धनगर संस्कृती"
धनगरांमधील शौर्यत्वाचे दाखले प्राचीन काळापासून इतिहासात आढळून येतात, उदा. महाभारतीय युद्धप्रसंगी द्रोणाचार्याने जो चक्रव्यूह रचला होता त्यामध्ये या धनगर समाजाचा वापर करून घेतल्याचा उल्लेख आहे, असे लेखक म्हणतात.
कृष्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या विधवा पत्नींना घेऊन अर्जुन परतत असता पंचनदीत प्रवेश करीत असता अभिरांच्या टोळ्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा उल्लेख महाभारतात आहे. हे अभिर भारतात वायव्येकडून टोळ्यानी आले होते.
इ.स.पूर्वी 347 मध्ये जगज्जेता अलेक्झांडर हा जग जिंकण्याच्या इराद्याने भारतात आला त्याच्याशी टक्कर देणारा वीर राजा परिस(पोरस) हा गडरी धनगर होता. त्याचे शौर्य पाहून अलेक्झांडरने आक्रमणाचा आपला हेतू बदलून तो माघारी फिरला.
कर्नाटकातील विजयनगरचे(हम्पी) राजे धनगर होते. अभिरांची (धनगरांची एक शाखा) "अकौरक" नावाने प्रसिद्ध होती. कान्हेरी येथील शिलालेखात या राजांचा उल्लेख आढळतो. आपल्या नावाचा राजशक निर्माण करण्याइतपत ते बद्धमूळ झाले होते. ईश्वर सेन नावाचा अभिर राजा इ.स. तिसऱ्या शतकात होऊन गेला असा उल्लेख नाशिकच्या पांडव लेण्यातील शिलालेखात आढळतो.
वाकाटकांनी इ.स. 240 ते 550 असे दीर्घकाळ राज्य केले. त्यांची राजधानी वत्सगुल्म म्हणजे आजचे वाशिम होय. त्यांचे राज्य विदर्भ व मध्य प्रदेशातील काही प्रदेशांवर होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यांत बळवंत देवकाते, निंबाजी पाटोळे, दादाजी काकडे, व्यंकोजी खांडेकर, धनाजी शिंगाडे,बाळाजी बिजे,येसाजी थोरात, हिरोजी शेळके, भगवानराव देवकाते, मानकोजी धनगर, आबोजी पांढरे, नाईकजी पांढरे,बहिर्जी बंडगर इ. अनेक शूर वीर , विश्वासू लढवय्ये योद्धे होते. इंग्रजांना या देशातून घालविण्यासाठी गंगनाथ महाराजासारखे संत तसेच यशवंतराव होळकर, त्यांची सुपुत्री भीमाबाई होळकर, कित्तूरची राणी चन्नमा,संगोळी रायन्ना, बिरसा मुंडा,उमाजी नाईक इ. अनेक स्वातंत्र्य प्रेमी,ध्येयवेड्या योद्धयांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन ते शहीद झाले.
आकाश पांघरून, जमीन अंथरूण, निसर्गाच्या निष्पाप बालकांना प्रेमाने सांभाळणारा धनगर समाज काटक,निर्भय, शूर आणि तितकाच नम्र, शब्दाला जागणारा आहे आणि हा त्याच्या संस्कृतीचा एक भाग आहे. पण धनगरांचे समृध्द वाड्ङमय म्हणजे त्यांच्या ओव्या.
मा.ग.दि.माडगूळकर यांनी "धनगरी ओव्या म्हणजे संदर्भासह दिलेले, पैलू न पाडलेले अनगळ रत्न" असे त्याचे विश्लेषण केले आहे.
देव-देवतांचे स्मरण करून त्यांच्या समोर नम्र होऊन त्यांना नमन करण्यासाठी ओव्या म्हटल्या जातात.
धनगरी ओव्यांचे दोन भाग पडतात- एक म्हणजे "गाणे" जे गाऊन दाखविले जाते.
ते दुसरा भाग म्हणजे "रवता" हा भाग गोष्टी रूपाने सांगितला जातो. या कथेच्या भागाला "रूपादनी" म्हटले जाते. ओवीची गायलेली ओळ कधी कधी चार-चार वेळा सलग म्हटली जाते. तीच ओळ आळीपाळीने दुसरा,तिसरा, चौथा म्हणतो. या प्रत्येक वेळी नव्या चालीने म्हटली जाते, आवाज बदललेला असतो पण धागा मात्र तोच असतो. कथेची गुंफण घट्ट असते. या ओव्या मौखिक रूपात एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे प्रवाहित केल्या जातात.
विशेषतः आपल्या कुलदैवतांच्या आराधनेप्रसंगी त्या म्हटल्या जातात. तसेच या प्रसंगी गजनृत्याचा खेळ होतो. ढोल, ताशाच्या वादनाने सारा आसमंत घुमून जातो. पावा,बासरी,कैताळची त्याला साथ लाभते. अशा मंगल वातावरणात देव-देवतांच्या पालखीचा छबिना काढला जातो. देवतांशी एकरूप झालेल्या धनगरांच्या अंगात देव संचारतो. अशा देव संचारलेल्या भक्तांना या विश्वाचेही भान नसते, नश्वर शरीर, संसार, कशाकशाचेही भान नसते. काही भक्त तलवारीने आपल्या पोटावर वार करून घेतात. पण त्यांना कोणताही त्रास होत नाही. झालेल्या जखमांवर हळद भरली जाते आणि जखमा लगेच बऱ्या होतात अशी त्यांची श्रद्धा आहे. याला "हेडाम' खेळणे असे म्हणतात. प्रसंगी स्वतःला विसरून, कुटुंब, संसार सारे सारे विसरून परमेश्वराशी एकरूप होणारी, आत्यंतिक श्रद्धाळू अशी ही धनगर जमात. "श्रद्धा " हा त्यांच्या संस्कृतीतला अनमोल भाग आहे, असे लेखक आवर्जून उल्लेख करतात.
पण काही काळ हे सारे विसरणारा धनगर आपण "माणूस" आहे- हे विसरत नाही. आपल्या जबाबदाऱ्या , कर्तव्ये तो विसरत नाही. माणसा-माणसातील संबंध, नाती तो विसरत नाही. कुटुंब हे नाती-गोत्यातील पहिले केंद्र आहे याची त्याला जाण आहे. यामुळेच कुटुंबात जन्मलेले बाळ त्यांच्या स्वागतासाठी 'अहोई' अष्टमी असते. बाळासाठी तसेच नवविवाहितेसाठी खास साजरी केली जाते. कुटुंबाचे ऐक्य दृढमूल व्हावे यासाठी प्रथम पितर, नंतर घर, त्यानंतर गाव यांना नमन केले जाते. या सर्वांचे रक्षण केले जावे,त्यांना स्वास्थ्य लाभावे,त्यांची प्रगती व्हावी यासाठी प्रार्थना केली जाते.
आपल्या घरी सून म्हणून आलेली दुसऱ्या घरातील मुलीला स्वास्थ्य लाभावे, तिच्या सौभाग्याचे रक्षण व्हावे, तिला दीर्घायुषी मिळावे यासाठी नमन केले जाते. आपल्या घरातील मुलगी दुसऱ्याच्या घरी गेली तरी मूळ घरातील नातीगोती आतूट राहावीत यासाठी 'रक्षाबंधन' , 'भाऊबीज' हे खास दिवस आहेत. नणंदेचा सन्मान करण्यासाठी 'सकट' अथवा (तिलवा चौथ) विशेष दिवस आहे. तसाच सासूचा मान रखण्यासाठीही दिवस राखीव आहे. तीच गोष्ट 'पित्रश्राद्ध' मधून व्यक्त होते. म्हणजेच कुटुंबाचे- ऐक्य, कुटुंबाची एकात्मता प्रथम- त्यामधून समाजधारणा ही संकल्पना धनगरी समाजाने संस्कृतीने आपल्या कृतीद्वारे साकारलेली आढळून येते, असे लेखक म्हणतात.
धनगर संस्कृती उपक्रमातील चार उपक्रमानी लेखकाला आकर्षित केले आहे. विशेषतः त्यामागील त्यांचे विचार, त्यांच्या भावना आणि उपक्रम पद्धती- त्या पुढील प्रमाणे:-
1) धनतेरस :
आपल्या घरातील कचरा,नको असलेल्या वस्तू टाकण्यासाठी जो उकिरडा घराशेजारी केला जातो त्याची प्रतिकात्मक पूजा धनगर लोक धनतेरस या दिवशी करतात. या दिवशी यमदीपक तयार करून त्या खड्ड्याजवळ प्रज्वलित करून ठेवतात. आजपर्यंत आपण(या टाकाऊ वस्तूंनी) आमची जी सेवा केली त्याबद्दलचा हा कृतज्ञता भाव होय.
2) जाकबाबाची पूजा :
ज्या स्त्रियांना भाऊ नाही तसेच ज्या घरात गाई,म्हैशी आहेत त्यांना बांधण्यासाठी गोठे असतात. त्या गोठ्यातील खांबांना घरातील स्त्रिया आपला भाऊ मानतात व त्या खुंट्यांना रक्षापौर्णिमेला राखी बांधतात. हेतू हा भाऊ-बहिणीचा रक्षणकर्ता असतो. तसेच हा खुंटा गाईरूपी लक्ष्मीचा संरक्षणकर्ता आहे. तो त्या स्त्रियांच्या धनाचा रक्षणकर्ता होवो, अशी त्यामागची भावना आहे.
3) नागपंचमी :
धनगर नेहमी रानावनात, जंगलात, माळावर फिरत असतात. तेथे नागासारख्या विषारी प्राण्याची गाठ पडते.अशा विषारी प्राण्यांपासून संरक्षण असावे, वैरत्व नसावे, तसेच तोही आमचा देव आहे ही आपुलकीची, आत्मियतेची भावना नागामध्ये निर्माण व्हावी या हेतूने नागपंचमीच्या दिवशी नागाची प्रतिकात्मक मूर्ती करून घरातील दर्शनी दरवाजाच्या दोन बाजूस ठेवून त्यांची पूजा केली जाते.
4) होळी पौर्णिमा :
पूर्वी भटकंती करीत फिरणाऱ्या धनगरी टोळ्यांना अन्य टोळ्यांशी सतत संघर्ष करावे लागत असत.अशा टोळ्या-टोळ्यांमध्ये कायमचे वैरत्व राहू नये यासाठी होळी तयार करून त्यामध्ये "हे संघर्ष आम्ही जाळत आहोत" ही भावना स्पष्ट करण्यासाठी "होळी" हा उपक्रम करण्यात येतो.
आदि द्रवीड, द्रवीड, आर्यपूर्व, आर्य संस्कृती इ. शी धनगरांनी संघर्ष केला. प्रसंगी मिळते-जुळते घेतले. पण काही संस्कृती सारखे ते समूळ नष्ट झाले नाहीत हे त्यांचे वैशिष्ट्य अभ्यासकांना आवाहन करते.
विविध कालखंडामध्ये आलेली हिंसक आक्रमणे असोत, राजकीय क्रांत्या असोत, पंथ,धर्म इ.चे वैचारिक, हिंसक हल्ले असोत धनगरांनी पचविलेले दिसतात. आपला शारीरिक पराभव झाला तरीही आपल्या संस्कृती वरील त्यांची निष्ठा नष्ट झालेली दिसत नाही. ही विविध स्वरूपातील आक्रमणे धनगरांना नष्ट करण्यात अपयशी ठरलेली दिसतात.
असा हा स्वतंत्र सांस्कृतिक वैशिष्ट्ये असलेला, निसर्गाशी कायमची जवळीक साधणारा, बाह्य संस्कृतीपासून एका अर्थी अलिप्त राहून आपल्या प्रचीन-परंपरागत, निर्मळ अवशेषांचे रक्षण करणारा धनगर समाज अभ्यासनीय नाही का?
लोककथा, दंतकथा, मिथके, म्हणी, वाक्प्रचार, रूढी,परंपरा, लोकगीते इ. ची निष्ठापूर्वक जपणूक करीत सामुदायिक जीवनावर विश्वास ठेवून आपला समाजप्रवाह अखंडपणे चालू ठेवणारा धनगर समाज व त्याची संस्कृती अभ्यासनीय नाही का? असे लेखकाला अनेक प्रश्न उपस्थित होतात.
आजही आपणास अचंबित करणारी त्यांची देवस्थाने पहा. देव-देवता व त्यांची प्रतिके, त्यांच्या मूर्ती पाहा. धनगरांनी पवित्र मानलेले, अढळ निष्ठा असलेले त्यांच्या देव-देवता, प्रतिके कितपत आकर्षित करणारी आहेत? अशी ही श्रद्धास्थाने, गाव, वाडी, शहरांच्या मोक्याच्या ठिकाणावर आहेत का?
उलट ही श्रद्धास्थाने गावाच्या शिवेवर, सीमेवर तर काही शिवारे अथवा जंगलात असलेलीच दिसतात. पण धनगरांच्या जत्रा, पूजा, प्रार्थना, दिवा, हळद, यात्रा यामध्ये कधी खंड पडत नाही. त्यांच्या श्रद्धामूर्तींना आकाराचे, कलाकुसरीचा, सौंदर्याचा मोह पडलेला दिसत नाही. बहुतेक मूर्ती, प्रतिके ओबडधोबड आहेत. काही ठिकाणी तर दगडांचे गोटे, दगडांचे ढीग, छोट्या टेकड्या, धनगरांना पवित्र्याचे दर्शन देतात, अम्रूत पुरवितात, प्रकाश देतात, मार्गदर्शन करतात. संकटावर मात करण्यासाठी प्रेरणा देतात, हत्तीचे बळ देतात. वाघ-सिंहाची निर्भयता पुरवितात, असे लेखकाचे मत आहे.
निसर्गाने केलेल्या प्रेमाच्या वर्षावाने तसेच निसर्गाच्या वीविध रूपाने भारावलेल्या धनगराने निसर्गाला आपला रक्षणकर्ता मानला आहे, त्याला आपली श्रद्धा अर्पण केली आहे. दगड, धोंडे, डोंगर, नद्या, प्राणी,पक्षी,दिशा,निसर्ग चक्रांना आपल्या जीवनात मोलाचे स्थान दिले आहे. त्यांची लहान-मोठी प्रतिके तयार करून त्यांना देव-देवतांचे महात्म्य अर्पण केले आहे.
पूजा, प्रार्थना बलिदाने इ. दरवाजे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या भावभावनांचा धनगर गाजा-वाजा करताना दिसणार नाही. आपल्या श्रद्धा-भावना व्यक्त करीत असता आपल्या समाजबांधवांना विशेष आमंत्रित करण्याची त्याला गरज जाणवत नाही. पण अशा कार्यक्रमांना हजारो लाखो बांधव स्वयंप्रेरणेने उपस्थित राहतात. सर्व विधी कार्यक्रम सु-व्यवस्थितरित्या पार पडतात, असे लेखक म्हणतात.
संकलक : सुखदेव खांडेकर (एमबीए).
संदर्भ : शोध ग्रंथ :- "मी धनगर".
✍️ लेखक : श्याम येडेकर.
Post a Comment