नूतन विधानपरिषद सभापती नामदार राम शिंदे यांचा शनिवारी सर्व पक्षीय सत्कार सोहळा
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आधी लोकसभा व नंतर विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या माध्यमातून तुटून पडणारे महाविकास आघाडी व महायुतीचे नेते आता चक्क एकत्र आले आहेत. निमित्त आहे...विधान परिषदेचे नूतन सभापती व जिल्ह्याचे भूमिपुत्र प्रा. राम शिंदे यांच्या सर्वपक्षीय नागरी सत्काराचे. येत्या शनिवारी (4 जानेवारी) सकाळी 11 वाजता सावेडीच्या माऊली सभागृहात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते प्रा. शिंदे यांचा सत्कार होणार आहे. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासह जिल्ह्यातील महायुतीचे 10 आमदार तसेच महाविकास आघाडीचे दोन आमदार व दोन्ही खासदार उपस्थित राहणार आहेत.
भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शिवसेना शिंदे सेना गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे तसेच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर व ठाकरे सेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांच्या पुढाकाराने सभापती प्रा. शिंदे यांच्या सर्वपक्षीय सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे संयोजक शहर भाजप सरचिटणीस सचिन पारखी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य वसंत लोढा, मनसेचे जिल्हा प्रमुख सचिन डफळ, शरद पवार राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, ठाकरे सेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, शिंदे सेना जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले, भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, हिंदू राष्ट्रसेना जिल्हाध्यक्ष संजय आडोळे व अजित पवार राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अशोक सावंत आहेत. यासाठी मा. ना. प्रा. रामजी शिंदे सभापती विधान परिषद सर्वपक्षीय सत्कार समिती स्थापन करण्यात आली आहे.
दहा वर्षांनी आला योग
या सत्कार सोहळ्याची माहिती संयोजन समितीचे अॅड. आगरकर व प्रा. बेरड यांनी माध्यमांना दिली. यावेळी काळे, लोढा, आडोळे, शिंदे उपस्थित होते. जिल्ह्याचे पहिल्यांदा पालकमंत्री झाल्यावर 1 जानेवारी 2014 रोजी प्रा. शिंदे यांचा सहकार सभागृहात सर्वपक्षीय नागरी सत्कार झाला होता. त्यानंतर दहा वर्षांनी पुन्हा त्यांच्या नागरी सत्काराचा योग आला आहे. यासाठी सर्वपक्षीय नेते नियोजनासाठी एकत्र येणे हा जिल्ह्याच्या राजकीय संस्कृतीचा मानबिंदू आहे, असे भाष्य प्रा. बेरड यांनी केले. तर महाविकास आघाडी व महायुतीद्वारे एकत्रित उपक्रमांचा असा योग भविष्यातही येऊ शकतो. काही ठराविक मुद्यांवर दोन्ही आघाडीतील काही पक्ष याआधीही एकत्र आले आहेत. मात्र, जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्यावर व त्याचे नेतृत्व प्रा. राम शिंदे यांना देण्यावरून भविष्यात दोन्ही आघाड्या एकत्र येतील की नाही, हे येणारा काळच ठरवेल, असे भाष्य अॅड. आगरकर यांनी केले. स्वातंत्र्यपूर्व काळात फिरोदिया, स्वातंत्र्योत्तर काळात उपसभापती ज्येष्ठ नेते सूर्यभान वहाडणे पाटील तसेच उपसभापती व सभापतीपद भूषवलेले प्रा. ना. स. फरांदे यांच्यानंतर प्रा. शिंदे यांना हा सन्मान मिळाल्याने त्यांचा सर्वपक्षीय सत्कार होत असल्याचेही अॅड. आगरकर यांनी स्पष्ट केले. तर प्रा. शिंदेंचे सभापतीपद जिल्ह्याच्यादृष्टीने मास्टर की असेल. जिल्ह्याच्या विकासाचा प्रश्न त्यांना हक्काने सांगून त्यांच्याद्वारे संबंधित मंत्र्यांकडून तो सोडवून घेता येईल. सभापतीपदाची ही मास्टर की वापरण्याची विनंती आम्ही प्रा. शिंदे यांना करू, असे काळे म्हणाले. आडोळे यांनी आभार मानले.
--
Post a Comment