पुणे:( विशेष प्रतिनिधी)पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचा अखेर कोरोनाने बळी घेतला. राजेंद्र सरग यांच्यावर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मनमिळावू म्हणून त्यांचे माध्यम क्षेत्रामध्ये नावलौकिक होते.
जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी सरग यांना कोरोना झाल्याचे समजताचं अनेक वेळा डॉक्टरांशी संपर्क साधून मदत करण्याच्या सूचना केल्या. मात्र कोरोना पुढे जिल्हाधिकाऱ्यांचे प्रयत्नही अपयशी ठरल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सरग यांना वाचवण्यासाठी मोठे प्रयत्न केले परंतु काहीच होऊ शकले नाही. त्यामुळे पुण्यात कोरोनाची परिस्थिती अतिशय भयंकर असल्याचे जाणवत आहे.
सरग यांचा माध्यम क्षेत्रात दांडगा संपर्क होता. सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. अवघ्या पंधरा दिवसांनी त्यांचे प्रमोशन होणार होते. यामुळे माहिती खात्यामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी पहाटे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मावळली.
सरग हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील होते. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी औरंगाबाद येथील दैनिक तरुण भारत मधून पत्रकारितेला सुरुवात केली होती. त्यानंतर राज्य स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची माहिती संचालनालयात नियुक्ती झाली.गेल्या चार वर्षांपासून ते पुण्यात जिल्हा माहिती अधिकारी या पदावर होते.
राजेंद्र सरग यांनी पुण्याबरोबरच बीड, अहमदनगर, परभणी अशा अनेक ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले होते. व्यंगचित्र रेखाटन हा त्यांचा छंद होता. राज्यातील विविध दैनिके, साप्ताहिके व दिवाळी अंकांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून ते मोफत व्यंगचित्र करून देत असत. मदतीला धावून जाण्याच्या स्वभावामुळं त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. प्रशासकीय कौशल्य व आजवरचे काम पाहून येत्या आठवड्यात सरग यांना बढती दिली जाणार होती. मंत्रालयातून तशी माहिती देण्यात आली होती. दुर्दैवानं त्यांची ही संधी हुकली.
राजेंद्र सरग यांची पत्नी व एका मुलाला देखील करोनाची लागण झाली आहे. त्याशिवाय, पुणे जिल्हा माहिती कार्यालयातील सात अधिकाऱ्यांना करोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. एक कार्यक्षम, मनमिळावू अधिकारी व पत्रकारांचे मित्र असलेल्या सरग यांच्या अकाली निधनामुळं प्रशासकीय व माध्यम क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
Post a Comment