देवढे यांचा तीन एकर ऊस दि १२/४/२०२१ रोजी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून जळून खाक झाला. विद्युत शाॅर्टसर्किट मुळे हा अपघात झाला असून यामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. आग आणी धुराचे लोट पाहून परिसरातील अनेक शेतकरी घटनास्थळी धावत आले. परंतु नियंत्रणाबाहेर गेलेली आग पाहता ऊस वाचविणे शक्य झाले नाही. मोहोजदेवढे परिसरात चालू वर्षी चांगली ऊस लागवड झाली आहे. सदर गावाचे क्षेत्र हे वृध्देश्वर सहकारी साखर कारखानाच्या कार्यक्षेत्रातील असून सदर कारखान्याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या ऊसनोंदी केलेल्या आहेत. परंतु कारखान्याकडील नियोजनाच्या अभावामुळे गटातील शेकडो एकर ऊस तोडणी अभावी तसाच उभा आहे. ऊसतोडणी कामगारांच्या टोळ्या पुरविण्यात कारखाना हतबल असल्याचे दिसत आहे. अनेक संघटनांनी कारखाना व्यवस्थापन आणी वजनकाटे याबाबत हरकत घेणारे आंदोलने केली. परंतु सर्वसामान्य शेतकर्यांबाबत कारखान्याचे संचालक डोळ्यावर कातडे ओढून बसले आहेत.
शिल्लक ऊसाबाबतचा प्रश्न तसाच असतांना जळिताच्या घटना घडण्यामागे विद्युत कंपनीचाही गलथान कारभार समोर येत आहे. परिसरात अनेक ठिकाणी असुरक्षितपणे लोंबकळत असलेल्या विद्युत तारा परस्परांना चिकटून आगीचे लोळ ऊसाच्या फडात पडून जळिताच्या घटना घडतात.
सदर जळीतामुळे परिसरातील शेतकर्यांमध्ये कारखाना प्रशासन आणि विद्युत कंपनीच्या बाबत तीव्र नाराजी पसरली आहे. एकीकडे कोरोना महामारीचे संकट आणि दुसरीकडे अशा प्रकारच्या घटना यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडला आहे.
Post a Comment