अहमदनगर : सोलापूर जिल्ह्यात महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या ताेंडावर उजनीच्या पाण्याचा वाद चिघळत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्याचा पालकमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू केल्या आहे. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना हटवून ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांना पालकमंत्री करण्याबाबत विचार सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच शुक्रवारी याबद्दल स्पष्ट संकेत दिल्याचे जिल्ह्यातील नेत्यांनी सांगितले. तसेच हसन मुश्रीफ पालकमंत्री असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्तात्रय भरणे यांना संधी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दत्तात्रय भरणे हे राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात. सध्या नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार तरुण आहेत. सर्वात जास्त अजित पवार यांना मानणारे आहेत म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडीला हिरवा कंदील दिल्याचे समजते. दरम्यान मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकताच नगर जिल्ह्यात एक दौरा केला तो याचाच भाग होता असे म्हंटलं जातेय.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे सध्या अहमदनगरचे पालकमंत्री आहेत. मुश्रीफांनाही बदल हवा आहे. २५ मे नंतर बदल दिसेल असे या शरद पवार यांनी जिल्ह्यातील नेत्यांना सांगितले. सोलापुरात कामगार वर्ग आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या जुन्या नेत्यांना मुश्रीफ ओळखून आहेत. एकूणच ही पार्श्वभूमी पाहता मुश्रीफांना सोलापूरचे पालकमंत्री करण्याचा तसेच अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी दत्तात्रय भरणे यांना संधी देणार असल्याचा निर्णय झाल्याचे राष्ट्रवादीच्या एका नेत्यानी सांगितले.
Post a Comment