अहमदनगर महापालिका वृक्ष लागवड उपक्रमात अभिनेते भरत जाधव सहभागी

अहमदनगर- महाराष्ट्र शासनाच्या वतीने पंचतत्वावर आधारित वसुंधरा मोहीम अंतर्गत तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून अहमदनगर महानगरपालिका उद्यान विभागाच्या वतीने प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेते श्री.भरत जाधव यांच्या हस्ते आणि उद्यान विभाग प्रमुख श्री.मेहेर लहारे, उपप्रमुख श्री.शशिकांत नजान,चित्रपट निर्माते श्री.स्वप्नील मुनोत यांच्या उपस्थितीत महालक्ष्मी उद्यान येथे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री.भरत जाधव म्हणाले की निसर्गाचे संवर्धन ही काळाची गरज असून निसर्ग टिकला तरच मानवी अस्तित्व टिकणार आहे. निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण करणे अत्यंत गरजेचे असून भारतीय वातावरणात टिकणारे,रुजणारे,बहरणारे भारतीय वृक्ष या माध्यमातून जतन होतील.इतर कोणत्याही कार्यक्रमापेक्षा वृक्षारोपण कार्यक्रमास मी कायम प्राधान्य देतो एक अभिनेता जरी असलो तरी मी निसर्गप्रेमी व्यक्ती आहे.
     उद्यान विभाग प्रमुख श्री.मेहेर लहारे म्हणाले की विदेशी झाडांमुळे येथील वातावरणावर विपरीत परिणाम होतो.ज्या झाडांवर पक्षी घरटे करीत नाही, विसाव्याला बसत नाहीत त्या झाडांची लागवड न करता भारतीय झाडे लावणे योग्य आहे.
    अभिनेते भरत जाधव चित्रीकरणा निमित्त अहमदनगर येथे आले असून त्यांनी महानगरपालिका उद्यान विभागाला भेट देऊन माहिती घेतली.
सूत्रसंचालन व आभार श्री.शशिकांत नजान यांनी मानले.
यावेळी अभिनेते श्री.वैभव कुऱ्हाडे मनपा कर्मचारी श्री.अमोल लहारे,उद्यान विभाग कर्मचारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post