वेब टीम : अहमदनगर
अहमदनगरचा विकासपुरुष माजी आमदार के. नवनीतभाई बार्शीकर यांच्या मालकीचे सायं. दैनिक लोकयुग हे बहुचर्चित आणि लोकाश्रय लाभलेले जिल्हापातळीवरचे दैनिक होते. भाईंच्या वृद्धावस्थेतच या दैनिकाची जबाबदारी त्यांच्या वहिनी सौ. राजलक्ष्मी गोपालदास बार्शीकर यांचेकडे आली. हे दैनिक म्हणजे नव पत्रकारांसाठी एक प्रशिक्षण केंद्रच. मी स्वतः या दैनिकात व्यवस्थापक म्हणून कार्यरत होतो. कार्यालयीन कामकाज सांभाळताना जिल्ह्यातील चौदा तालुक्यासह नगर शहरात प्रतिनिधी नेमणे, त्यांस प्रशिक्षण देणे, प्रत्यक्ष काम करवून घेणे हे माझे कामच होते. एक दिवस लोकयुगमध्ये संधी मिळावी म्हणून निशांत दातीर या तरुणाने केलेला अर्ज माझ्यासमोर आला. मी त्याला मुलाखतीसाठी बोलावले. त्यावेळी लोकवकील नावाच्या सायं दैनिकात निशांत अनुभव घेत होता. पण कुठेतरी त्याचं मन असमाधानी वाटत होतं. मुलाखती दरम्यान हा मुलगा पुढे चालून कर्तबगार होईल असे मला वाटले. त्यावेळी नंदकुमार सातपुते हे लोकयुगचे कार्यकारी संपादक आणि संपादक पोपट लोढा हे होते. सातपुते सरांशी चर्चा करुन निशांतबद्दल मला काय वाटते हे त्यांना सांगितले. त्यांनीही विश्वासाने संमती दिली. ही घटना सन २००७ मधील. तेव्हाही पत्रकार, उपसंपादक सायकलचा वापर करीत पण हा निशांत स्प्लेंडर मोटरसायकल वापरत होता. पेट्रोलचा खर्च कीती होईल यापेक्षा मी कीती अधिक धावू शकेन हे त्याचे गणित होते. त्याची प्रचिती तो कामातून देत होताच.
राज्यभर गाजलेला सेक्स स्कँडल चा विषय निषांतने पहिल्यांदा समोर आणला, बनावट पेट्रोल चा विषय असेल, दुधात होणारी भेसळ चा विषय असेल निशांत निष्ठेने एकेक विषय समाजासमोर या संधीच्या माध्यमातून ठेवित गेला. पोलिस भरतीमध्ये बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या ठकास पकडताना पोलिसांबरोबर स्वतःची पर्वा न करता पाठलाग करणारा निशांत मला माहीत आहे.
यासोबतच स्वतःचही एक प्रकाशित असावं या हेतूने निशांत दिवाळी अंक त्याने सुरु केला. स्वतःच्याच बुद्धीवर अवलंबून न रहाता अनेक ज्ञानवंतांना त्याने त्यात सामावून घेतले, परिणामी सलग अठरा वर्षे राज्यपातळीवर या अंकाने विविध पुरस्कार घेतले हा कौतुकाचा विषय आहे. दरम्यानच्या काळात दोन साप्ताहिक सुरु करुन शासनमान्य यादीत त्यांना स्थान मिळवून देण्याचे श्रेय देखील त्याने मिळविले. कमी वयात महाराष्ट्र शासनाचा अधिस्वीकृतीधारक पत्रकार होण्याचा मान निशांतला मिळाला. याबरोबरच निशांत नवाकाळ या प्रथितयश दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही काम करीत होता.
निशांत एव्हढ्यावरच थांबणे शक्य नाही हे मलाही समजत होते. पण पुढे काय? स्वतः त्यानेच सत्ताधारी भाजपकडून उमेदवारी मिळवून महानगरपालिकेच्या निवडणूक आखाड्यात उतरुन याचे उत्तर दिले. निवडणूक अर्जात त्याने दिलेले संपत्तीचे विवरण पाहून मी अचंबित झालो होतो हे नाही विसरु शकत.
नव्याने जेव्हा निशांत लोकयुगच्या प्रांगणात मजकडे आला होता तेव्हा त्याला काही मार्मिक गोष्टी सांगितल्या होत्या निशांत त्यातलं काही विसरला नाही हे समाधान आहे. तेव्हा लोकमान्य टिळकांचे एका भाषणातील वाक्य त्याला सांगितले होते. टिळक म्हणतात, अरे अरे नरा
जन्मा आले काहीतरी करा
काही करता येत नसेल तर
मातेच्या पोटात परत शिरा
मातेच्या पोटात परत तर काही शिरता येत नाही, म्हणजेच जीवाच्या पलिकडे जावून कृतिशील आयुष्य माणसाने जगण्याचा प्रयत्न करावा.
वयाच्या मानाने निशांतची धाव समाधान देणारी आहे. तो थांबणार नाही. तो आपली धाव आपणहून वाढविल हे निःसंशय खरे आहे.
हे सर्व आठवायचं कारण म्हणजे, दिनांक ३० मे हा निशांतचा जन्मदिवस. जन्माला येणं हा वेगळा विषय. पण मिळालेला जन्म कृतार्थ करण्यासाठी जगणं हा वेगळा विषय आहे. या सगळ्या वाटचालीत निशांतने माणूसपण देखील जपलं. माझ्या व्यतिरिक्त अनेकजण याची साक्ष नक्कीच देतील. नाशिकच्या आणि माझ्या वयात मोठे अंतर आहे. पण मी म्हणू शकतो तो माझा तरुण मित्र आहे. निशांत, खूप मोठा हो. तुझ्यातली धडपड अशीच अविरत राहू दे, म्हणजे तुझे तारुण्य सदाबहार राहील. तुला वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा!
-सॉलोमन गायकवाड जेष्ठ पत्रकार

Post a Comment