आंतरजिल्हा बदलीच्या माध्यमातून जिल्ह्यात 104 पोलिसांची नियुक्ती करणार : एसपी पाटील
नगर दि 27 (प्रतिनिधी )नगर जिल्हा पोलीस दलामध्ये आंतरजिल्हा बदलीच्या माध्यमातून 104 जण नियुक्त केले जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. दरम्यान नगर जिल्ह्यातील पोलिसांच्या बदल्यांची प्रक्रिया या आठवड्यामध्ये सुरू केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
अधीक्षक पाटील म्हणाले की, नगर जिल्ह्यामध्ये आंतरजिल्हा बदलीसाठी अनेकांनी अर्ज दाखल केले होते. त्या अर्जाची शहानिशा केल्यानंतर नवीन एकशे चार जणांना जिल्ह्यामध्ये येण्यास परवानगी दिली जाणार आहे. त्यांची नियुक्ती रिक्त पदांवर केली जाणार असल्याचेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले. नगर जिल्ह्यामध्ये बदली प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे. या आठवड्यापासून बदली प्रक्रियेला सुरुवात केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धडक कारवाई मोहीम पोलिसांनी हाती घेतलेली आहे. गेल्या आठवड्यापासून ही कारवाई मोहीम सुरू झालेली आहे. काल दोन लाख दहा हजार रुपयांचा दंड एकाच दिवशी वसूल करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने ही कारवाई पुढे चालू ठेवली जाणार असल्याचेही अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले. नागरिकांनी कोरोनाविषयक नियम व अटीचे पालन केले पाहिजे. जे नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच जिल्हाभरामध्ये अशा प्रकारच्या मोहिमा सर्वत्र सुरू केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट
नगर जिल्ह्यामध्ये जे पोलीस दलामध्ये कार्यरत होते व ते गेल्या अनेक वर्षापासून कामावर हजर नाहीत, अशांची संख्या 19 आहे. ते नेमके कोण आहेत, त्या संदर्भातील माहिती लवकरच एकत्रित केली जाणार आहे व त्या संदर्भात पुढील कारवाई सुद्धा केली जाईल, असे अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले.
Post a Comment