वाडियापार्कच्या मैदानावर...
भल्या पहाटे वाडीया पार्कच्या मैदानात शिरलो. नेहमीप्रमाणे चिटपाखरूही नव्हतं. माणसंची वर्दळही नव्हती. फक्त अधुनमधून चिमण्यांचा चिवचिवाट, मधूनच बेडकांचा कर्कश आवाज. पहाट झाली असूनही रातकिड्यांची किरकिर मैदनावरची जीवन सृष्टीची जाणीव करून देत होती. जिमखान्याच्या बाजूला मात्र काहीतरी कुजबुज चालू होती. 4 ते 5 माणसं काहीतरी गहन विषयावर चर्चा करत होती. मी आडोश्याला राहून ते ऐकण्याचा प्रयत्न केला. शेवटी सभ्यपणा गुंडाळून चोरूनच ते पाहण्याच्या मनात कोतेपणा दर्शवून ऐकण्याचा प्रयत्न केला. विषय गंभीर होता. एक अशक्त व्यक्ती जीने कमरेभोवती फक्त पांढरे धोतर सदृश्य पंचा गुंडाळून हातात काठी घेऊन उभी होती. शरीर जरी थकलं होत मात्र चेहर्यावर सात्विकतेचे तेज होते. ती सांगत होती त्या काळात स्वतःच्या मागण्या मान्य करण्याकरिता आम्हाला आंदोलन, मोर्चा काढावी लागायची. ती अन्यायी परक्या देशातील बेलगाम वागणार्या ब्रिटीश सरकारविरुद्ध. ती लोकं फक्त राज्य टिकवायच आणि जास्तीत जास्त स्वतःला व स्वतःच्या देशाला फायदा होईल, या पद्धतीने धोरणे राबवायची. त्यावेळी मात्र मोर्चा आंदोलने, बेछुट लाठीचार्ज करत अश्रुधूर सोडून तुरूंगात टाकून जनतेचा आवाज दडपायचे. पण त्यावेळी कायदा - सुव्यवस्था चोख होती. गुन्हेगारी आजच्या प्रमाणे कमी होती. पण आज या लोकांनी माझ्या देशाच्या नागरिकांनी त्यांची व्यवस्था स्विकारली. पण त्या व्यवस्थेच्या कायद्यशाची अंमलबजावणी करण्यात 70 वर्षांनीही माझा देश व या देशाला चालवणारे तथाकथित राजकारणी अपयशी ठरले आहेत. कारण आज ही सिस्टीम गोरे ब्रिटीश लोक नाही तर माझ्या देशाचे लोक चालवत आहेत. कारण आज स्वतःच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लोकांना आपल्या देशात आपल्याच लोकांविरुद्ध मोर्चा काढून आंदोलन करून जर लढावे लागत असेल तर हे अपयश आपल्या सर्वांचे आहे. आणि राज्य व्यवस्था चालवणार्या सरकारचेही आणि फक्त सिस्टीम स्विकारली यांनी पण ती राबवायची कठोरता व निर्भिडपणा या व्यवस्थेत 70 वर्षांनीही आली नाही. सर्व लोक कायद्याप्रमाणे सिस्टीम प्रमाणे संविधानाच्या मुलभूत हक्कानुसार समान आहेत. तर जातीयतेचे पांघरून घेऊन लढायची वेळ समाजावर का येते? का अन्याय झाल्यावर, वाईट घटना घडल्यावर जातीचा आधार माझ्या देशातील लोकांना घ्यावा लागतो. का त्यांना स्वतःच्या वरील अन्यायासाठी रस्त्यावर यावं लागतं. याचे उत्तर देशाला 70 वर्ष स्वतंत्र्य होऊनही तो प्रश्न अनुत्तरीतच राहतो याचा मला त्रास होतो.
त्यानंतर मी पाहिले सदर व्यक्ती बोलत असतानाच सुटबुट घातलेली व्यक्ती उभी राहते आणि बोलू लागते. मी गावकुसाच्या बाहेरील लोकांना गावात आणण्यासाठी जी मेहनत घेतली, जो त्याग केला त्याचे 70 वर्षानंतरच्या आजच्या सामाजिक स्थितीकडे पाहून मला जाणवत आहे तो समाज फक्त गावात आला. पण त्याने वेशीत प्रवेश केला, पण विचारांची मानसिकता त्याने गावकुसाचीच ठेवली आहे. तो आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला. हपण विचारांची प्रगल्भता व जातीय व्यवस्थेची जोखड घेऊनच तो वेशी प्रवेशाला आहे. त्याने शिक्षण घेतले पण सामाजिकतेचे भान व संवेदनशिलता तो गावाबाहेरच ठेऊन आला. त्याचबरोबर ज्या समाज व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी मी आयुष्य घालवले त्याच समाज व्यवस्थेचे अनुकरण समाज आजही करत आहे. आरक्षण हा हक्क नव्हे तर ती प्रगतीसाठी केलेली एक लिफ्ट होती. ती फक्त गरज भासेल त्यावेळी वापरण्यासाठी त्याची तरतुद केली होती. पण तो त्याचा हक्क समजून आज त्यासाठी लढत असलेला पाहून माझे मन खिन्न होते आहे. माझ्या लढ्याला त्यांनी त्यांच्या जातीच्या चौकटीत आकसून बसून मला संकुचित केले आहे. माझ्या कार्याला ठाराविक समाजाची जहागिरी करून टाकले आहे. मला उज्वल भारत जातधर्म विरहीत भारत हवा होता. माणुसकीची बांधिलकी जपणारा समाज हवा होता. फक्त जातीसाठी माती खाणारा आणि अन्याय झाल्यावर स्वतःची जात जन्म दाखल्याच्या कागदपत्रावर शोधणारा समाज मला नको होता. मला आरक्षण यासाठी हवे होते की, आर्थिक सुबत्तता या समाजात यावी, स्वतःच्या प्रगल्भ विचारांनी आणि माणुसकीच्या बाधिलकीसाठी झगडणारा वेळ पडली तर जातीचे जोखडं झुगारून दुसर्या समाजातील समाज बांधवांना प्रगतीपथावर नेईल अशा समाजाचे स्वप्न पाहिले होते. पण आजची परिस्थिती पाहता माझा अट्टाहास चुकीचा तर नव्हता ना हा प्रश्न मला बैचेन करत आहे. तेवढ्यातच घोड्याच्याकिंकाळ्याचा आवाज आला.
एक रुबाबदार व्यक्ती वाडीयाार्कच्या मैदानावर प्रवेशकर्ती झाली. सर्व 4-5 मंडळी उभे राहून त्या व्यक्तीच्या येण्याकडे पाहत होती. डोक्यावर पगडी घातलेली व्यक्तीने पुढे होऊन नमस्कार केला. ती पगडीधारी व्यक्ती मग स्वतःच मनोगत व्यक्त करू लागली. मी घरातील देव हा रस्त्यावर आणला. तो माणसातील देवपण जागे होऊन माणसाला माणसातली माणसाची जाणीव होऊन त्याने रुढी परंपरांना तिलाजली देऊन स्वार्थ विरहीत आदर्श संपूर्ण विश्वासमोर ठेवावा, यासाठी पण सध्याच्या पिढीचे आदर्श पाहून मलाही इतिहासातच रहावे असे वाटत आहे. इतिहासाचा भाग बनून कारण यापुढे इतिहास घडणार नाही. कारण इतिहास घडवण्यासाठी तो वाचावा लागतो. त्याचे अनावरण वागण्यात आणि स्वभावात आणावे लागते. पण हे आजच्या पिढीजवळ नाही ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. आणि माझ्या कार्याला दहा दिवसांपुरती मर्यादीत करणारी पाहून मनाला स्वतःच्या केलेल्या कार्याचा पश्चाताप करायला लावणारी आहे. इतिहासालाही इतिहास परत घडणार नाही अशी भितीवाटेल ही शोकांतिका आहे.
त्यानंतर जरीचा टोप घातलेली शस्त्रधारी व्यक्ती बोलू लागली. स्वराज्याचा तोरण मी जनतेसाठी बांधलं होतं. जनतेला स्वतःचे स्वातंत्र्य उपभोगण्याकरिता रानोमाळ घोडदौड करून कडेकोट किल्ले हे जनतेच्या रक्षणासाठी मी उभारले होते. त्यावेळी आस्मानी, सुल्तानी परकीय लोकांकडून त्रास होता. आजतर राज्यही आपले राज्यकर्तेही आपले. त्याकरिता आंदोलने, मोर्चे काढावे लागत आहे याचे वाईट वाटते. आजची स्त्री घरातही सुरक्षीत नाही हे पाहून डोळ्यात अंगारा उभा राहतो. जातीच्या जोखाडाता स्वतःला अडकवून लढणारा समाज पाहून केलेल्या कार्याची पुर्तता करण्यात माझा समाज, माझा देश, माझी माणसं कमी पडतात याची खंत मनाला जाणवते. गुन्हेगाराला जात नसते. त्याला धर्म नावाची लेबलही नसतात. तो फक्त एक अपराधी असतो. ज्याने दिवसाढवळ्या माणुसकीचा खून केलेला असतो. अशांना शिक्षा तर व्यवस्थेने दिलीच पाहिजे. पण ते कृत्य करताना वाईट घडल्यानंतरच समाजाला जाग यावी त्याची विषन्नता वाटते. त्या देव म्हणवणार्या निर्मिकाने फक्त स्त्री व पुरूष असे दोन लोक माणुस म्हणून जन्माला घातले होते. पण या पिढ्यांनी त्याला अठरापगड जातीत विभागून देवालाही विभाजीत केले. स्त्रीला सुरक्षित करण्यासाठी कायदे कडक करण्यापेक्षा समाज, मानसिकता व जातीयतेचे लोढणे जुगारून सर्व समाज एक झाला पाहिजे. फक्त जयंती, पुण्यतिथ्या करून आम्हाला वंदनापेक्षा माणसातल्या माणसाला वंदिले तर समाजात सौख्य नांदेल. पण हे करताना कोणी आपल्या हक्कावर गदा आणणार असेल तर त्याचे उत्तर देण्यासाठी हातात शस्त्र बाळगले पाहिजे. मग ते कोणतेही असो, लेखणी वा तलवार.
स्त्री ही कुठलीही असो ती घराच सौख्य असतं. पण कधी परस दारातलं अंगण तर कधी घराच्या समोरचं तुळशीचं वृंदावन असतं. तिचं अस्तित्व हे देवाघरचं देणं असतं, तर पुरुषाच्या आयुष्यातलं देवान लिहिलेलं सोनेरी पान असतं. तिच्या हक्कावर तिच्या स्वातंत्र्यावर गदा आणणं तिच्यावर नव्हे तर पुढच्या आपल्या पिढीचं अस्तित्व आपल्या हाताने नष्ट करणं असतं.
हे सर्व पाहत असताना घोडा पुन्हा एकदा फुरफुरला. सुटाबुटाील व्यक्ती लगेच बोलली आता आपण निघायला हवं. कारण सुर्य उगवतीला आला. आज आपल्याला झोप आली नाही. पण ह्या तथाकथीत 21 व्या शतकातील पिढीला जात कधी येणार देव जाणे. अचानक माणुस नावाच्या प्राण्याची लगबग मैदानात पुसटशी जाणू लागली. घोड्याच्या टापांनी उडवलेली धूळ माझ्या डोळ्यात गेली. ती चोळत असतानाच पाठीवर थाप पडली. मी दचकलो. थोडा भानावर आलो. मित्र होता माझा. तो बोलला अरे झोपला होता काय इथे? त्याला मनातच बोललो शरीर झोपलं होतं मनाला जाग आली. माणुसकी खर्या अर्थाने आज भानावर आली. तो बिचारा सांगत होता. आज येताना विचित्र घटना मी पाहिली. स्टॅण्डकडून येताना शिवाजी राजे महाराज यांचा पुतळा जागेवर नव्हता. मार्केट यार्ड चौकातील आंबेडकर पुतळ्याची जागा मोकळी होती. तर वाडीयापार्कच्या प्रवेशद्वाराजवळील गांधींचा पुतळाही जागेवर दिसत नव्हता. आणि टिळक रस्त्यावरील टिळकांचाही पुतळा गायब होता. मी थोडा विचारात पडलो. स्वप्न होत का वास्तव याचा मला ताळमेळ लागेना.
मग विचार केला अरे पुतळ्यामध्ये आजच्या पिढीच्या वागण्यामुळे सजीवता आली. त्यांची घुसमट त्यांनी मैदानावर येऊन भल्या पहाटे उद्विग्नपणे, संवेदनशिलपणे व्यक्त केली. त्यांना आपले कार्य अपुरे राहिल्याची अस्वस्थता मैदानावर खेचून घेऊन आली. पण आपण कधी जागे होणार, कधी माणसातले माणुसपण आपण जाणणार, कुठपर्यंत जात, धर्म, आरक्षण याच मुद्द्यांवर लढत बसणार, कुठवर माणसातला माणुस जागे होण्यासाठी शिवाजी महाराज, टिळक, गांधी, आंबेडकर हे लोक जन्म घेणार? बाकी सर्व लोक आपण सुज्ञ आहोत. मी जे लिहीलं ते लेखणाच्या स्वातंत्र्याच्या भावनेतू त्याचा मतीतार्थ ज्याने त्याने त्याच्या पद्धतीने घ्यावा. बाकी आपण सर्व एका देशाचे नागरिक आहोत.
- सागर एम. वाव्हळ

Post a Comment