नवनीत विचार मंचच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात
नगरमधील विकास कामांच्या आठवणींना उजाळा देत
नवनीतभाई बार्शीकर यांना जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन
नगर - नगरचे राजकारण अतिशय गढूळ झालंय. कोळसा जसा कितीही उगाळला तेवढा काळाच .अशा राजकारणपेक्षा नवनीतभाईचां सुवर्णकाळ आठवून त्या विकास पर्वाची पुन्हा पुनरावृत्ती करण्यासाठी आपण एक सशक्त दबाव गट उभा करून या शहराला पुन्हा वैभव प्राप्त करून देवू. जन्मशताब्दी निमित्त हीच भाईंना योग्य आदरांजली होईल, अशा शब्दात माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी अभिवादन केले. ते पुढे म्हणाले, नवनीत विचार मंच माध्यमातून अध्यक्ष सुधीर मेहता यांनी भाईंची आठवण जपण्याचे आणि अन् जन्मशताब्दी निमित्त विविध प्रकल्पांचे आयोजन केले आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे आणि सहकार्य करावे असे आवाहन श्री.निमसे यांनी केले.
नवनीतभाई बार्शीकरांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात डॉ. निमसे, जैन मंदिर अध्यक्ष सुभाष मुथा, मंचचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी इंजि. अमृत मुथा, आर्किटेक्ट असोसिएशनचे अर्शद भाई शेख, रसिक ग्रुपचे जयंत येलुलकर, जागरूक मंचचे सुहासभाई मूळे, पत्रकार प्रकाश कुलकर्णी, सुशील शाह, जनार्दन शिरसाठ, डॉ. कमर सुरुर, श्रीमती बागडे राजन नवले, महावीर पोखरणा, अबिद खान आदींनी अभिवादन करून आपल्या भावना व्यक्त करून शताब्दी कार्यक्रमाबाबत सूचना मांडल्या.
प्रारंभी नवनीत विचार मंचचे अध्यक्ष सुधीर मेहता यांनी शताब्दी समितीच्या अध्यक्ष पदासाठी डॉ.निमसे यांच्या नावाची सूचना केली सुभाष मुथा यांनी अनुमोदन दिले आणि सर्वांनी टाळ्या वाजवून या निवडीचे स्वागत केले. सुधीर मेहता यांनी भाईंची उपेक्षा करणारांना आता नगरकर ‘कृतघ्न पालिका पुरस्कार’ देतील असे सांगितले. सर्व संस्था, संघटना एकत्र आल्यातर भाईंची स्मृती जपण्याचा उद्देश सफल होईल. प्रत्येकाने आपल्या घरावर नवनीतनगर आणि शहरात कृतज्ञता फलक लावावेत, असे आवाहन करतानाच गौरव ग्रंथसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले
पुढे बोलताना सुधीर मेहता म्हणाले की, नवनीतभाई बार्शीकर विचार मंचाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष भाईंचे विचार जपण्याचे काम आम्ही केले. भाईंनी नगर शहराला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. परंतु त्यांनी विकासाचं सुरू केलेलं काम खंडित झालं आहे. ते नव्याने सुरू होण्याची गरज आहे. अभिवादन कार्यक्रममध्ये मेहता यांनी नेहरू उद्यानाच्या पुनरुज्जीवन करण्यासाठी नवनीतभाई विचारमंच पुढाकार घेईल असे जाहीर केले.
सुभाष मुथा म्हणाले की, आम्ही भाईंच्या बरोबर काम केलं. तो काळ सुवर्णकाळ होता. आम्ही त्यांच्या नावाने होणार्या जन्मशताब्दी महोत्सवासाठी सर्वतोपरी योगदान देऊ. किरण काळे म्हणाले की, नवनीत भाईंचे विचार शहरातील आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहचविण्याची गरज आहे. जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी तरुणांच्या जास्तीत जास्त सहभागासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
जयंत येलुलकर म्हणाले की, भाईंमध्ये रसिकता होती. त्यांनी केलेल्या विकास कामांमधून ती प्रकर्षाने जाणवते. नवनीत विचार मंचच्या या शताब्दी कार्यक्रमात आपण पूर्ण ताकतीने सहभागी होऊ. सुधीर मेहता यांचे त्यांनी खुल्या मनाने अभिनंदन केले आणि त्यांच्यामुळे आठवण, त्यांच्या कार्याची ओळख आजच्या पिढीला होत आहे असे ते म्हणाले. हर्षद शेख यांनी सांगितले की, शहराची दुरावस्था झाली आहे, प्रत्येक ठिकाणी पावलोपावली भाईंच्या कामाची आठवण नगरकरांना होत असते. भाईंना सगळे विकास पुरुष म्हणतात, पण भाई हे खर्या अर्थाने विकासपर्व होते. त्यांच्या नंतर नगरला काही झाले नाही आणि ज्यांच्यामुळे नगरची ही दुरावस्था झाली त्यांच्या पुढे आपण पाहातच राहीलो.
भाईंच्या बरोबर इंजिनिअर म्हणून काम केलेले अमृत मुथा यांनी सांगितले की, आज नगरहून तरुण पिढी नोकरीकरिता बाहेर जाते. त्याकाळात भाईंनी मला नगरला आणलं आणि पालिकेचे महत्त्वाचे प्रकल्प राबवण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवली, महत्त्वाची मोठी कामे झाली. आज मात्र नगरला तरुणांना रोजगार नाही अशी खंत अमृत मुथा यांनी व्यक्त केली. सुधीर मेहता यांचे त्यांनी अभिनंदन केले त्यांच्यामुळे आज भाईंची आठवण जपली जातानाच नगरच्या विकास प्रश्नांना सुद्धा नवनीत विचार मंचच्या माध्यमातून चालना मिळणार आहे, असे सांगितले.
सुहास मुळे म्हणाले की, भाईंच्या रूपाने नगरला विकासपुरुष मिळाला. हे शहराचे भाग्य आहे. आपली सर्वांची वज्रमूठ करा सगळे सरळ होतील, असे सांगीतले.
कार्यक्रमाचे संयोजन सुशील शाह, श्रीराम जोशी, जनार्दन शिरसाठ, किशोर मुनोत, सायली मेहता आदींनी केले. आभार श्रीराम जोशी यांनी मानले.
-------
कृपया प्रसिद्धीसाठी सुधीर मेहता
फोटो - नवनीतभाई बार्शीकर जन्म शताब्दी निमित्त त्यांना अभिवादन करताना माजी कुलगुरू डॉ.सर्जेराव निमसे, सुभाष मुथा, संयोजक सुधीर मेहता, डॉ. कमर सुरूर, जयंत येलुलकर, सुहास मुळे, अमृत मुथा, राजन नवले, अर्शदभाई शेख, किरण काळे, सुशील शाह, महावीर पोखरण, जनार्दन शिरसाठ, श्रीमती बागडे, आबिद खान आदि. (छाया : जितेंद्र अग्रवाल
Post a Comment