स्वयंसेवक दक्ष! कोविड सेंटर करणार सुरू


नगर :(प्रतिनिधी) नगरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने आता विविध स्वयंसेवी संस्था पुढे येऊ लागल्या आहेत. समाजसेवेसाठी कायम तत्पर असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्याण समिती, हिंद सेवा मंडळाचे रामकरण सारडा विद्यार्थी गृह आणि येथील महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सिव्हील हडको परिसरातील रामकरण सारडा विद्यार्थी गृह येथे ५० बेडचे “केशव - माधव कोविड केअर सेंटर” (विलगीकरण कक्ष) सुरू करण्यात येत आहे.
सध्याच्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोरोना विलगीकरण केंद्राची आवश्यकता पाहून केशव - माधव कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे सेंटर एकूण ५० बेडचे असणार असून त्यामध्ये विलगीकरणासोबतच आवश्यक त्या सर्व सुविधा राहणार आहेत. हे कोविड सेंटर पूर्णतः निःशुल्क असणार आहे. कोरोना लागण झालेल्या ज्या रुग्णांचे विलगीकरण आवश्यक आहे, आणि घरात सुविधा नाही, अशा रुग्णांना येथे दाखल करुन घेतले जाईल. रुग्णांना येताना कोरोना रिपोर्ट, आवश्यक त्या रक्त तपासण्याचे रिपोर्ट, एचआरसीटी  रिपोर्ट आणि आपल्या आधार कार्डची झेरॉक्स सोबत आणणे बंधनकारक आहे. त्याच बरोबर रुग्णांनी रोजच्या वापरासाठी लागणारे पांघरूण, टॉवेल, वैयक्तिक स्वच्छतेचे सामान, ताट, वाटी, पेला, पाण्याची बाटली, आपल्या अन्य आजारांवर चालू असलेली औषधे या सर्व गोष्टी सोबत घेऊन याव्यात. वाहनतळाची सोय नसल्याने कोणत्याही प्रकारचे वाहन रुग्णाने आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. येथे दाखल होणाऱ्या रुग्णांचे  शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी संपूर्ण दिवसभराची दिनचर्या तयार करण्यात आली आहे. त्यात सकाळचा चहा, नाष्टा, दोन्ही वेळचे जेवण, औषधे,  प्राणायाम, योगा, जरुरीप्रमाणे व्यायाम तसेच त्यांची मनस्थिती सकारात्मक राहण्यासाठीचे कार्यक्रम यांचे दिवसभराचे नियोजन डॉक्टर्स, महापालिका प्रशासन आणि जनकल्याण समिती व संघाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केले जाणार आहे. आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वानुसार या सेंटरमध्ये काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. त्या निर्देशानुसार रुग्णास ७ दिवस या कोविड केअर सेंटरमध्ये विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जनकल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष सुधीर झरकर, उपाध्यक्ष अभय मेस्त्री, कार्यवाह डॉ.मनोहर देशपांडे, आरोग्य आयाम प्रमुख व या सेंटरचे प्रमुख राजेश परदेशी व सहप्रमुख पी. डी. कुलकर्णी, हिंद सेवा मंडळाचे संस्थेचे सचिव संजय जोशी, अध्यक्ष शिरीष मोडक, कार्याध्यक्ष अजित बोरा, शामसुंदर सारडा, समन्वयक मकरंद खेर व मधुसुदन सारडा आणि सर्व कार्यकारिणी सदस्य व अधिक्षक भोसले यांनी केले आहे.
....
चौकट

मदतीचे आवाहन

संपूर्ण विनामुल्य असलेल्या या कोविड सेंटर करता आपण पण आर्थिक किंवा वस्तूरुपात मदत करू शकता , दिलेल्या देणगीला  ८० जी अंतर्गत आयकरातून  सूट मिळणार आहे, तरी सर्व दानशूर व्यक्तींनी यासाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9890055409 / 8208985828 या नंबरवर संपर्क करावा.
....

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post