‘कोरोना लसीत’ योगदान पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक

 


                    नगर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचे ‘कोरोना लसीत’ योगदान पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक


     नगर - अहमदनगर महाविद्यालयातील माजी विद्यार्थी डॉ.उमेश शालीग्राम हे सध्या पुणे येथील सिरम इन्स्टिट्युटमध्ये वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. कोरोना लस बनवत असलेल्या सिरम इन्स्टिट्युटला नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट देऊन पाहणी करुन कोरोनावरील लसीची माहिती घेतली. यावेळी सिरम इन्स्टिट्युटचे प्रमुख संचालक आदर पुनावाला व डॉ.उमेश शालीग्राम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोना लसी बाबतच्या सद्यस्थितीची माहिती दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ.उमेश शालीग्राम यांचे कौतुक केले.


     डॉ.उमेश शालीग्राम हे अहमदनगर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच त्यांनी काही काळ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा केलेली आहे. डॉ. उमेश शालीग्राम यांच्या या यशस्वी योगदानाबद्दल त्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांचे अनेकांनी अभिनंदन केले. याप्रसंगी डॉ.एन.आर.सोमवंशी, डॉ.ए.व्ही.नागवडे, डॉ. रझाक सय्यद, डॉ.बी.एम.गायकर, ए.वाय.बळीद आदि उपस्थित होते. महाविद्यालयातील मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.अभय शालीग्राम यांचे ते थोरले बंधू आहेत.


     यावेळी डॉ.बार्नबस म्हणाले, अहमदनगर महाविद्यालयातील माजी विद्यार्थी डॉ.उमेश शालीग्राम आंतरराष्ट्रीय किर्तीच्या महत्वाच्या लसीकरणाच्या उत्पादनात महत्वपूर्ण योगदान देत असल्याचा अभिमान आहे. महाविद्यालयाच्यावतीने देण्यात येत असलेल्या दर्जेदार  शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होत आहे. त्यामुळेच अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात चांगली कामगिरी करुन देशाच्या विकासात योगदान देत आहे, याचा महाविद्यालयाला अभिमान आहे. डॉ. उमेश शालीग्राम व त्यांच्या टीमला यश मिळून लवकरच कोरोना निर्मुलनाचे काम होईल, असा विश्‍वास डॉ.बार्नबस यांनी व्यक्त केला.


     लवकरच महाविद्यालयाच्यावतीने डॉ.उमेश शालीग्राम यांचा भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post