इस्लामपूर दि.२६ प्रतिनिधी
पूर्वीच्या सरकारने धनगर समाजासाठी एक हजार कोटीची केलेली घोषणा निवडणुकीचीच घोषणा ठरली. मात्र आमचे महाआघाडीचे सरकार येत्या अर्थ संकल्पात धनगर समाजासाठी भरीव तरतूद करून धनगर समाजात विश्वास निर्माण करेल,अशी ग्वाही राज्याचे जल संपदामंत्री,व जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथील सभेत दिली.
येथील राजारामबापू नाट्यगृहात महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघा चे नूतन प्रदेशाध्यक्ष अँड.चिमणभाऊ डांगे यांचा ना.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्या आला. याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. राज्याचे बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (मामा) समारंभाच्या अध्यक्ष स्थानी होते. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे,माजी आमदार रामहरी रूपनवर, आ.मानसिंगराव नाईक प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या अर्ध पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
ना.पाटील म्हणाले,आरक्षण हा धनगर समाजाचा कळीचा प्रश्न आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा गाजला. पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देवू,असे ज्यांनी समाजास आश्वासन दिले होते,ते पूर्ण करू शकले नाहीत. पूर्वीच्या सरकारने टाटा सोशल सायन्सकडे धनगर समाजाचा आर्थिक,व सामाजिक मागासलेपणा चा अभ्यास करायची जबाबदारी देवून वेळकाढूपणा केला आहे. त्यांचा अहवाल समाजाच्या हिताचा नाही. आमचे सरकार धनगर समाजास आरक्षण मिळण्याबरोबर समाजातील तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी जे-जे करणे शक्य आहे, ते-ते करेल. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजाच्या हिताचा कारभार केला,त्याप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी समाजाच्या हिताचा कारभार केला आहे. त्यांनी संपूर्ण देशात फिरून बारा ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार केला आहे. आप्पांनी राज्यातील धनगर समाजात जागृती करण्याचे मोठे काम केले असून त्यांचा वारसा असणाऱ्या चिमणभाऊंच्यावर आपण राज्यातील धनगर समाजाचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. राज्य सरकार म्हणून आम्ही सर्व ताकद त्यांच्या पाठीशी उभा करू.
ना.दत्तात्रय भरणे म्हणाले,चिमण भाऊ एक शांत,व संयमी नेते आहेत. ते समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत आहेत. समाजाला आरक्षण मिळवून देणे,व समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी,मी त्यांचा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी उभा राहीन. समाजात विविध संघटना आहेत, त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे काम आप्पा करीत आहेत. मात्र समाजाचे काही नेते आपली पोळी भाजून घेण्यासाठी समाजाची फसवणूक करीत आहेत.
अण्णासाहेब डांगे म्हणाले,धनगर समाजाचे हक्काचे आरक्षण मिळवून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी महा संघाची स्थापना केली आहे. खा.शरद चंद्र पवारसाहेब समाजास आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत असताना काही नेत्यांनी बारामतीला त्यांच्या घरावर मोर्चा नेवून भाषणातून लाखोली वाहिल्याने आरक्षण पुढे गेले. १५ ऑगस्ट १९४७ पूर्वीचे मूल्यमापन धरले असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी टाटा समिती का नेमली? टाटा समितीचा निर्णय समाजाच्या विरोधात असल्याने तो जाहीर केला नाही. समाजने मेंढपाळ बंद केल्याने समाजाची दुरावस्था झाली आहे. समाजाने आपला उज्ज्वल इतिहास विसरू नये.
अँड.रामहरी रूपनवर म्हणाले, धनगर समाजास राज्यात एनटी, केंद्रात ओबीसी,तर घटनेत एसटीचे अशी तीन आरक्षणे आहेत. मात्र याचा काही उपयोग नाही. पवारसाहेब,व ना.जयंतराव पाटील यांनी समाजाच्या आरक्षणामध्ये लक्ष घालावे. काही लोक पूर्वीचे दोन्ही समाजातील सामंजस्य संपवून दरी पाडण्याचे काम करीत आहेत,ते थांबवावे लागेल. मोठया नेत्यास शिव्या देवून कोणी मोठे होत नाही. अशा नेत्यांना थारा देवू नका.
अँड.चिमनभाऊ डांगे म्हणाले, आप्पांनी गेल्या २८ वर्षात महासंघ राज्याच्या वाडीवस्त्यांवर नेत समाजाचे हित जपले आहे. आप्पांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालया वर टक्कर घेत जे रक्त सांडले,ते वाया जाऊ देणार नाही. ना.जयंतराव पाटील यांनी राज्य सरकरकडून केंद्र सरकारला ठराव देण्यात पुढाकार घ्यावा. तसेच प्रत्येक जिल्ह्यात अहिल्यादेवीचा पुतळा,व गोर-गरीब मुलांच्यासाठी वस्तीगृह बांधणे, चौंडीच्या विकासाला निधी मिळवून द्यावा.
यावेळी वाळव्याचे किसन गावडे यांचेही भाषण झाले. यावेळी महा संघाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रा.अरुण घोडके यांचाही सत्कार करण्यात आला.
कृष्णेचे माजी अध्यक्ष इंद्रजित मोहिते,अँड.बी.एस.पाटील,मलकापूर च्या नगराध्यक्षा नीलम एडगे,पांडुरंग काकडे,प्रकाश कनप,माजी जि.प. अध्यक्ष देवराज पाटील,आनंदराव मलगुंडे,सचिन हुलवान यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी,व धनगर समाजातील कार्यकर्ते, व समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी समारंभाचे निमंत्रक शिवाजी वाटेगावकर यांनी स्वागत,तर जि.प.सदस्य संभाजी कचरे यांनी प्रस्ताविक केले. सुनील मलगुंडे यांनी आभार मानले. संदीप तांबवेकर, बजरंग कदम यांनी सूत्र संचालन केले.
फोटो ओळी- इस्लामपूर येथे अँड.चिमनभाऊ डांगे यांचा सत्कार
करताना ना.जयंतराव पाटील. व्यासपीठावर ना.दत्तात्रय भरणे,माजी मंत्री अण्णासाहेब डांगे,रामहरी रूपनवर,डॉ.इंद्रजित मोहिते,अँड.बी. एस.पाटील,व मान्यवर

Post a Comment