लोकांनी जनते ऐवजी नागरिक बनावे- अॅड.असीम सरोदे


लोकशाही उत्सवातील व्याख्यानमाला
नगर- “भारतातील लोक केवळ ‘जनता’ न राहता त्यांनी संविधानाला अपेक्षित असणारे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता समजून घेतली तर घटनात्मकता पाळणारे ‘नागरिक’ तयार होतील.” असे मत संविधान विश्लेषक व मानवाधिकार कायदेतज्ञ अ‍ॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले. अहमदनगरच्या लोकशाही उत्सव समितीद्वारे आयोजित लोकशाही उत्सव २०२२ च्या ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते. 
प्रक्रियात्मक न्याय व वितरणात्मक न्याय यांची एकत्रित मोट बांधली नाही तर संविधानमूल्ये अंमलबजावणीच्या पातळीवर बेवारस होताना दिसतील असा धोक्याचा इशारा देऊन  ते पुढे असेही म्हणाले की, केवळ निवडणुकीत मिळालेले बहुमत हे धार्मिक बहुमत आहे असा समज करून घेऊन सध्याच्या  सत्ताधाऱ्यांनी ‘आवडते नागरिक’ व “नावडते नागरिक’ अशी एक भ्रामक संकल्पना तयार केली आहे. प्रजासत्ताक  हा शब्द हद्दपार करून त्याजागी ‘लोकांची सत्ता’ असा बदल केला पाहिजे. सरते शेवटी ऍड. सरोदे यांनी लोक सहभागाला वाव दिल्यानेच परिपक्व नागरिक तयार होऊ शकतात यावर विश्वास ठेऊन नागरिक तयार करणे हेच महत्त्वाचे रचनात्मक काम केले पाहिजे असे आवाहन केले. आजच्या या ऑनलाईन सत्राला महाराष्ट्रातील विविध शाळा - महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्राच्या सुरवातीला ऍड. असीम सरोदे यांचा कार्य परिचय अहमदनगर लोकशाही उत्सव समितीचे सदस्य शिवाजी नाईकवाडी यांनी करून दिला. तर सोनाली शिंदे यांनी आजचे व्याख्याते ऍड. असीम सरोदे यांचे तसेच शांतिनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसीचे डॉ प्रशांत शिंदे, आर्कि. अर्षद शेख, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे अशोक सब्बन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड महेबूब सय्यद आणि इतर सर्व सहकाऱ्यांचे आभार मानून उद्या अ. भा. जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्षा किरणताई मोघे यांच्या व्याख्यानाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले. सत्राचा समारोप सिंधुदुर्ग येथील बाल विद्यार्थिनी यशश्री ताम्हणकर हिच्या संविधान प्रास्ताविकेच्या वाचनाने करण्यात आला. 

 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post